रॅगवीडचा विळखा वेळीच ओळखा

कुठलेही विदेशी तण, घातक किडी, सूक्ष्मजीव यांचा देशात प्रवेश रोखण्यासाठी नियम, कायदे आहेत. परंतु त्यांचे काटेकोर पालन होत नाही. यंत्रणेचेही याकडे दुर्लक्ष होत आहे, ही बाब गंभीर म्हणावी लागेल.
संपादकीय
संपादकीय

गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत घातक, विषारी अशा विदेशी तणांचा शिरकाव आपल्या देशात होत आहे. गाजर गवत, कुरडू, रानमोडी, जलपर्णी ही याबाबतची अलीकडची काही उदाहरणे आहेत. या तणांचा देशात शिरकावच झाला नाही तर त्यांचा झपाट्याने प्रसार होऊन आज ही तणे सर्वत्र पसरली आहेत.

शेतजमिनीबरोबर जिथे कुठे पडीक जागा असेल तिथे गाजर गवत उगवलेले दिसते. रानमोडी हे प्रामुख्याने जंगल-वनात वाढणारे तण. या तणाने कोकणासह संपूर्ण पश्‍चिम घाट व्यापून ते आता शहरे आणि शेतातही पोचले आहे. जलपर्णी तर आपल्याकडे शोभिवंत वनस्पती म्हणून विदेशातून आणली गेली असल्याचे संदर्भ सापडतात.

आज देशभरातील बहुतांश जलसाठ्यांमध्ये जलपर्णी आढळते. या तणांचे नियंत्रण करणे हे शेतकऱ्यांसह सर्वांचीच डोकेदुखी होऊन बसले असताना राज्यात रॅगवीड नावाच्या नवीनच तणाची नुकतीच भर पडली आहे. विदेशी तणांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढला असून पिकांचे उत्पादन घटत आहे. चारा, खाद्य गवतात ही विषारी तणे मिसळल्याने त्याचा दुग्धोत्पादनावर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. या तणांच्या ऍलर्जीचा मानवासह पशुधनाला त्रास होतोय.

महत्त्वाचे म्हणजे जलपर्णी, रानमोडी ही तणे इतर वनस्पतीला वाढूच देत नसल्याने आपली जैवविविधता धोक्‍यात आली आहे. विदेशी तणांचे नैसर्गिक शत्रू (पशू-पक्षी-कीटक) आपल्याकडे उपलब्ध नसतात. तसेच नवीन तणाबाबत सुरवातीच्या काळात प्रभावी नियंत्रणाचे उपायसुद्धा मिळत नाहीत.

रॅगवीड हे मूळचे उत्तर अमेरिकेतील तण आहे. तेथून ते युरोपसह जगभर पसरत आहे. आपल्या देशात एका दशकापूर्वी ईशान्य भारतात आढळून आलेल्या या तणाकडे शासनासह सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे तण देशभर पोचत आहे. ऍग्रोवनमध्ये याबाबत माहिती आल्यानंतर राज्याच्या विविध भागातून आमच्याकडेसुद्धा असेच तण दिसत असल्याच्या प्रतिक्रिया वाचक कळवित आहेत.

खरे तर कुठलेही विदेशी तण, घातक किडी, रोगास कारणीभूत सूक्ष्मजीव यांचा देशात प्रवेश रोखण्यासाठी नियम, कायदे आहेत. प्लॅंट क्‍वारंटाईन नावाचा स्वतंत्र विभाग यावर काम करतो. परंतु नियम-कायद्यांचे काटेकोर पालन होत नाही, यंत्रणेचेही याकडे दुर्लक्ष होत आहे, ही बाब अत्यंत गंभीर म्हणावी लागेल.

रॅगवीड हे तण सूर्यफुलांच्या बिया तसेच पशुपक्ष्यांच्या खाद्यातून देशात येत असेल तर त्यास अटकाव घालणे अवघड नाही. आयात केल्या जाणाऱ्या या पदार्थांची कसून तपासणी करून पुढील काळात या तणाच्या बिया देशात येणार नाहीत, हे पाहावे. तसेच ज्या ज्या भागात रॅगवीड तणाचा प्रसार झालेला आहे, त्या भागांत कृषी विभागाने या तणाची शेतकऱ्यांना ओळखी पटावी यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घ्यायला हवा.

प्रादुर्भावग्रस्त परिसरात ताबडतोब सर्वेक्षण करून त्याचा पुढील फैलाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. या तणाच्या प्रभावी नियंत्रणासाठी संशोधनाचे काम हाती घेऊन एकात्मिक नियंत्रणाचे उपाय द्यायला हवेत. विदेशी तणांबाबत यापूर्वीचे आपले अनुभव अत्यंत वाईट आहेत. विषारी रॅगवीडचा विळखा देशाला पडेपर्यंत त्याच्या कायमस्वरूपी निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com