agrowon marathi agralekh on marriage of farmers son | Agrowon

शेतकरी नवरा हवा गं बाई
विजय सुकळकर
बुधवार, 4 एप्रिल 2018

उपवर मुलींनी शहरातील झगमगाट, तेथील भ्रामक चंगळवादाच्या मोहजालाच्या मागे धावू नये. गावात चांगला कमावता शेतकरी मुलगा असेल, तर त्याच्याशी जुळवून घ्यायला हरकत नसावी.

सांगली, सातारा, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातील बेळगाव हा बागायती भाग असून, येथील शेती आधुनिक आणि शेतकरी तुलनात्मकदृष्ट्या सधन मानला जातो. या भागातील जैन समाज प्रामुख्याने शेती व्यवसायात असून, त्यातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे. असे असताना या समाजातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. शेतकरी मुलांचे लग्नाचे वय उलटून चालले तरी त्यांच्याशी लग्न करायला मुली तयारच होत नाहीत. कर्नाटक राज्यातून एजंटद्वारे मुली आणून शेतकरी मुलांची लग्न लावली जात आहेत. यात अनेक शेतकरी कुटुंबांची फसवणूक, लूट होत आहे. या भीषण वास्तवावर मात करण्यासाठी वीर सेवा दल संघटनेने पुढाकार घेतला असून, जैन शेतकरी वधू-वर बैठका, मेळाव्यांद्वारे उपवर मुलींबरोबर त्यांच्या शेतकरी मात्या-पित्यांचेही प्रबोधन करण्यात येत आहे.

शेतकरी पुत्रांच्या लग्नाचा प्रश्न हा कोणत्या जाती, विभागापुरता मर्यादित राहिलेला नाही. गेल्या वर्षा हेरंब कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत केलेल्या प्रत्यक्ष सर्वेक्षणातून पुढे आलेले भीषण वास्तव ॲग्रोवनने मांडले होते. उच्चशिक्षित, आधुनिक शेती करणाऱ्या, घरी गाडी, बंगला असणाऱ्या सधन शेतकरी मुलांचेदेखील मुली मिळत नसल्याने लग्न रखडलेले आहेत. ही बाब गंभीर असून, अनेक सामाजिक समस्या निर्माण करणारी आहे. त्यामुळे याकडे शासनासह समाजाचेही दुर्लक्ष होता कामा नये.

शेतीतून उत्पादनाची काहीही शाश्वत नाही. हाती आलेले उत्पादन बाजारात विकायला नेले, तर त्यास कोणीही विचारत नाही. विचारले तर व्यापाऱ्याने मागलेल्या भावात नाशवंत शेतीमाल विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नसतो. यातून शेतीचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही, तर संसाराचा गाडा चालणार कसा, असा विचार उपवर मुलींसह त्यांचे आई-वडील करीत असतील, तर त्यात गैरही काही नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून तो आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाल्याशिवाय त्यास प्रतिष्ठा लाभणार नाही. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरण्यासाठी वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतीमालास रास्त भावाचे शासनाचे धोरण हवे. शिक्षणात कौशल्यवृद्धीवर भर देऊन प्रत्येक मोकळ्या हाताला गावातच काम मिळायला हवे. याकरिता विकेंद्रित विकासाचे धोरणही राबवावे लागेल.

शेतीपूरक प्रक्रिया उद्योगासह इतरही उद्योग व्यवसाय प्रामुख्याने ग्रामीण भागातच उभारले जातील, हेही पाहावे लागेल. आज गावात शेतकरी सधन असला घरात सर्व सुखसुविधा असल्या तरी चांगले शिक्षण, आरोग्याच्या सोयी उपलब्ध नाहीत. त्यामुळेदेखील खेड्यातील सधन शेतकरी मुलाशी लग्न करायला मुली तयार होत नाहीत. हे लक्षात घेऊन चांगल्या जीवनमानाच्या सर्व सोयीसुविधा खेड्यात उपलब्ध करून द्यायला हव्यात. उपवर मुलींनीसुद्धा शहरातील झगमगाट, तेथील भ्रामक चंगळवादाच्या मोहजालाच्या मागे धावू नये. गावात चांगला कमावता शेतकरी मुलगा असेल, तर त्याच्याशी जुळवून घ्यायला हरकत नसावी. सुशिक्षित, समृद्ध मुलगा समाधानी जीवन जगून कुटुंबासही सुखी ठेऊ शकतो. असे प्रबोधन वीर सेवा दल संघटना करीत असून, त्यास चांगला प्रतिसादही लाभत आहे. हा आदर्श राज्यातील सर्व समाजांनी घ्यायला हवा. उपवर मुलींचे बैठका, मेळाव्यांद्वारे प्रबोधन करायला हवे. ‘मला शेतकरी नवरा हवा गं बाई’ अशी त्यांची मानसिकता तयार करायला हवी.

इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...
शास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी...पुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार... मुंबई : शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा...
सिंचन प्रकल्पांसाठी ६५ हजार कोटी :...नवी दिल्ली ः देशातील सिंचन प्रकल्पांचा विकास...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६...
अविरत कष्टातून सिंचन, अर्थकारणाला दिले...जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व...
शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी...जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध...