आता मदार रब्बीवर

रब्बी हंगाम आढावा बैठक आजच पुणे येथे होणार असल्याने क्षेत्रवाढीनुसार बी-बियाणे, तसेच इतर निविष्ठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून गरजेनुसार वितरणाचे नियोजन कृषी विभागाने करायला हवे.
संपादकीय
संपादकीय

मॉन्सून यावर्षी उशिरा परतणार, असा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तविला होता, त्यास आता पुष्टी मिळाली आहे. राजस्थानच्या पश्‍चिम भागात अजूनही पाऊस पडत असल्यामुळे येत्या आठवडाभरात तरी मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार नाही, हा पाऊस थांबल्यावरच तो सुरू होईल, असा आत्ताचा अंदाज आहे.

खरे तर मॉन्सूनचा परतीचा प्रवास हा सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या मध्यावर (15 सप्टेंबर) सुरू होतो. मॉन्सूनच्या या उलट प्रवासास दीड महिना लागतो. परंतु मागील एका दशकातील मॉन्सूनचा परतीचा प्रवास पाहता, बहुतांश वेळा तो सप्टेंबरच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात सुरू होऊन ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यात पाऊस पडत आहे. यावर्षीही सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान राज्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याबाबतचा अंदाज आहे.

परतीच्या पावसावर राज्यातील रब्बी हंगामाचे भवितव्य ठरते. यावर्षी पावसाच्या उशिरा माघारामुळे रब्बी हंगामातील क्षेत्र सुमारे दोन लाख हेक्‍टरने वाढेल, असा अंदाज आहे. चालू खरिपापासून अपेक्षित लाभ मिळणार नाही, असेच चित्र दिसते. पावसाच्या लहरीपणाने मूग, उडदाची उत्पादकता घटली. सोयाबीन कापसालाही रोग-कीडीने ग्रासले असल्यामुळे ही पिकेही अडचणीत आहेत. शेतीचा एक हंगाम साधला नाही, तर त्याची कसर दुसऱ्यात काढायची, असा विचार करून शेतकरी कंबर कसतोय. परंतु मागील काही वर्षांपासून मॉन्सून नाही तर मार्केट यांच्या कचाट्यात हंगाम दर हंगाम शेतकऱ्यांचा तोटाच होतोय.

निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड कोरडी हवा, असे रब्बी हंगामात पिकांना पोषक वातावरण असते. या हंगामात खरिपाच्या तुलनेत रोग-किडींचा प्रादुर्भावही कमी असतो. विशेष म्हणजे पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे होणाऱ्या नुकसानाचा धोकाही रब्बी हंगामात कमीच असतो. त्यामुळेच रब्बी हंगाम अधिक शाश्‍वत मानला जातो. राज्याचा विचार करता रब्बी ज्वारी, हरभरा, करडई ही पिके उपलब्ध ओलावा अथवा संरक्षित सिंचनावर घेतली जातात. तर गहू, मका, वाटाणा आणि भाजीपाला ही पिके खात्रीशीर पाण्याच्या उलब्धतेवर घेतली जातात.

यावर्षी उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण चांगले राहणार आहे. विदर्भ वगळता बहुतांश भागांतील धरणेही बऱ्यापैकी भरली असल्याने कमी तसेच अधिक पाणी लागणाऱ्या पिकांचेही क्षेत्र रब्बी हंगामात वाढणार आहे. रब्बी हंगाम आढावा बैठक आजच पुणे येथे होणार असल्याने क्षेत्रवाढीनुसार बी-बियाणे, तसेच इतर निविष्ठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून गरजेनुसार वितरण याबाबतचे नियोजन कृषी विभागाने करायला हवे.

कर्जमाफीच्या पार्श्‍वभूमीवर बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज मिळाले नाही. चालू खरिपापासूनही फारशा मिळकतीची अपेक्षा नाही. अशा वेळी रब्बी हंगामासाठी तरी पीककर्जाचा मार्ग मोकळा व्हायला हवा. त्याकरिता कर्जमाफीची प्रक्रिया शासनाला तत्काळ पूर्ण करून रब्बीसाठी कर्ज उपलब्ध करून द्यायला हवे.

पीकविम्याच्या बाबतीतही खरीप हंगामात जसा घोळ घातला तसा रब्बीमध्ये अपेक्षित नसून, अधिकाधिक रब्बीचे क्षेत्र पीकविम्याद्वारे कव्हर व्हायला हवे. रब्बी हंगामासाठी केवळ पाणी उपलब्ध असून चालणार नाही; शेती सिंचनासाठी राज्यभर विजेचा अखंड आणि पूर्ण क्षमतेने पुरवठा व्हायला हवा. असे झाले तरच रब्बीसाठीच्या पोषक वातावरणाचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com