विविध उपक्रमांच्या माध्यमातून माणगाव झाले स्मार्ट ग्राम 

गावांच्या दुतर्फा झाडे, स्वच्छ रस्ते व एकी हीच माणगावची ओळख आहे.
गावांच्या दुतर्फा झाडे, स्वच्छ रस्ते व एकी हीच माणगावची ओळख आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या ग्रामस्थांनी विविध सोयीसुविधा व आधुनिक तंत्रज्ञान याद्वारे गावचा विकास साधला आहे. आर ओ पाणी सुविधा. बारमाही तलाव, स्मशान सुशोभीकरण, आरोग्य निवारण, सोशल मीडियाचा वापर आदीं विविध उपक्रम ग्रामस्थांनी यशस्वी करून दाखवले आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना असो की स्मार्ट ग्राम असो गावाने त्यात अग्रक्रमांक मिळवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव (ता. हातकणंगले) हे पंचगंगा नदीकाठी वसलेले छोटेसे गाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असल्याने गावाला ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. सन १९२० मध्ये २१ व २२ मार्च रोजी याच गावात बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद झाली. ऊस, सोयाबीन, गहू, भात, ज्वारी ही गावची मुख्य पिके आहेत. सोयीसुविधांबरोबरच सुधारित तंत्राचा वापर करून गावात सुधारणा करण्याचा चंग ग्रामस्थांनी बांधला. तो यशस्वीही झाला आहे. निधी उपलब्ध होर्इल त्या पद्धतीने सुविधा करण्यात आल्या. ग्रामस्थांसह गावातील काही संस्थांनीही मदतीद्वारे हातभार लावला. ग्रामपंचायतीचे गटप्रमुख व माजी उपसरपंच राजू मगदूम यांच्या परिश्रमातून गावात सुविधा निर्माण झाल्या. सध्या अनुसया भाटले सरपंच असून राजगोंडा पाटील उपसरपंच आहेत.  झाडाझुडपांनी सजलेला रस्ता  कोल्हापूर- इचलकरंजी मार्गावर माणगावला जाणारा फाटा लागतो. तिथून गावापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. या तीन किलोमीटरच्या अंतरात सुमारे दोनशे झाडे लावली आहेत. याद्वारे वनराई तयार झाली आहे. पक्ष्यांच्या घरट्यांसाठी निवारा झाला आहे. प्रत्येक झाडाला ठिबकद्वारे पाणी दिले आहे. हा संपूर्ण परिसरच सुखद, झाडाझुडपांनी सजलेला दिसतो.  आर ओ यंत्रणा  गावासाठी पंचगंगा नदीचे पाणी पिण्यासाठी आहे. पिण्याच्या दोन टाक्‍या, फिल्टर हाउस आहे. एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा होतो. ग्रामपंचायतीच्या अखत्यारित सहकारी तत्त्वावर शुद्ध पेयजल यंत्रणा उभारली आहे. यातून मिळणारे उत्पन्न ग्रामपंचायत पाण्याच्या व्यवस्थेवर खर्च करते. त्यातून वर्षभर गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो.  तलाव बनला बारमाही  गावात मोठा तलाव आहे. उन्हाळ्यात तो आटायचा. तलावाला बारमाही पाणी असले तर गावातील विहिरी, कूपनलिकांना पाणी कायम वर्षभर राहते. हे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने हा तलाव बारमाही करण्याबाबत प्रयत्न सुरू केले. या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. यामुळे पावसाचे पाणी वर्षभर साठण्याची शक्‍यता नव्हती. या तलावाशेजारुन काही शेतकऱ्यांच्या पाइपलाइन्स गेल्या आहेत.  वर्षातून एक- दोन वेळा नदीतून पाणीउपसा करणाऱ्या या पाइपलाइन्सचे पाणी तलावात सोडून तो बारमाही करण्यात आला. त्यामुळे गावातील जलस्रोतांना वर्षभर पाणी असते. तलावाभोवतालची जागा स्वच्छ करून नाना-नानी पार्कची उभारणी केली आहे. तलावाचे सुशोभिकरण करून बालोद्यान, खुली व्यायामशाळा, आसने, ज्येष्ठ नागरिकांसांठी फिरण्याची व्यवस्था केली आहे.  घनकचरा प्रकल्प  गावातील घंटा गाडी दररोज विविध ठिकाणी फिरून कचरा संकलित करते. गावातील कचऱ्यावर प्रक्रीया व्हावी या उद्देशाने गावाबाहेर घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी टाक्‍या बांधल्या आहेत. येत्या काही दिवसांतच प्रकल्प सुरू होणार आहे.  स्मशानभूमीचे सुशोभिकरण  माणगावची स्मशानभूमी अत्यंत स्वच्छ आहे. स्मशानशेडभोवती पेविंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत. बागेप्रमाणे नियोजनबद्ध झाडे लावण्यात आली असून त्यांना ठिबकद्वारे पाणी पुरविण्यात येते. ठिकठिकाणी बाकडी, हाय मास्क दिवे अशा सुविधा दिल्या आहेत. लांबून एखादी सुशोभित बाग असावी, अशी रचना स्मशानभूमीची केली आहे.  तक्रार निवारणासाठी व्हॉटस अॅप ग्रुप  प्रत्येक वॉर्डातील काही लोकांचा समावेश असलेला ग्रामपंचायत तक्रार निवारण हा व्हॉटस ॲप ग्रुप ग्रामपंचायतीने तयार केला आहे. पाणी, रस्ते, आरोग्य आदीबाबतची कोणतीही तक्रार ग्रामस्थ ग्रुपवर पोस्ट करतात. त्याचे छायाचित्र, व्हिडिओदेखील शेअर करतात. लोकप्रतिनिधी त्याचा ‘फॉलोअप’ घेतात. काम झाले की ग्रुप सदस्यांना त्याची कल्पना दिली जाते. सोशल मीडियाचा हा प्रभावी वापर ग्रामपंचायतीने केला आहे.  सीसीटीव्हींची नजर  विविध चौक, मार्ग आदी ठिकाणी सुमारे २५ सीसीटीव्ही कॅमरे लावले आहेत. यातून गावातील गैरप्रकारांना आळा बसला आहे. ग्रामपंचायतीच्या मुख्य कार्यालयात त्याचे स्क्रीन आहे.पोलिस पाटील, उपसरपंच आदींच्या मोबाइलवर इंटरनेट माध्यमाद्वारे कॅमेरातील हालचाली दिसतात. आठवडा बाजारातील चोरीच्या घटना तसेच वायफळ दंगा- मस्ती यावर मोठा प्रतिबंध आला आहे.  राज्यातील बाजारपेठचे दर संकेतस्थळावर  गावासाठी गरजेचे जे काही ‘हायटेक’ प्रयत्न करता येतील ते ग्रामपंचायतीने केले आहेत. गावाचे स्वतंत्र संकेतस्थळ (वेबसाइट) कार्यान्‍वित केले आहे. ती कायम ‘अपडेट’ असते. गावानजीक उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सेवा, आपत्कालीन प्रसंगात मदत करणाऱ्या व्यक्ती, त्यांचे क्रमांक, परिसरातील शैक्षणिक संस्थांचा डेटा, नोकरी संदर्भ आदी तपशील त्यावर उपलब्ध असतात. पुण्यासह अन्य बाजारपेठांतील बाजारभावदेखील वेबसाईटवर पोस्ट करून ग्रामस्थांना ते दररोज उपलब्ध केले जातात. मोबाइलच्या एका क्लिकवर ही इत्यंभूत माहिती कळते.  माणगाव दृष्टीक्षेपात 

  • सिंचनाखाली सुमारे ६३६ हेक्‍टर 
  • कोरडवाहू ३८७ हेक्‍टर 
  • लोकसंख्या ८९८८, कुटूंबे- १६४४ 
  • साक्षरतेची टक्केवारी- ९८ टक्के 
  • रोजगार असलेली टक्केवारी ८० टक्के 
  • गाव औद्योगिक वसाहतीत येत असल्याने अनेक छोटे- मोठे व्यवसाय 
  • चार सूतगिरण्या 
  • दूध संकलन केंद्रे- ७ 
  • कृषी उपकरणे तयार करणारी युनिटस 
  • आरोग्य सेवा 

  • प्रत्येक हंगामात रोग निर्मूलनासाठी औषध फवारणी 
  • ठरावीक कालावधीनंतर पाण्याचे नमुने घेऊन परीक्षण 
  • जलशुद्धीकरणासाठी सातत्याने प्रयत्न 
  • गावातील समितीमार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी 
  • ठळक सुविधा 

  • प्रत्येक गल्लीत पेव्‍हिंग ब्लॉक्स 
  • बंदिस्त गटारींमुळे दुर्गंधीपासून मुक्ती 
  • संपूर्ण हागणदारीमुक्त गाव 
  • मुख्य मार्गांवरील अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा  
  • पुरस्कार 
  • सन २००५-०६ पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग. 
  • सन २०१८-१९ मध्ये या अभियानात द्वितीय क्रमांक 
  • महात्मा गांधी तंटा मुक्त पुरस्कार 
  • महाराष्ट्र शासन स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक 
  • यशवंत सरपंच पुरस्कार 
  • सन २००९-१०- तंटामुक्ती व ९ लाख २५ हजार रुपये बक्षीस 
  • संपर्क- राजू मगदूम-९८२२५६६६८८ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com