हळदीला आधार

"गेल्या तीन वर्षांत हळदीत फारसा पैसा मिळाला नाही. केवळ पारंपरिक पीक आहे, बेणे मोडू नये म्हणून हळदीची लागण करतोय. दोन दोन वर्षे हळदचा स्टॉक ठेवून काही फायदा झाला नाही. त्यामुळे हळदीचे काही क्षेत्र उसाखाली वळते होतेय. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. दीर्घकाळपर्यंत जमिनीत कमी प्रमाणात ओल होती. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव आहे. सध्या पीक हिरवे दिसतेय. पण आत मुळे किती खराब झाली, त्यावर पिकाचा उतारा ठरेल."
AGRO MONEY
AGRO MONEY

गेल्या दोन हंगामांपासून हळदीच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसत असून, सर्वसाधारण कल मंदीचाच राहिला. दुसऱ्या फलोत्पादन पाहणीनुसार २०१६-१७ मध्ये १० लाख टन हळदीचे उत्पादन झाले. मागील दोन वर्षांच्या तुलनेत उत्पादनात सुमारे ६ टक्के वाढ झाली. यंदाचा आणि गेल्या वर्षीचा हंगाम हळद उत्पादकांसाठी तोट्याचा ठरला. या पार्श्वभूमीवर पुढील हंगामातील उत्पादन आणि शिल्लक साठा मिळून राहणारी एकूण उपलब्धता, देशांतर्गत मागणी आणि संभाव्य निर्यात यावर बाजारभावाची चाल अवलंबून राहील. २०१६-१७ मध्ये देशातून १.१६ लाख टन हळदीची निर्यात झाली. त्याचे मूल्य सुमारे १२०० कोटी रुपये होते. वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे हळदीची निर्यात वाढल्याचे केंद्रीय मसाला बोर्डाने म्हटले आहे. नऊ महिन्यांचे पीक असलेल्या हळदीची लागवड साधारपणे मे महिन्यापासून सुरू होते. सर्वसाधारणपणे मार्चपासून आवक सुरू होते. दक्षिणेत आगाप जातींच्या पिकांची आवक संक्रांतीनंतर सुरू होते. यंदा जानेवारीपासूनच हळदीमध्ये मंदीचा कल सुरू झाला होता. मागील ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान निजामाबाद बाजारात ७ ते ८ हजार प्रतिक्विंटलदरम्यान बाजारभाव होते. फेब्रुवारीपासून बाजार तुटायला प्रारंभ झाला. मे महिन्यात साडेपाच हजाराचा नीचांक बाजाराने गाठला. पुढे जूनपासून बाजार सावरला. आजघडीला निजामाबाद बाजारात भाव साडेसात हजारांच्या आसपास आहे. एनसीडीईएक्स सप्टेंबर वायदा ७ ते ८ हजार या भाव पातळीत फिरत आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यानंतर बाजारात तेजी दिसली. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात वायदा ८ हजारांपर्यंत पोचला होता. मात्र तेथे तो टिकला नाही. उच्चांकी पातळीवरून वायद्यात १० टक्क्यांनी मंदी आली आहे.  या वर्षी हळदीच्या बेण्याचे भाव अडीच हजार प्रतिक्विंटलपर्यंत खाली गेले. बेण्याला ग्राहकच नव्हता. गेल्या पाच-सहा वर्षांतील सर्वांत कमी दर बेण्याला मिळाला. सातारा जिल्ह्यातील वाई हा हळदीचा पारंपरिक विभाग आहे. दरवर्षी येथे १५ मेदरम्यान लागणी सुरू होतात. येथील शेतकरी महादेव रामचंद्र राजापुरे यांनी दोन एकरांवरील हळद लागवड एक एकरावर घटवली आहे. "गेल्या तीन वर्षांत हळदीत फारसा पैसा मिळाला नाही. केवळ पारंपरिक पीक आहे, बेणे मोडू नये म्हणून हळदीची लागण करतोय. दोन दोन वर्षे हळदचा स्टॉक ठेवून काही फायदा झाला नाही. त्यामुळे हळदीचे काही क्षेत्र उसाखाली वळते होतेय. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. दीर्घकाळपर्यंत जमिनीत कमी प्रमाणात ओल होती. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव आहे. सध्या पीक हिरवे दिसतेय. पण आत मुळे किती खराब झाली, त्यावर पिकाचा उतारा ठरेल." हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्ह्यात पिकाची अवस्था बिकट आहे. " वसमत विभागात सुमारे ५० टक्के पीक नुकसानीत आहे. अजूनपर्यंत पुरेसा पाऊस नाही. ज्यांच्याकडे ठिबकची साधने आहेत, त्यांनी कसेबसे पावसाच्या आशेवर पीक जीवंत ठेवलं आहे. पुढच्या वर्षी हळदीचा उतारा कमी येईल. पुढील काळात जोरदार पाऊस झाला तरच पीक येण्याची आशा आहे," असे वसमत येथील शेतकरी प्रसाद पांडे सांगतात. `महाराष्ट्रातील विदर्भ- मराठवाड्याप्रमाणे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणातही पावसाने ओढ दिली होती. चालू आठवड्यात पाऊस सुरू झाला असला, तरी नुकसान व्हायचे ते झाले आहे. यंदा मेमध्ये तापमान जास्त होते. त्यामुळे बेणे खराब झाले. लागवडी कमी प्रमाणात झाल्या. लागवडीच्या आधी बाजारभाव साडेपाच हजार प्रतिक्विंटलपर्यंत घटले होते. हे मंदीचे वातावरण पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवडीत हात आखडता घेतला, असे मराठवाड्यातील व्यापाऱ्यांचे निरीक्षण आहे. हळदीचे भाव २०१० च्या एप्रिल महिन्यात तेजीत होते. सांगली बाजारपेठेत २९ मे २०१० रोजी १६०० रु. प्रति क्विंटल इतक्या विक्रमी भावाची नोंद आहे. मात्र त्यानंतरच्या वर्षात बाजारभाव सातत्याने दबावात राहिले आहेत. जुना उच्चांक बाजार अद्याप मोडू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर, यंदाची पावसाची स्थिती पाहता २०१७-१८ मध्ये बाजारभाव नक्कीच किफायती राहतील, असे सांगलीतील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या तीन - चार वर्षांत हळदीमध्ये स्टॉकिस्टचे मोठे नुकसान झाले. आता स्टॉकिस्ट पुन्हा सक्रिय झाले आहेत. मागचे नुकसान पुढच्या हंगामात भरून काढता येईल, या अपेक्षेने स्टॉकिस्ट आपल्याकडचा माल लवकर विकण्याची घाई करणार नाहीत, असे दिसते.

- दीपक चव्हाण (लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com