agrowon agralekh on sustainable way of self sufficiency in fuel | Agrowon

इंधन स्वयंपूर्णतेचा शाश्वत मार्ग
विजय सुकळकर
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

जैवइंधनाबाबतच्या शाश्वत धोरणात तेल कंपन्यांकडून इथेनॉलच्या नियमित खरेदीसह कारखान्यांना परवडणाऱ्या दराचे धोरणही ठरवावे लागेल.

इंधनाशिवाय गती नाही आणि गतीशिवाय प्रगती नाही, हे सत्य आहे. वाहने असो की उद्योग-व्यवसायातील यंत्रे-अवजारे. इंधन अथवा विजेशिवाय त्यांची चाके चालतच नाहीत. भविष्यात इंधन आणि विजेची मागणी वाढतच जाणार आहे. अशावेळी जीवाश्म इंधन तसेच कोळसा जाळून वीजनिर्मिती या पारंपरिक, अशाश्वत स्रोतांवर विसंबून राहता येणार नाही. अशा इंधन आणि विजेच्या वापरातून पर्यावरणावर अत्यंत गंभीर परिणामही होत आहेत. अशा वेळी जैवइंधन तसेच अपारंपरिक वीजनिर्मितीला देशात प्राधान्य दिल्याशिवाय आता पर्यायच नाही. केंद्र सरकारचा भर शाश्वत इंधन तसेच विजेच्या स्रोतांवर असल्याचे बोलले जाते. परंतु यांस पूरक ध्येय-धोरणे सध्या तरी राबविली जात नाहीत. आगामी काळात जैवइंधन-इथेनॉलच्या वापरातून नवीन ऊर्जानिती निर्माण होणार असल्याने याबाबतचे शाश्वत धोरण आणणार असल्याचे पुढे येथील ‘वाहतुकीसाठी इथेनॉल’ या परिषदेमध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले. शेतमालाच्या टाकाऊ भागांपासून जैवइंधन (दुसऱ्या टप्प्यातील इथेनॉल) करून आपली इंधनाची गरज भागेल; शिवाय यातून  शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, अशी मांडणी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी वारंवार करतात. खरेच या दोन्ही बाबी शाश्वत धोरणाशिवाय शक्य नाहीत, त्यामुळे असे धोरण लवकरात लवकर आणून त्याची अंमलबजावणी सुरू करावी. 

सध्या इंधनाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही. इंधनावरील आयात शुल्कापोटी देशात सात लाख कोटी खर्च करावे लागतात. तर दुसरीकडे तेलबिया असो की भात, गहू, कापूस, तूर यांच्या टाकाऊ पदार्थांमध्ये जैवइंधननिर्मितीची मोठी क्षमता असून, ते केले जात नाही. विशेष म्हणजे या शेतमालास हमीभावाचादेखील सध्या आधार मिळत नाही. इथेनॉलच्या बाबतीत बोलायचे झाले तर तेल कंपन्यांना पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु साखर कारखान्यांकडून अपेक्षित प्रमाणात इथेनॉलचा पुरवठा होत नसल्याने ते पाच टक्क्यांपर्यंतच मिसळले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर मोलॅसिसपासून तसेच शेतातील टाकाऊ पदार्थांपासून इथेनॉलनिर्मिती करावी लागेल. मागील काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरातील इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांची संख्या कमी झाल्यामुळे तेल कंपन्यांच्या इथेनॉल मागणीच्या तुलनेत कारखान्यांकडून निम्माच पुरवठा होत आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे म्हणजे इथेनॉलचे दर. सध्या मोलॅसिसचे दर कमी असल्यामुळे इथेनॉलनिर्मिती परवडत असली तरी बहुतांश वेळा इथेनॉलचा प्रतिलिटर उत्पादन खर्च आणि मिळणारा दर सारखाच असतो. आठवड्यापूर्वी प्रतिलिटर सुमारे दोन रुपये इथेनॉलच्या दरात वाढ करण्यात आली. परंतु त्याचवेळी मळी वाहतुकीचा कर वाढवून एका हाताने देताना दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे काम केले आहे.   

जैवइंधनाबाबतच्या शाश्वत धोरणात तेल कंपन्यांकडून इथेनॉलच्या नियमित खरेदीसह कारखान्यांना परवडणाऱ्या दराचे धोरणही ठरवावे लागेल. आगामी वर्षात साखरेचे उत्पादनवाढीचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी देशाला गरजेपुरते साखरेच्या उत्पादनाचे नियोजन करून उर्वरित रसापासून थेट इथेनॉल बनविण्याचेही धोरण असावे. शेतातील टाकाऊ पदार्थांपासून जैवइंधननिर्मिती नव्याने होत असल्याने त्याकरिता शेतकऱ्यांपासून ते रिफायरिज स्थापन करण्यापर्यंत सर्व घटकांना पूरक असे धोरण असायला हवे. अशा पूरक धोरणातूनच देश इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. 

इतर संपादकीय
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
समन्यायी जल-व्यवस्थापनाला पर्याय नाही जलव्यवस्थापन हा केव्हापासूनच कळीचा बनलेला प्रश्न...
जलव्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळपेयजल, सिंचन व औद्योगिक पाणी वापर हे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...