त्रिगुणी म्हशीची विजयी पताका

केंद्रीय स्तरावरील संशोधनातून यशस्वी ठरलेले क्लोन तंत्र सिद्ध करून त्याचा लाभ स्थानिक पशुपालकांना करून देण्याची जबाबदारी आता राज्य पातळीवरील विद्यापीठांवर आहे.
sampadkiya
sampadkiya

जगात सर्वप्रथम हॅंड गाईडेड क्लोनिंग म्हणजे हस्त कौशल्यातून   क्लोन (फुटवे) निर्मितीचा प्रयोग राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्नाल येथे यशस्वी करण्यात आला. याच संस्थेने प्रजननातील आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्व प्रयोग प्रथम सिद्ध केले आणि त्याची चांगली प्रशंसा जगात झाली. यातील महत्त्वाची बाब अशी की, भारतात असलेलं काळं सोनं म्हणजे म्हैस त्रिगुणी वापरासाठी जगात प्रसिद्ध आहे. दूध, मांस आणि शेती काम अशा तिहेरी उपयुक्ततेच्या म्हशी देशातील सर्वदूर ग्रामीण भागात सांभाळण्यात येतात. म्हणून अशा पाळीव प्राण्याच्या संशोधनाची दिशा महत्त्वाची ठरते. देशातील केंद्रीय म्हैस संशोधन संस्था, हरियाना राज्यातील हिस्सार येथे कार्यान्वित असून या संस्थेकडून गेल्या तीन दशकांत म्हशींच्या शरीरक्रियांचा प्राधान्याने सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यात म्हशीत असणारा मुका माज, म्हशीतील माज संकलन आणि विविध टप्प्यांतील ओजस रसांबाबतचे निष्कर्ष संशोधनातून मांडण्यास यश मिळाले आहे. सध्या आसामी रेडकाचा क्लोन यशस्वीपणे निर्माण करून संशोधकांनी विजयी पताका उभारली आहे.

म्हशींच्या दूध उत्पादकतेबाबत पशुपालकांची भूमिका देशातच नव्हे तर जगात आग्रही आहे. कृषी उन्नती मेळाव्यात ३२ लिटर दररोज दूध देणारी म्हैस आणि सर्वोच्च प्रजनन क्षमता असणारा रेडा पाहताना प्रत्येक शेतकरी कुटुंबात अशा पशुधनाची अपेक्षा असणे गैर नाही. मात्र, कृत्रिम रेतन आणि भ्रूण प्रत्यारोपण एवढ्या दोनच तंत्रज्ञानावर सर्वदूर विकासाची अपेक्षा म्हशींमध्ये शक्य नसल्यामुळे गुणवंत तंत्रज्ञानाचा अभ्यास देशात होत असून त्याची फलश्रृृतीसुद्धा दिसत आहे. म्हशींच्या बाबतीत क्लोन तंत्रज्ञान दुधासाठी यशस्वी होवो किंवा मांसासाठी दोन्हीही निश्चितच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. नुकत्याच जन्मलेल्या सच-गौरव रेडकाचे वजन ५४ किलो मिळू शकते म्हणजे त्याच्या शरीर वजनवाढीचा वेग सामान्यपणे दुप्पट ठरणार, यात शंका नाही. गाेवंश हत्याबंदीमुळे मांस निर्मितीबाबत निर्माण झालेले निर्बंध म्हशींच्या क्लोन तंत्रातून अखेर सुटतील, असे वाटू लागले आहे. यापुढील बाब अशी की, देशातून उत्कृष्ट निर्माण केलेल्या क्लोन म्हशी जगात निर्यात करण्यास आणि त्याद्वारे देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मोठी मदत होणार आहे. गेल्या १०-१२ वर्षात देशांतर्गत निर्माण करण्यात आलेले म्हशींचे क्लोन संख्यात्मकदृष्ट्या गौरवास्पद असून क्लोनिंगचे तंत्र भविष्यात गतिमानतेने विकसित होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. 

देशातील वातावरण सर्वच भागात वेगवेगळे असले तरी इतर विभागातील म्हशींची जात स्थानिक म्हशींच्या गर्भाशयात वाढली गेल्यामुळे जन्मलेले क्लोन स्थानिक वातावरणाशी सहज साधर्म्य टिकू शकतील, ही या तंत्रज्ञानाची जमेची बाजू म्हणावी लागेल. थोडक्यात अर्थ असा की आसामी म्हैस पंढरपुरीच्या गर्भाशयात निर्माण झाल्यास राज्यातही मांसोत्पादक प्रकल्प दिसून येतील किंवा हरियानाची मुऱ्हा नागपुरीच्या गर्भाशयातून विदर्भात दूध उत्पादक ठरू शकेल. सच-गौरव तंत्र अधिक संख्येने विकसित होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील संशोधनास मनुष्यबळ आणि आर्थिक बळ देण्याची मात्र गरज दुर्लक्षित करता येणार नाही. तसेच केंद्रीय संशोधन संस्थांना हे आव्हान आहे की त्यांनी पडताळलेले तंत्र देशाच्या इतर विभागात प्रत्यक्ष साकारण्यासाठी राज्यस्तरीय विद्यापीठांना सहभागी करून घेतले पाहिजे. केंद्रीय स्तरावरील संशोधनातून यशस्वी ठरलेले क्लोन तंत्र सिद्ध करून त्याचा लाभ स्थानिक पशुपालकांना करून देण्याची जबाबदारी आता राज्य पातळीवरील विद्यापीठांवर आहे, हेही विसरता येणार नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com