फायदेशीर शेतीचे आदर्श मॉडेल

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही फायदेशीर शेतीचे आदर्श उदाहरण बीड जिल्ह्यातील विश्‍वनाथ बोबडे या शेतकऱ्याने राज्यभरातील अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे.
फायदेशीर शेतीचे  आदर्श मॉडेल

कमी शेती क्षेत्र, पाणीटंचाई, निविष्ठांचे वाढलेले दर, मजूरटंचाई आणि वाढलेली मजुरी, शेतीमाल विक्रीतील अडचणी आणि बाजारात मिळणारे कमी दर या समस्या सर्वत्र आढळून येत आहेत. भविष्यात या समस्यांची तीव्रता वाढतच जाणार आहे. हवामान बदलाच्या काळात नैसर्गिक आपत्तींची वारंवारता आणि तीव्रताही वाढत आहे. या समस्या सोडविण्याकरिता शासनाचे आपल्या परीने प्रयत्न चालू आहेत; परंतु या समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनीही वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करायला हवेत.

आपण अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करत राहिलो तर शेतीचे विविध मार्गांनी नुकसान होऊन ती अधिकाधिक तोट्यातच जाणार आहे. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही फायदेशीर शेतीचे आदर्श उदाहरण बीड जिल्ह्यातील विश्‍वनाथ बोबडे या शेतकऱ्याने राज्यभरातील अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. एक एकर क्षेत्रातच हंगामनिहाय विविध भाजीपाला पिके घेऊन मॉन्सून आणि मार्केटची जोखीम त्यांनी कमी केली आहे.

कोणत्याही हंगामात शेतात तीन-चार पिके असल्याने नैसर्गिक आपत्ती अथवा कीड-रोगांचा अचानक उद्रेक होऊन एखादे पीक हातचे गेले तरी उर्वरित पिकांचा आधार राहतो. भाजीपाला पिकांची बाजारपेठही भयंकर अनिश्‍चित असते. कधी कुठल्या भाजीपाल्याचे दर कोसळतील अथवा कुठल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळेल, हे सांगताच येत नाही. अशा वेळी एकाच हंगामात दोन-तीन भाजीपाला पिकांची काढणी सुरू असेल, तर एखाद्या भाजीपाला पिकाचे दर उतरले तरी इतर पिकांचे पाठबळ राहते. हंगामनिहाय विविध भाजीपाला पिकांमुळे हातात सतत पैसा खेळत राहतो. त्यामुळे आर्थिक चणचण भासत नाही. जिल्ह्याचे ठिकाण जवळ असल्याने रोज ताजा, दर्जेदार भाजीपाला बाजारात पोचवत असल्याने त्यांना दरही चांगला मिळतो. बोबडे यांनी प्रथम शेतीला पाण्याची सोय करून ती शाश्‍वत केली. शेतीत ठिबक सिंचन, गादीवाफा पद्धती त्यावर पॉलिमल्चिंगचा वापर ते करतात. त्यामुळे पाणी, रासायनिक खते यांचा कार्यक्षम वापर होतो, शेतात तणांचा आणि रोग-कीडींचा प्रादुर्भाव होत नाही, पिकांचे पोषण चांगले होऊन उत्पादकता वाढते. महत्त्वाचे म्हणजे आपल्या शेतात उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी विविध प्रयोग ते सातत्याने करीत राहतात. पहिल्याच प्रयत्नात प्रयोग यशस्वी होतो, असे नाही. परंतु मागील झालेल्या चुका अथवा आलेल्या अनुभवातून पुढील प्रयोगात सुधारणा करून ते यशस्वी करतात. या वर्षी त्यांनी टोमॅटो-फ्लॉवर-दोडका अशी तीन आंतरपिके घेऊन हा प्रयोग यशस्वी केला आहे.

कमी शेती क्षेत्रात पिकांची संख्या आणि घनता वाढवून उत्पादन वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कमी शेती क्षेत्र असेल आणि ते पारंपरिक पद्धतीने कसले जात असेल, तर घरच्या लोकांना केवळ तीन ते चार महिने रोजगार मिळतो. मात्र, हंगामनिहाय विविध पिके घेतली तर घरच्या लोकांना वर्षभर काम मिळते शिवाय कामाच्या स्वरूपानुसार अशी शेती इतरांनाही रोजगार पुरवू शकते. बोबडे यांचे हंगामनिहाय विविध पिकांचे नियोजन असो की आंतरपिकांचे प्रयोग हे करणे काहीच अवघड नाही.

जिरायती शेतीतसुद्धा एका हंगामात पारंपरिक पिकांमध्ये (अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया) असे प्रयोग राज्यभरातील शेतकरी करू शकतात. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांना फळे-भाजीपाला अशा अनेक पिकांचे पर्याय आहेत. बागायती शेतीतून पिकांची उत्पादकता वाढवायची म्हणजे त्यात अत्याधुनिक तंत्राचा वापर (सूक्ष्म सिंचन, फर्टिगेशन, पॉलिमल्च तंत्र) आता गरजेचाच ठरतोय. बोबडे यांनी फायदेशीर शेतीची दिशा दाखविली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपली वाटचाल केल्यास शेतीतील अनेक अडचणी दूर होऊन शेती फायदेशीर ठरेल. .................

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com