पीकबदल, एकात्मिक शेतीतून प्रयोगशीलता

वाशी (ता. रोहा) येथील अनंत महादेव मगर तालुक्‍यातील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. मात्र, पारंपरिक चौकटीत अडकून बसता नवे प्रयोग करण्याकडे व तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे त्यांचा अोढा असतो.
पीकबदल, एकात्मिक  शेतीतून प्रयोगशीलता
पीकबदल, एकात्मिक शेतीतून प्रयोगशीलता

अनंत महादेव मगर (वाशी, ता. रोहा, जि. रायगड) यांची केवळ दोन एकर शेती. मात्र, भाडेतत्त्वावर इतरांचे क्षेत्र घेत सुमारे २५ एकरांवर ते शेती कसतात. भाताव्यतिरिक्त पंधराहून अधिक क्षेत्रावर कलिंगड, काकडी, भुईमूग, यंदा कोहळा व जोडीला मत्स्यपालन अशी प्रयोगशीलता त्यांनी जपली आहे. अत्यंत कष्टातून व पीक पद्धतीचे उत्तम व्यवस्थापन करून त्यांनी शेतीत स्वतःला प्रगतिस्थानावर नेले आहे.  रायगड जिल्ह्याचे भात हे प्रमुख पीक.पावसाचे प्रमाणही येथे जास्त. याच जिल्ह्यातील वाशी (ता. रोहा) येथील अनंत महादेव मगर तालुक्‍यातील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. मात्र, पारंपरिक चौकटीत अडकून बसता नवे प्रयोग करण्याकडे व तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे त्यांचा अोढा असतो. त्यादृष्टीने सुमारे आठ वर्षांपासून ते कृषी विज्ञान केंद्र, किल्ला-रोहा (केव्हीके) तसेच कृषी विभागाच्या नियमीत संपर्कात राहून त्यांचे मार्गदर्शन घेत असतात.  प्रयोगांची आवड जपलेले मगर  रायगड जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांप्रमाणे मगरदेखील हे पीक घेतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून किफायतशीर, कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या कारली, कलिंगड, काकडी यांसारख्या व्यापारी पिकांकडे ते वळले. त्यांची केवळ दोन एकर शेती. मात्र, तेवढ्यावरच समाधान न मानता परिसरातील शेती भाडेतत्त्वावर घेऊन एकूण सुमारे २५ एकरांत ते विविध प्रयोग करतात.पीक फेरपालट, लागवड पद्धतीत बदल, पाणी वापराच्या पद्धती, पिकांमध्ये पॉली मल्चिंग अशा विविध बाबींचा वापर त्यांच्या शेतीत दिसतो.  यंदाचा कोहळा व त्यात काकडीचा प्रयोग  यंदा मे महिन्याच्या अखेरीस १७ एकरांवर कोहळा व काकडी यांचा मिश्रपीक प्रयोग केला आहे. यात एकानंतर दुसरी अोळ दुसऱ्या पिकाची अशी लागवड आहे. कोहळा हे दीर्घ तर काकडी हे कमी कालावधीचे पीक आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या क्षेत्रावर कोहळा लागवड झाली असावी. यात गादीवाफे, पॉली मल्चिंग व संकरित वाण यांचा वापर केला आहे. कोहळ्याची एवढ्या मोठ्या क्षेत्रावर लागवड करताना मागील उन्हाळी हंगामातील एक एकरांवरील कोहळा लागवडीचा अनुभव उपयोगात आला. दर तोड्याला दोन ते तीन टन तर सतरा एकरांत ७० टन काकडीचे उत्पादन मिळाले. त्यातून मिळालेल्या उत्पन्नाने कोहळ्याचा उत्पादन खर्च कमी केला असून, कोहळ्याचा नफा वाढण्यास मदत मिळणार आहे.  आठ जणांचे कुटुंब राबते शेतीत  मगर यांना तीन मुले आहेत. ट्रॅक्टर, जेसीबी भाडेतत्त्वावर देणे व शेती अशा प्रकारे कामांचे वर्गीकरण त्यांच्या मुलांनी केले आहे. आठजणांचे कुटुंब शेतीत मशागत, पेरणीपासून ते काढणीपर्यंत राबते. त्यामुळेच श्रम हलके झाल्याचे मगर सांगतात. पूर्वी हे कुटुंब छोट्या घरात राहायचे. शेतीतील प्रगतीवरच बंगलेवजा घर बांधता आल्याचे समाधान मगर यांना आहे.   मगर यांच्या शेती नियोजनातील बाबी 

  • पीक फेरपालट
  • रासायनिक व सेंद्रिय खतांचा एकात्मिक वापर
  • काटेकोर जलव्यवस्थापन, ठिबक सिंचनाचा वापर 
  • आच्छादन तंत्र व एकात्मिक कीड-रोग व तण नियंत्रण
  • जागेवरच काही टन कलिंगड उपलब्ध  मागील ३० वर्षांपासून मगर कलिंगडाची शेती करतात. पारंपरिक पद्धतीने या पिकाचे एकरी १० ते १५ टन उत्पादन मिळायचे. तज्ज्ञांच्या सल्याने आधुनिक तंत्रांचा वापर सुरू केला. आज एकरी १८ ते २०  टन उत्पादन ते घेतात. विशेष म्हणजे विक्रीसाठी त्यांना अन्यत्र जावे लागत नाही. सुमारे २० एकरांवर उत्पादित काही टन कलिंगड जागेवरच मिळत असल्याने व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. त्यास किलोला ५ रुपयांपासून ८ रुपयांपर्यंत दर मिळतो.   मत्स्यशेती  कलिंगडातील उत्पन्नातून सुमारे एक एकरांत केव्हीकेच्या मार्गदर्शनाखाली तीन मत्स्यतलाव खोदले. त्यात रोहू, कटला, सायप्रिनस, टिलापिया या माशांचे संगोपन केले जाते. माशांना मोठी मागणी असल्याने यातून चांगली अर्थप्राप्ती होत असल्याचे मगर यांनी सांगितले.  शिकण्याची आस जपली  केव्हीकेमध्ये सातत्याने होत असलेली चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने, प्रशिक्षण वर्ग आदींमध्ये मगर यांचा सतत सहभाग असतो. सन २०१४-१५ मध्ये केव्हीकेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली एका वर्षात तीन पिके म्हणजेज भात- कलिंगड व त्यानंतर भुईमूग अशी पद्धती राबवून अत्यंत चांगले उत्पादन व उत्पन्न त्यांनी मिळवले.   पाण्यावर आधारित पीकपद्धती  कोकणपट्टीतील रायगड जिल्ह्यात खरिपात पुरेसे पर्जन्यमान असते. तसेच रोहा तालुक्‍यातून वाहणारी बारमाही नदी आणि कालव्यांची सोय असल्याने काही ठिकाणी पाण्याची मुबलकता आहे; परंतु काही ठिकाणी मात्र कालव्यांचे पाणी न पोचल्याने डिसेंबर-जानेवारीपासून पाण्याची उणीव भासू लागते. या समस्येवर मात करताना त्याला अनुकूल अशी पीकपद्धती मगर यांनी बसविली आहे.  अशी आहे त्यांची पीकपद्धती

  • स्वतःची दोन एकर शेती-एक एकर भात, एक एकर मत्स्यशेती
  • उर्वरित क्षेत्रात 
  • नोव्हेंबरच्या दरम्यान सुमारे १७ ते २० एकरांत कलिंगड. त्यानंतर फेब्रुवारीत भुईमूग-
  • मेच्या सुमारास काकडीसारखे पीक- अलीकडे त्याचे प्रमाण कमी
  • जोडीला ३० ते ४० देशी कोंबड्यांचे पालन
  • शेळीपालनाचे नुकतेच शेड उभारले आहे. 
  • शेतीतील व समाजसेवेतील उत्साह  भात, नाचणी, वरी, तीळ अशा पिकांचीही थोड्याफार प्रमाणात लागवड असते. मगर हे उत्साही  शेतकरी आहेत. यापूर्वी त्यांनी जिद्दीने आणि कष्टाने बटाटा, कांदा, भेंडी, कारली, शिराळी आदींचे प्रयोग केले आहेत. कृषी विभागांतर्गत ‘आत्मा’समितीचे ते सदस्य अाहेत. रोहाच्या केव्हीकेसाठी ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून कार्य करतात. स्थानिक शेतकऱ्यांच्या पुढाकारातून अलीकडेच स्थापन झालेल्या रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान संघटनेचे त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. तालुक्‍यातील अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची अविरत धडपड असते. रायगड जिल्हा परिषदेचा प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आदी प्रसारमाध्यमातून त्यांनी आपल्या शेतीचे तंत्र विषद केले आहे.   - अनंत मगर, ९२७३१११५५०   - डॉ. मनोज तलाठी, ९४२२०९४४४१ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, किल्ला- रोहा, जि. रायगड येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com