दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री गावाने मिळविली ओळख

पंढरीनाथ गुंजकर यांच्या कारखान्यात तयार झालेली विविध यंत्रे. उंद्री परिसरात अवजारे तयार करणारे कुशल कामगार तयार झाले आहेत.
पंढरीनाथ गुंजकर यांच्या कारखान्यात तयार झालेली विविध यंत्रे. उंद्री परिसरात अवजारे तयार करणारे कुशल कामगार तयार झाले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी अवजारांच्या निर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेत मध्य महाराष्ट्रात आपली विशेष ओळख तयार केली आहे. सुमारे २० ते २२ वर्षांपूर्वी छोट्या कारखान्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय आता चांगलाच विस्तारला आहे. गावात २५ हून अधिक छोटे कारखाने या माध्यमातून कार्यरत आहेत. या माध्यमातून वर्षाला गावात कोट्यवधींची उलाढाल होत असावी. एकीकडे शेतकऱ्यांना दर्जेदार अवजारे मिळतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील हातांना पूर्ण वेळ रोजगारही मिळाला आहे.   बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री हे गाव आता कृषिपयोगी अवजारांसाठी नावारूपाला आले आहे. अनेक व्यवसाय गाव परिसरात विस्तारले आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची अवजारे त्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. गुंजकरांनी घेतला पुढाकार उंद्री हे अकोला-औरंगाबाद महामार्गावरील गाव आहे. येथून काही किलोमीटर अंतरावर टाकरखेड हेलगा नावाचे छोटेसे खेडे आहे. येथील पंढरीनाथ गुंजकर यांनी जुलै १९९७ मध्ये उंद्री गावात शेती उपयोगी अवजारांची निर्मिती सुरू केली. त्या काळात शेतीत यांत्रिकीकरणाचा तितकासा वापर वाढलेला नव्हता. काही सधन शेतकऱ्यांकडेच ट्रॅक्टर किंवा अन्य अवजारे दिसायची. अशा परिस्थितीत गुंजकर यांनी काळाची पावले ओळखून मुहूर्तमेढ रोवली. शेतीसाठी लागणारी यंत्रे बनविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला केली टिंगल गुंजकर यांनी आपल्या उद्यमशीलतेबाबत बोलताना सांगितले की जेव्हा या व्यवसायाला सुरुवात केली त्या वेळी काही लोक टिंगल करायचे. हा व्यवसाय चालणार नाही. आपल्या खेड्यात कुणी यंत्रे वापरत नाही, असे बोलून एक प्रकारे निराशा निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायचा. परंतु मी प्रयत्न सोडले नाहीत. सुरुवातीला छोट्याशा जागेत यंत्र निर्मितीला सुरुवात केली. एका-एका यंत्राची जुळवाजुळव सुरू केली. माझी स्वतःची शेती होतीच. यंत्र बनविले की ते पहिल्यांदा स्वतःच्या शेतात वापरून बघायचे. त्यामुळे यंत्रात काय त्रुटी आहेत ते लगेच लक्षात यायचे. त्यानुसार त्या दूर करण्याचा प्रयत्न व्हायचा. विश्वास निर्माण केल्याने ग्राहकपेठ वाढली ज्या भागात यंत्रांबाबत फारशी जागरूकता नव्हती अशा ठिकाणी ही कारखानदारी चालविणे तसे जोखमीचे व चिकाटीचेही काम होते. गुंजकर यांनी येणाऱ्या प्रत्येक शेतकरी ग्राहकाच्या मनात यंत्राच्या गुणवत्तेविषयी खात्री देण्याचा प्रयत्न केला. विक्री पश्‍चात सेवेवरही भर दिला. पुढे मजुरीची समस्या तीव्र होऊ लागली. यांत्रिकीकरणाचे महत्त्व वाढू लागले. शेतकरी यंत्रांची मागणी करू लागले. टप्प्याटप्प्याने गुंजकर यांची प्रेरणा घेत अन्य लोकही या व्यवसायाकडे वळू लागले. आज उंद्री परिसरात २५ हून अधिक अवजार निर्मिती व्यावसायिक तयार झाले आहेत. यात विष्णू मावळे, दादाराव गुंजकर अशी अनेक नावे सांगता येतील. येथे तयार झालेली अवजारे बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर अकोला, वाशीम, नांदेड, परभणी, जालना, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांत पोचली. ग्राहक केवळ उंद्री गावाच्या नावाने खरेदीसाठी येतात. शेकडोंना रोजगार उंद्री गावाची अर्थव्यवस्था शेतीवरच आधारीत आहे. परंतु या उद्योग व्यवसायाने गावाचे चित्रच पालटले आहे. पंचक्रोशीतील विविध गावांतील शेकडोंहून अधिक तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण झाला आहे. दररोज सुमारे ३०० रुपये मेहनताना मिळवण्याची क्षमता त्यांनी तयार केली आहे. अनेक जण कामे ठोक पद्धतीने घेत पाचशे रुपयांंपेक्षाही अधिक मजुरी कमावत आहेत. या माध्यमातून त्यांची कुशलता वाढीस लागली आहे. लोखंडाची कटाई असो, वेल्डिंग असो, मोजमापातील अचूकता असो की यंत्रांचा देखणेपणा असो या सर्व बाबी ते अत्यंत सफाईदारपणे करतात. शेतकरी कुटुंबातूनच आलेले हे कामगार असल्याने निर्मिती प्रक्रिया समजून घेणे त्यांना कठीण जात नाही. जवळपास वर्षभर रोजगार पावसाळ्याचा कालावधी वगळल्यास नऊ ते दहा महिने या व्यवसायाने कामगारांना रोजगार दिला आहे. मंगरुळ, टाकरखेड हेलगा, घाटबोरी, किन्ही आदी गावांतील हे कामगार आहेत. काहींनी एक पाऊल पुढे टाकत धाडसाने स्वतः व्यावसायिक होण्याचाही प्रयत्न केला आहे. नवी पिढीही आश्‍वासक यंत्र निर्मितीसाठी लागणारे लोखंड, साहित्याची जुळवणूक या बरोबरच तयार केलेल्या यंत्रांना ग्राहक मिळवताना अनेक अडचणी आल्या. दोन वर्षांपूर्वी ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर या व्यवसायालाही मंदीचा फटका सहन करावा लागला. दुष्काळ, पाऊस कमी होणे आदी बाबींचाही व्यवसायावर परिणाम होतो. तरीही सर्व संकटांशी लढत हा व्यवसाय टिकून आहे. या व्यवसायाकडे तरुण पिढीही आश्वासक नजरेने पाहू लागली. अभियांत्रिकीची शिक्षण घेतलेले तरुण नोकरीच्या मागे न लागता येथे करिअर शोधू लागले. काही व्यावसायिकांनी ट्रॅक्टर, यंत्रांच्या एजन्सीही घेतल्या आहेत. यंत्रांची विविधता उंद्रीमध्ये विविध यंत्रे तयार होतात. यात रोटावेटर, दोन-तीन फाळी नांगर, बियाणे व खत पेरणी यंत्र, व्ही पास (तूर, कपाशीच्या पऱ्हाटी उपटण्यासाठी), पंजी (शेतातील माती भुसभुशीत करण्यासाठी), कल्टीव्हेटर, वखर आदींची विविधता येथे आहे. त्याचबरोबर विहिरीतील गाळ, दगड, मुरूम काढण्यासाठी ७० फूट खोल जाणारी क्रेनही आहे. हायड्रॉलिक पल्टी नांगर, लेव्हलर, कडबा कुट्टी यंत्र, ट्रॅक्टर ट्रॉली, हायड्रॉलिक ट्रॉली, टँकर आदींची निर्मितीही येथे केली जाते. ठळक प्रतिक्रिया खरीप, रब्बी हंगामातील पिके, फळपिके आदींसाठी गरजेनुसार यंत्रांचा वापर करता येईल. अन्य ठिकाणच्या तुलनेत या यंत्रांच्या किमतीही किफायतशीर अशाच आहेत. विक्री पश्‍चात सेवा हे आमचे वैशिष्ट्य आहे. मी सुमारे २० हजार ग्राहकांचे नेटवर्क तयार केले आहे. पंढरीनाथ गुंजक र मी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर उंद्री भागात दहा वर्षांपासून पेरणी यंत्र, नांगर, ट्राॅली, ट्रॅक्टर आदींच्या अनुषंगाने कामे करतो आहे. दररोज ३०० रुपयांहून अधिक मजुरी याद्वारे कमावतो. शिवकैलास पानसंभळ, रा. इसोली, जि. बुलडाणा गेल्या १५ वर्षांपासून या भागात कार्यरत आहे. यंत्र निर्मिती कारखान्यात सर्व प्रकारची कामे करू शकतो. अनुभवातून कौशल्य मिळवत, सर्व शिकत गेलो आहे. गोपाल जाधव, हिवरा खुर्द, जि. बुलडाणा संपर्क- पंढरीनाथ गुंजकर- ९०११४९७२८७ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com