बदल्यांची यंत्रणा बदला

सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी चाललेली धडपड म्हणजे प्रशासकीय कार्यप्रणालीत थेट हस्तक्षेप असून, यात लोकहितापेक्षा स्वहित अधिक असते.
sampadkiya
sampadkiya

कोणत्याही विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे राहिल्यास गैरप्रकारांना प्रोत्साहन मिळू शकते. हे टाळण्यासाठी प्रशासकीय कार्यप्रणालीचाच एक भाग म्हणून तीन वर्षांनी त्यांची बदली केली जाते. अशा बदलीस सार्वत्रिक बदली म्हणतात. या बदल्या प्रामुख्याने एप्रिल-मे महिन्यात होतात. तर विशेष कारणास्तव अर्थात एखादा उपक्रम प्रभावीपणे राबवून ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी मंत्री, मुख्यमंत्र्यांना सक्षम अधिकारी लागतो, अथवा एखादा गैरप्रकार उघडकीस आला तर अशा अधिकाऱ्याची बदली केली जाते. या बदल्या मध्यावधी प्रकारात मोडतात. प्रशासकीय कामकाज योग्य पद्धतीने चालण्यासाठी या दोन्ही प्रकारातील बदल्या संबंधित यंत्रणेकडून अत्यंत अभ्यासपूर्ण आणि पारदर्शीपणे होणे अपेक्षित असते. राज्यातील कृषी विभागात मात्र बदल्यांच्या बाबतीत ना यंत्रणा उरली ना पारदर्शकता. त्यामुळे सर्वत्र बेबंदशाही पसरल्याचे वातावरण आहे. कृषीतील अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्यांचा खेळ थेट मंत्रालयातून चालतो. यात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत आहे. एवढेच नव्हे तर राज्यकर्त्यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने बदल्यांबाबतचा स्वतंत्र कायदा, त्यातील नियम, अटी हे सर्व धाब्यावर बसवून पूर्ण यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली घेतली आहे. विशेष म्हणजे यावर संबंधित खात्याचे मंत्री, मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे. 

बदल्या, पदोन्नती, पदभरतीतील वाढते गैरप्रकार कमी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार अशी मंडळे स्थापन झालीसुद्धा. परंतू काही अधिकारी, राजकारण्यांनी ही मंडळे खिळखिळी करून टाकलीत. गंभीर बाब म्हणजे कृषी विभागात नागरी सेवा मंडळाच्या बाहेर एक छुपे, भ्रष्ट लोकांचे मंडळ तयार झाले असून बदल्यांमध्ये त्यांचीच मनमानी चालत असल्याचे कळते. अभ्यासू, ध्येयाने प्रेरित, स्वच्छ पारदर्शक कारभार करणारे अधिकारी मनाप्रमाणे बदल्यांच्या खेळात पडतच नाहीत. त्यांना कोठेही टाकले तरी ते चांगलेच काम करतात. तर कामचुकार, भ्रष्ट अधिकारीच मलईदार पद लाभावे म्हणून बदलीसाठी आग्रही असतात. खरे तर प्रशासन कार्यप्रणालीत कोणतीही ढवळाढवळ न करता आपल्यावर सोपविलेल्या सेवा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेला बहाल करायला हव्यात. असे असताना सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी चाललेली धडपड म्हणजे प्रशासकीय कार्यप्रणालीत थेट हस्तक्षेप असून, यात लोकहितापेक्षा स्वहित अधिक असते. मागेल तेथे बदलीच्या फोफावत चाललेल्या मानसिकतेने कृषी विभागातील कामकाजाचा बट्याबोळ वाजत आहे. आधीच शेती क्षेत्रात नवनवीन आव्हाने पुढे उभी राहत आहेत. ही आव्हाने पेलून शेती क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. अशावेळी गैरमार्गाने बदलीच्या मागे लागलेल्या कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासनाने त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. बदल्यांतील बेबंदशाहीत खालपासून वरपर्यंत एक स्वतंत्र यंत्रणा उभी राहिलेली आहे. ही यंत्रणा उद्ध्वस्त करावी लागेल. त्याचबरोबर कृषी विभागात योग्य ठिकाणी योग्य अधिकाऱ्याची वर्णी लागावी म्हणून नागरी सेवा मंडळाच्या रुपाने उभ्या राहिलेल्या यंत्रणेतील राजकीय हस्तक्षेप संपुष्टात आणून त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्यावे. असे झाले तरच कृषी विभागातील कामाला गती येऊन त्याचे अपेक्षित परिणाम दिसू लागतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com