अंदाजाच्या पलीकडे...

ॲक्शनेबल फोरकास्ट अनेक प्रगत देशांत राबविले जात असून, त्यांना नैसर्गिक आपत्तींमध्ये जीवित-वित्तहानी टाळता आली अथवा कमी करता आली आहे.
sampadkiya
sampadkiya

हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची मालिका चालू आहे. पावसाळ्यात वेळेवर पाऊस नाही, हिवाळ्यातून थंडी गायब झाली आहे. हिवाळ्यानंतर गारपिटीसह जोरदार पाऊस तर उन्हाळ्यात सातत्याने ढगाळ वातावरण व वादळी पाऊस अशी विचित्र हवामान परिस्थिती आपण अनुभवतोय. सातत्याच्या नैसर्गिक आपत्तींमुळे देशभरातील शेतकऱ्यांना शेती नकोशी झाली आहे. यापुढील परिस्थिती तर अजून भीषण आहे. हवामान बदलामुळे दक्षिण आशियात खासकरून भारतामध्ये २०५० पर्यंत वीज, पाणी आणि अन्नधान्याच्या उपलब्धतेवर विपरित परिणाम होणार आहे. देशातील प्रमुख पिकांच्या उत्पादकतेत घट होईल, रोगराई वाढेल. या आपत्तींमुळे गरीब देश आणि गरीब जनतेची दैना उडेल, असा इशारा ‘इंटर गव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ने दिला अाहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी हवामान विभाग, केंद्र-राज्य शासन यांच्या समन्वयातून उपाय योजना कराव्या लागतील, अशी सूचनाही या पॅनेलने सुमारे चार वर्षांपूर्वी केली आहे.

आपल्याला हवामान बदलाचे चटके बसत असूनदेखील याबाबत हवामान विभाग आणि शासनालाही गांभीर्य दिसत नाही. सध्या भारतीय हवामान खाते केवळ हवामानाचा अंदाज वर्तवते. हा अंदाज माध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचतो. कृषी खात्याच्या पोर्टलद्वारे काही शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे हवामान अंदाज कळतो. हवामान अंदाजाचे स्थानिक परिणाम काय होतील, याबाबत अंदाजात स्पष्टता नसते. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे हवामान विभाग, केंद्र - राज्य शासन यांच्यात कुठलाही समन्वय नसल्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतीचे अतोनात नुकसान होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान अंदाजाचा संदेश (एसएमएस) त्यांच्या भाषेतून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय हवामान खात्याने हाती घेतला आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी देशातील प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात हवामान विभागाचे दोन प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत आहेत. आता केवळ हवामानाचा अंदाज देण्यात येणार नसून त्याचा स्थानिक लोकांवर, पिकांवर काय प्रतिकूल परिणाम होणार, ते टाळण्यासाठी काय उपाय योजना करायला हव्यात, हेदेखील हवामान विभाग थेट शेतकऱ्यांना सुचविणार आहे. खरे तर बदलत्या हवामान काळात वाढत्या नैसर्गिक आपत्तींपासून नुकसान टाळायचे असेल तर अशीच यंत्रणा आवश्यक होती. याबाबत आता घोषणा झाली, त्यामुळे त्याचे स्वागतच करायला हवे.

सध्या पाऊसमान असो अथवा इतर कोणताही हवामान घटक गाव, शिवारनिहाय बदलत आहे. अशा परिस्थितीमध्ये हवामान विभागाकडून आलेला अंदाज अथवा नैसर्गिक आपत्तीबाबतची सूचना यावर स्थानिक कृषी विज्ञान केंद्रामध्ये अभ्यास व्हायला हवा. यात स्थानिक कृषी विद्यापीठांचा समावेशही आवश्यक आहे. ही संपूर्ण माहिती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे हे कामही आव्हानात्मक आहे. परंतु, कृषी विभागाच्या सहाय्याने ते सोयीचे होईल. अशाप्रकारचे ॲक्शनेबल फोरकास्ट अनेक प्रगत देशात राबविले जात असून त्यांना नैसर्गिक आपत्तींमध्ये जीवित-वित्तहानी टाळता आली अथवा कमी करता आली आहे. आपल्याला याबाबत उशिरा भान आले असल्याने याबाबतची यंत्रणा तत्काळ उभी करायला हवी. तरच येत्या जूनपासून शेतकऱ्यांना अद्ययावत स्वरुपात हवामानाचा अंदाज कळून त्यांचे संभाव्य नुकसान टळेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com