रानफुलांची व्यावसायिक वाट

कास पठारावरील रानफुलांवर संशोधन आणि अभ्यासातून त्यांची व्यावसायिक लागवड शक्‍य झाल्यास त्यांचे संवर्धन तर होईलच शिवाय शेतकऱ्यांना आर्थिक मिळकतीचे वेगळे स्त्रोत उपलब्ध होतील.
संपादकीय
संपादकीय

जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या कास पठारावरील अत्यंत आकर्षक, अमूल्य आणि दुर्मिळ अशा रानफुलांवर संशोधन करून त्यांना व्यावसायिक लागवडीत आणण्यासाठी संशोधन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे पुष्प संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी स्पष्ट केले. खरे तर अशा प्रकारचा विचार वन, उद्यानविद्या तसेच पुष्प संशोधन विभागाला या अगोदरच यायला पाहिजे होता. आता उशीर झालाच आहे तर हा संशोधन प्रकल्प लवकर सुरू करायला हवा.

भारत हा वनस्पती, प्राणी विविधतेत अत्यंत समृद्ध असा देश आहे. या जैवविविधतेबाबतचे संशोधन तर दूरच परंतु वन, पर्यावरण संवर्धनाकडे देशात कमालीचे दुर्लक्ष झाल्याने अनेक वनस्पती, वन्यजीव नष्ट झाले आहेत. तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जैवविविधतेचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा सर्वात अगोदर पश्‍चिम घाट डोळ्यासमोर येतो. याच पश्‍चिम घाटातील कास पठाराला तर जैवविविधतेचा खजिना मानले जाते. विशिष्ट कालावधीत या पठारावर येणारी अत्यंत मोहक अशी असंख्य रानफुले संशोधनाच्या बाबतीत मात्र, तेवढीच दुर्लक्षित राहिली आहेत. त्यामुळे या रानफुलांचा पर्यटनाशिवाय इतर व्यावसायिक उपयोग काही झालेला नाही. 

जैवविविधतेचे संवर्धन अथवा अभ्यास हे मूलभूत विज्ञानात मोडते. अलीकडच्या व्यावहारीक विज्ञान अथवा तंत्रज्ञानाच्या युगात जैवविविधतेतून व्यावसायिक लाभ हा विषय देशात मागेच पडत गेला. दरम्यानच्या काळात अनेक प्रगत देशात मात्र यावर भरपूर काम झाले. त्यामुळे आपल्या देशातील अनेक आकर्षक फुले, शोभेच्या वनस्पती इंग्लडसह जगभरात पोचल्या. बाहेर देशात त्यावर भरपूर संशोधन होऊन त्यांच्या विविध जाती विकसित करण्यात आल्या आहेत. यातीलच काही शोभेच्या वनस्पती, फुलझाडांची लागवड आपण विदेशी म्हणून बागेत, रस्त्याच्या कडेने हौशीने करत आहोत.

पश्‍चिम घाटात ४९० प्रकारची वृक्ष आहेत. त्यातील ३०० वृक्ष जगाच्या पाठीवर फक्त याच घाटात आढळतात. पश्‍चिम घाटात ७० ते ८० प्रकारचे तेरडे आहेत. त्यातील ७ ते ८ प्रकार कास पठारात आढळतात. असे असताना आपल्या बागेत मात्र आपण यापैकी एकही तेरडा आणू शकलो नाही. आपण बागेत जे तेरडे लावतो ते बहुतांश सर्व विदेशी आहेत. कास पठारावरील आकर्षक रानफुलांवर संशोधन आणि अभ्यासातून त्यांची व्यावसायिक लागवड शक्‍य झाल्यास त्यांचे संवर्धन तर होईलच शिवाय ही फुलझाडे आपल्या बागेत, रस्त्याच्या कडेला येऊन त्यांची शोभा वाढेल. अशा फुलांच्या देशांतर्गत बाजारातील विक्रीतून अथवा निर्यातीतून शेतकऱ्यांना आर्थिक मिळकतीचे वेगळे स्त्रोत उपलब्ध होतील.

बारीपाड्यासारख्या आदिवासी बहुल भागात तेथील शेतकऱ्यांनी सुमारे १५० रानभाज्यांचे संवर्धन करून त्यांचे आहारातील महत्त्व लोकांना पटवून दिले आहे. त्यामुळे या भाज्या लोकांच्या आहारात येऊन तेथील शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतो आहे. असेच काम रानफुलांच्या बाबतीत व्हायला हवे. रानफुलांच्या संशोधनात तेथील स्थानिक गावकऱ्यांचा सहभागही महत्त्वाचा राहणार आहे. कारण तेथील काही फुले दोन वर्षांनी तर काही पाच ते सात वर्षांनी फुलतात. इतर रानफुलांच्या बाबतीतही त्यांचे बीज, उगवण, फुलांचा कालावधी, त्यांचे परागीभवन, विविध रानफुलांना लागणारे विशिष्ट वातावरण याबाबत स्थानिकांकडून उपयुक्त माहिती संशोधकांना मिळू शकते.

बहुतांश रानफुले पावसाळ्यात फुलत असली तरी काही उन्हाळ्यासारख्या शुष्क वातावरणातही फुलतात. त्याचाही अभ्यास व्हायला हवा. पश्‍चिम घाट परिसरात कास पठारासारखी १०० हून अधिक ठिकाणे असल्याचे बोलले जाते. ते शोधून तेथील जैवविविधतेवर संशोधकांनी प्रकाश टाकायला हवा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com