agrowon marathi agralekh on weather forcast | Agrowon

संभ्रमाचे ढग करा दूर
विजय सुकळकर
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

तापमानवाढ असो की मॉन्सून याबाबत देशी, विदेशी, खासगी संस्थांनी वर्तविलेले अंदाज परस्परविरोधी आणि सर्वसामान्यांत संभ्रम निर्माण करणारे आहेत. 

या वर्षीच्या उन्हाळ्यात काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सर्वसाधारण तापमानात ०.५ ते १.५ अंश सेल्शिअसने वाढ होणार, उष्णतेच्या लाटाही वाढत जाणार असल्याचा अंदाज महिनाभरापूर्वी भारतीय हवामान विभागाने वर्तविला होता. त्याचवेळी यंदाचा मॉन्सून सामान्य राहण्याची चिन्हेही दिसत असल्याचे सांगितले होते. दहा दिवसांपूर्वी गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा थंड असेल, असा अंदाज वर्तविला आहे. ला-निनाची स्थिती सर्वसामान्य असल्यामुळे यंदा सरासरीएवढा पाऊस पडेल, असा स्कायमेटचा अंदाज आहे. तर एल निनोच्या प्रभावामुळे यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज अमेरिकेतील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मॉन्सूनवर एल-निनोचा प्रभाव नसल्याने त्यास धोका नाही, अशी सावध प्रतिक्रिया भारतीय हवामान विभागाकडून आली आहे. तापमानवाढ असो की मॉन्सूनबाबत देशी, विदेशी, खासगी संस्थांनी वर्तविलेले अंदाज परस्परविरोधी आणि सर्वसामान्यांत संभ्रम निर्माण करणारे आहेत. उन्हाळ्यातील हवामानाचे प्रत्यक्ष चित्र तर वेगळेच दिसून येत आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांत दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत आढळून येत आहे. पहाटे गारठा तर दुपारी कडक उन्हाच्या चटक्याने मनुष्य, प्राणी, पक्षांचे आरोग्य बिघडत चालले अाहे. पिकांच्या वाढीवरही अनिष्ट परिणाम होऊन उत्पादकता आणि दर्जाही खालावत आहे. गंभीर बाब म्हणजे फेब्रुवारीपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस, गारपिटीचे सत्र अजूनही संपलेले नाही. त्यात रब्बीसह उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, होत आहे. कर्जमाफीचा लाभ, बोंड अळीग्रस्तांना मदत हेच बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरात पडले नसताना वादळीवारे, गारपिटीने होणाऱ्या नुकसानीकडे शासनाचे लक्षच दिसत नाही. 

उन्हाळी हंगाम असला तरी ज्वारी, भुईमूग, तीळ या  उन्हाळी पिकांसह  द्राक्ष, आंबा, डाळिंब, टरबूज, खरबूज या फळपिकांचे बदललेल्या वातावरणाने मोठे नुकसान होत आहे. त्याबाबतची पाहणी, पंचनामे आणि नुकसानभरपाई मिळणेबाबत विचार व्हायला हवा. उष्ण कोरड्या  हवामानाच्या आपल्या देशात वाढत्या तापमानास पिके संवेदनशील असतात. अशावेळी पिकांचे संतुलन राखण्यासाठी पाण्याची गरज वाढते. मुळातच कमी भरलेल्या जलसाठ्यांमधून बाष्पीभवन वाढल्याने ते कोरडे पडत आहेत. अशावेळी पिकांची वाढत्या पाण्याची गरज भागविणे मोठे आव्हानात्मक काम आहे. वाढते तापमान, पाणीटंचाईनेदेखील अनेक पिकांची उत्पादकता घटण्याची शक्यता वर्तविली जात असताना पिके वाचविण्यासाठीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हायला हवे. तापमान, आर्द्रता, थंडी, गारपीट, पाऊसमान आदी घटकांना पिके संवेदनशील असतात. सध्याच्या काळात या घटकांमध्ये मोठे बदल घडून येत असून तेही नुकसानकारक ठरत आहेत. त्यामुळे प्रत्येक घटकांबाबतचा अंदाज अधिक अचूक देण्याबाबत हवामान विभागाने प्रयत्न वाढवायला हवेत. आगामी मॉन्सूनबाबत अधिकृत पहिला अंदाज देताना मॉन्सूनवर परिणामकारक जागतिक घटकांबरोबर स्थानिक पातळीवरील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, सातत्याचे ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा कालावधी या घटकांचाही अभ्यास करून तो अधिक अचूक कसा राहील, हे पाहावे. मॉन्सूनवर देशाची एकंदरीत बाजार व्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे याबाबत लोकांचा संभ्रम देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो, हे लक्षात घेऊन तो दूर करायला हवा.

इतर अॅग्रो विशेष
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन...रासायनिक कीडनाशकांना किटक प्रतिकारक होत असून,...
परागकणांचा मागोवा घेण्याची कार्यक्षम...दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील...
खानदेशात पाणीटंचाईच्या प्रस्तावात वाढजळगाव : खानदेशात पाणीटंचाईचे प्रस्ताव वाढत आहेत....
कडाक्याच्या थंडीने गव्हाच्या विविध...सातारा ः येथील वेण्णा तलाव परिसरात असलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरलापुणे: राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कणेरी मठावर देशातील पहिले डिव्हाइन...कोल्हापूर : हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची...
आंध्र प्रदेशातील एका कंपनीचा परवाना `...नागपूर ः आंध्र प्रदेशातील एका बियाणे कंपनीच्या...
आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी...मुंबई : खरीप हंगाम २०१८ मध्ये राज्यातील ५०...
मराठवाड्यात आज पावसाचा अंदाजपुणे : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात...
भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांची बाजू घेणारा...सेलू, जि. परभणी ः केंद्र तसेच राज्य सरकारमधील...
कापूस आयातीवर निर्बंध हवेतजळगाव ः आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय व अमेरिकन...
लेखी आश्वासनानंतर लाल वादळ शमलेनाशिक: प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभेने काढलेला...
आदर्श नैसर्गिक शेतीसह जपली पीक विविधता नांदेड जिल्ह्यातील मालेगांव (ता. अर्धापूर) येथील...
अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुष्काळावर दोन...मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
विदेशी भाज्यांमधून अल्पभूधारक...येळगाव (ता. जि. बुलडाणा) येथील विष्णू गडाख या...
शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित; सरकारचे...मुंबई : आश्वासन देऊनही वर्षभरापासून पूर्ण न...
वासंतीकरणाच्या प्रक्रियेतील तापमानाचे...वसंताच्या आगमनामुळे प्रत्येक वनस्पती किंवा...
मराठवाड्यात ‘रेशीम’ला रिक्त पदांचे...औरंगाबाद ः राज्याला रेशीम उद्योगात उदयोन्मुख...
खानदेशात पपई लागवडीत होणार निम्म्याने...जळगाव : खानदेशात आगाप पपई लागवडीला सुरवात झाली...
रशियाला द्राक्ष निर्यातीत ‘क्लिअरिंग’चा...नाशिक : भारतीय द्राक्षाचा रशिया मोठा आयातदार आहे...