शाश्वत शेतीचा महामंत्र

आपल्याकडे दहा अंडी असतील तर ती एकाच बास्केटमध्ये न ठेवता दहा वेगवेगळ्या बास्केटमध्ये एक एक अंडे ठेवले, तर धक्का लागून पडून संपूर्ण नुकसान होण्याची जोखीम कमी होते.
sampadkiya
sampadkiya

ॲग्रोवनच्या २२ मार्च २०१८ च्या अंकात ‘हळदीला साथ रेशीम शेतीची’ आणि ‘मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीला पर्याय ओवा’ अशा दोन यशोगाथा अनुक्रमे विदर्भ आणि मराठवाडा विभागांतील आहेत. यावरून हेच स्पष्ट होते, की या दोन्ही विभागांतील शेतकरी पर्यायी पिकांकडे वळत असून, ते त्यांना फायदेशीरही ठरताहेत. राज्यातील अधिकांश शेती ही जिरायती असून, ती सर्वाधिक जोखीमयुक्त ठरत आहे. बदलत्या हवामान काळात नैसर्गिक आपत्तीची जोखीम तर वाढली आहेच; त्याचबरोबर बाजारपेठेची जोखीमही मोठी आहे. पीक घरात येईपर्यंत त्याचे कसे, कुठे, किती नुकसान होईल ते सांगता येत नाही, तर विक्री होईपर्यंत त्यास दर काय मिळेल, हेही कळत नाही.

खरे तर खरिपात कापूस, सोयाबीन, भात अन् रब्बीत हरभरा, गहू अशी ठराविक पिके घेतली जात असल्यामुळे मार्केट आणि मॉन्सून रिस्क (जोखीम) वाढली आहे. तसेच नियमित मिळकतीचे अनेक शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध असताना, बहुतांश शेतकऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होते. जोखीम कमी करण्यासाठीच्या अर्थाने इंग्रजीत एक म्हण वापरली जाते. ‘डोन्ट पूट ऑल एग्ज इन वन बास्केट’ अर्थात आपल्याकडे दहा अंडी असतील तर ती एकाच बास्केटमध्ये न ठेवता दहा वेगवेगळ्या बास्केटमध्ये एक एक अंडे ठेवले, तर धक्का लागून पडून संपूर्ण नुकसान होण्याची जोखीम कमी होते. 

शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एक, दोन पिके घेण्याएेवजी हंगामनिहाय पर्यायी पिकांची लागवड शेतात करायला हवी. क्षेत्र कमी असले तरी आंतरपीक, मिश्र पिकांद्वारे मर्यादित क्षेत्रात विविध पिके शेतकऱ्यांना घेता येतील. शिवाय शेतीला एखादा तरी पूरक व्यवसाय हा असायलाच हवा. असे केल्याने नैसर्गिक आपत्तींमध्ये एखाद-दुसऱ्या पिकाचे नुकसान झाले तरी इतर पिकांचा आधार राहतो. विविध प्रकारच्या टप्प्याटप्प्याने येणाऱ्या उत्पादनांनी हंगामात बाजारात एकाच पिकाची आवक वाढून पडणाऱ्या दराचा धोकाही टळण्यास मदत होते. मराठवाडा, विदर्भ, खानदेशचा विचार करता खरिपात ज्वारी, बाजरी, मका, मटकी, तीळ, एरंडी, आले, हळद, मिरची, ओवा जिरे, बडीशेप, तर रब्बीत मका, करडई, सूर्यफूल, भुईमूग, करडई, जवस, कारळ, बटाटा आदी पर्यायी पिके घेता येऊ शकतात. पाण्याची सोय असल्यास हंगामी भाजीपाला पिकांचे कोथिंबिरीपासून विदेशी भाजी झुकिनीपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बहुविध पीक पद्धतीमध्ये तृणधान्य, कडधान्य, तेलबियाबरोबर भाजीपाला पिकांचा समावेश असल्यास शेतकरी कुटुंबाच्या अन्नसुरक्षेबरोबर जनावरांनाही सकस आहार मिळेल. शिवाय शेतकऱ्यांच्या हातात पैसाही खेळत राहील.

पश्चिम महाराष्‍ट्रात ऊस आणि भाजीपाल्याचे क्षेत्र अधिक आहे. उसामध्ये शक्य तेवढी भाजीपाला पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास भाजीपाल्याचे क्षेत्र इतर पिकांखाली येऊन शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढेल. राज्यभर बहुतांश शेतकऱ्यांचे बांध बोडके आहेत. बांधावर कोरडवाहू फळपिके अथवा वनपिके लावल्यास त्यापासून बोनस उत्पन्न मिळेल. राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांनी पर्यायी पिकांचे नवनवीन वाण, प्रगत लागवड तंत्र, आंतर-मिश्रपीक पद्धती विकसित करायला हव्यात. कृषी विभागाने काळानुरूप बदलत्या अशा शाश्वत शेतीचे धडे शेतकऱ्यांना द्यायला हवे. शेतीतील नवनवीन उत्पादनास ‘लोकल ते ग्रोबल’ बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास शासनाने प्रयत्न करायला हवेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com