घातक अनियंत्रित आयात

घातक अशा अनधिकृत, अनोंदणीकृत कीडनाशकांच्या आयातीत देश-विदेशांतील नफेखोर व्यापाऱ्यांबरोबर या देशातील नियंत्रक यंत्रणेचाही सहभाग आहे, ही अधिक दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.
sampadkiya
sampadkiya

 देशात दरवर्षी परदेशांतून मोठ्या प्रमाणात अनोंदणीकृत कीडनाशकांची आयात प्लॅंट क्वारंटाईन विभागाच्या अटी, शर्तीला चक्क धाब्यावर बसून होत आहे. हा विषय केवळ या देशात बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी प्रस्थापित होण्यापुरता मर्यादित नाही, तर या देशातील शेतीसह एकंदरीतच जैवविविधता उद्‌ध्वस्त करून मनुष्य-प्राणी-पक्षी यांच्या जिवांवर बेतणारा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांच्या विषबाधा प्रकरणानंतर अनोंदणीकृत निविष्ठांचे उत्पादन, आयात, विक्रीचा प्रश्न एेरणीवर आला. गेल्या तीन दशकांपासून फर्टिलायझर ॲक्ट, पेस्टिसाइड ॲक्टमध्ये नमूद केलेल्या घटकांशिवाय शंभरहून अधिक कृषी निविष्ठांचे उत्पादन, आयात आणि विक्री देशात अनधिकृतपणे सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने द्रावके, वनस्पती वाढप्रवर्तक, वाढरक्षक, स्टिकर्स तसेच जैविक-खते, कीडनाशके यांचा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे अनोंदणीकृत आयात होणाऱ्या कीडनाशकांचा व्यापार देशात १८० अब्ज रुपयांच्या वर अाहे. एवढ्या मोठ्या कीडनाशकांची आयात त्यातील कुठल्याही घटकांच्या माहितीशिवाय होत असेल, तर कीडनाशकांच्या विषबाधेने शेतकरी, शेतमजूर मरणार नाहीत तर काय? याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.  

या देशात कोणतीही निविष्ठा अथवा तंत्रज्ञान रीतसर मार्गाने पाठविण्यात उशीर होत असेल, अथवा त्यात काही अडसर येत असेल, तर आम्ही अनधिकृत मार्गाने पाठवू आणि पुढे ते अधिकृत करून घेऊ, असा  पायडांच विदेशी नफेखोर पाडत आहेत. हा प्रकार कुठेतरी थांबवावा लागेल. कापसातील बीटी तंत्रज्ञान परवानगीपूर्वीच गुजरातमध्ये दाखल झाले होते. आता कापसाच्या एचटी जाती परवानगी नसताना देशभर पोचल्या आहेत. अब्जावधी रुपयांच्या अनोंदणीकृत कीडनाशकांचा देशातील व्यापार याच मानसिकतेचा भाग म्हणावा लागेल. खरेतर पिके-मनुष्य-प्राणी यांना घातक जिवाणू-विषाणूंचा शिरकाव या देशात होऊ नये म्हणून त्याची तपासणी करून परवानगी देण्याची पद्धत आहे. त्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा काम करते. आयातीनंतरही देशांतर्गत विक्रीत बोगस निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्याचे काम राज्याच्या निविष्ठा गुण नियंत्रण विभागाकडे आहे. अशी यंत्रणा असताना एचटीसारखे तंत्र असो की सक्रिय घटकांच्या माहितीविना येणारे कीडनाशके असोत, हे देशात येतातच कशी, हा खरा प्रश्न आहे.

घातक अशा या अनोंदणीकृत कीडनाशकांच्या आयातीत देश-विदेशांतील नफेखोर व्यापाऱ्यांबरोबर नियंत्रक यंत्रणेचाही सहभाग आहे, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. भारतीय लघू व मध्यम कीडनाशक उत्पादक संघाच्या माध्यमातून पुढे आलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. पीक संरक्षणाच्या अनुषंगाने कीडनाशके हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्चही होतो. अशा वेळी त्याच्या फवारणीचे योग्य ते परिणाम शेतकऱ्यांना मिळायलाच हवेत. अशा वेळी आयात होणाऱ्या कीडनाशकातील सक्रिय घटक हे क्वारंटाईन अथवा गुण नियंत्रण विभागाला, तर त्याच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांना माहिती असायलाच हवी. शेतकऱ्यांनीसुद्धा कीडनाशके अथवा कोणतीही निविष्ठा खरेदी करताना ते कोठून आयात झालेले आहे, कोणत्या कंपनीचे आहे, त्यातील घटक कोणते, ते प्रमाणित आहे की नाही, याची खात्री करूनच खरेदी केल्यास अनोंदणीकृत निविष्ठांना आळा बसेल. शेतकऱ्यांची फसवणूकसुद्धा टळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com