हिरवे स्वप्न भंगताना...

उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक थोडी कमी होते आणि मागणीत वाढच असते. त्यामुळे दर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
sampadkiya
sampadkiya

ढोबळ्या मिरचीला भाव नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने रस्त्याच्या कडेलाच ढोबळी टाकून देऊन घरी परतल्याची पोस्ट फेसबुकवर एकाने शेअर केली. त्यानंतर फ्लॉवर आणि टोमॅटोचे पीक जालना जिल्ह्यातील एक शेतकरी रागारागाने फावड्याने उद्ध्वस्त करीत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर नुकताच व्हायरल झाला. याशिवाय राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला काढायचा सोडून त्यावर नांगर फिरविला अथवा शेळ्या-मेंढ्या, गाई-म्हशी चरावयास सोडल्या आहेत. राज्यातील नाशिक आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे भाजीपाला उत्पादनात आघाडीवर आहेत. येथील शेतकरी परिसरातील मोठ्या गावापासून ते पुणे-मुंबईच्या बाजारात आपला भाजीपाला पाठवतात. सातत्याने भाजीपाला घेणाऱ्या या शेतकऱ्यांना बाजारपेठेचा बऱ्यापैकी अभ्यासदेखील आहे; परंतु कुठल्याही बाजारपेठेत सध्या कोबी, टोमॅटोला एक ते दोन रुपये प्रतिकिलोच्या वर दर मिळत नसल्याने या पिकांचा उत्पादन खर्च तर सोडा; तोडणी, वाहतूक खर्चदेखील निघेनासा झालाय. ज्वारी, बाजरी, गहू, भात ही अन्नधान्ये पिके शेतकरी घरी खाण्यासाठी घेतात, त्यातून त्यांनी नफ्याची अपेक्षाच करू नये, असा एक समजच बनला आहे. कडधान्ये, तेलबिया ही पिके घरगुती उपयोगाबरोबर थोड्याफार आर्थिक मिळकतीसाठी शेतकरी घेत आलाय; परंतु कमी दरामुळे ही पिकेही परवडेनाशी झाली आहेत. ही सर्व पिके जिरायती शेतीत घेतली जातात. या पिकांना फारसे पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल असतो. पाण्याची सोय असलेला शेतकरी हातात पैसा खेळता राहावा म्हणून अशा पारंपरिक पिकांना बगल देत भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेतो; परंतु त्यांचाही तोडणी, वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंग पावत आहे.

महागाई थोडी आटोक्यात असल्याचा आनंद केंद्र सरकार साजरा करतेय; परंतु कुठल्याच शेतमालास बाजारात दर नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले अाहे, त्याकडे त्यांचे लक्ष दिसत नाही. दुसरीकडे महागाई दर कमी असला, तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांना होताना दिसत नाही. याचा अर्थ आवक वाढली, बाजारात मागणीच नाही, म्हणून भाजीपाल्याचे दर कमी आहेत, या सबबीत काहीही तथ्य दिसत नाही. भाजीपाल्याची लागवड शेतकरी वर्षभर करतोय, याची आवकही सातत्याने चालू असते. उलट उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक थोडी कमी होते आणि मागणीत  वाढच असते. त्यामुळे दर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा सगळा व्यापाऱ्यांचा डाव असतो. मागे ॲग्रोवनने केलेल्या एका सर्वेक्षणात फळे-भाजीपाल्याला शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि ग्राहकांना द्यावा लागणारा दर यात चार ते पाच पटींचा फरक असल्याचे दिसून आले आहे. आजही टोमॅटो, फ्लॉवर शेतकऱ्यांकडून एक ते दोन रुपये किलोने घेतले जात असले तरी ग्राहकांना त्यासाठी १५ ते २० रुपये मोजावे लागत आहेत. दरातील हा फरक कमी करण्यात बाजार यंत्रणा, शासनाकडून काहीही प्रयत्न होत नाहीत. यावर तत्कालिक उपाय उत्पादक ते ग्राहक थेट मार्केटिंग हा असली तरी त्यातही अडचणी आहेत. शहरानजीकचे काही शेतकरी, त्यांचे गट थेट मार्केटिंग करीत असून, त्यांना विक्री न झालेल्या शेतमालाची साठवणूक, विक्रीचे ठिकाण उपलब्ध होत नाही. या अडचणी दूर करण्यासाठी बाजार यंत्रणा, स्थानिक शासन-प्रशासनाने मदत करायला हवी. फळे-भाजीपाला या नाशवंत शेतमालाची बाजार रिस्क कमी करुन सातत्याने योग्य दर मिळण्यासाठी त्यांचे क्लष्टरनिहाय मूल्यवर्धन करावे लागेल, हेही सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com