agrowon marathi agralekh on jalyukta shivar abhiyan corruption | Agrowon

‘जलयुक्त’ची गळती थांबवा
विजय सुकळकर
गुरुवार, 8 मार्च 2018
जलयुक्त शिवार अभियानामुळे दर्जाहीन कामे आणि गैरप्रकाराला आळा बसेल, असे वाटत असताना त्यालाही गळती लागलेली आहे. ही गळती वेळेवर थांबविली नाही, तर मोठे भगदाड पडेल.

जलयुक्त शिवार अभियानाद्वारे राज्याला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न शासन पाहत आहे. विविध विभागांच्या समन्वयातून मृद- जलसंधारणाची कामे एकत्रित करून हे अभियान मागील तीन वर्षांपासून राबविले जात आहे. गावपातळीवर कामांचे नियोजन त्यास ग्रामसभेची मान्यता आणि कामांच्या अंमलबजावणीची प्रभावी यंत्रणा उभी केली गेली आहे. ‘जलयुक्त’ची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर जलद निर्णय व्हावा, म्हणून मंत्रालयापासून ते गावपातळीपर्यंत आढावा, संनियंत्रणासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत होणारी सर्व कामे गुणवत्तापूर्ण व पारदर्शी होण्यासाठी त्यात लोकसहभाग घेतला जातो. कामांच्या ऑनलाइन देखभालीची व्यवस्थादेखील आहे. कामांचे मूल्यांकन त्रयस्थ संस्थेकडून केले जाते. असे असताना जलयुक्तची कामे दुय्यम दर्जाची झाल्याचे अनेक ठिकाणी आरोप झाले असून, त्यात तथ्यही आहे. सातारा जिल्ह्यातील मृद-जलसंधारणातील कामांत झालेल्या घोटाळ्याचा लोकांना अजून विसर पडलेला नाही, तोच बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात ३५ कोटी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. गैरप्रकारात मृद-जलसंधारण विभाग पूर्वीपासूनच आघाडीवर आहे. त्यामुळे या विभागाने बांधलेली बहुतांश बंधारे गळकी भांडी ठरलीत. जलयुक्त शिवार अभियानामुळे दर्जाहीन कामे आणि गैरप्रकाराला आळा बसेल, असे वाटत असताना त्यालाही गळती लागलेली आहे. ही गळती वेळेवर थांबविली नाही, तर मोठे भगदाड पडून शासनाचे कोट्यवधी रुपये आणि लोकांचे श्रम वाहून जातील.

अनेक ठिकाणी जलयुक्तची चांगली कामे झाली, त्याचे परिणामही चांगले दिसू लागले आहेत. गावपरिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. खरीप पिकांना संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. काही ठिकाणी रब्बी क्षेत्रही वाढले आहे. विशेष म्हणजे या अभियानाची प्रशंसा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही करण्यात आली. अनेक राज्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा प्रकारचे अभियान राबविण्याच्या विचारात आहेत. अशावेळी राज्यात या अभियानाला गालबोट लागणे योग्य नाही. मात्र कृषी विभागातील अधिकारी-कंत्राटदारांच्या संगनमतातून यातही घोटाळे करीत आहेत. त्याही पुढील बाब म्हणजे घोटाळेबहाद्दरांना थेट मंत्रालयातून वरदहस्त लाभत अाहे, हे अधिक गंभीर म्हणावे लागेल. जलयुक्त शिवार अभियानातील निधी हडप करणाऱ्यांवर कारवाई करणे तर दूरच, त्यांना पदोन्नती मिळत असेल तर भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर पोचली आहेत, याचा अंदाज यायला हवा. बीडमधील प्रकरणात तर या अभियानाचे सर्व नीती-नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे कारभार केल्याचे दिसते. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन साखळीतील सर्वांवर कडक कारवाई व्हायला हवी. कृषी आयुक्तांनी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु घोटाळेबहाद्दरांना मंत्रालयातून अभय मिळत असताना, या प्रकरणात केवळ आदेश देऊन भागणार नाही, तर त्याचा वेळोवेळी पाठपुरावादेखील करावा लागेल. यातील दोषींवर कडक कारवाई झाली, तरच असे प्रकार राज्यात इतरत्र करू पाहणाऱ्यांचे मनोबल वाढणार नाही, हे शासनाने लक्षात घ्यायला हवे.

इतर अॅग्रो विशेष
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...
दुष्काळात पीकविम्याचा आधारमुंबई ः यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...