agrowon marathi special article on Bhai Vaidya | Agrowon

बहुआयामी समाजवादी कार्यकर्ता
Prof. H.M, Desarda 
गुरुवार, 5 एप्रिल 2018

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे सोमवारी (ता. २ एप्रिल) वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. कुशाग्र बुद्धमत्तेचे भाई वयाच्या नव्वदीतही राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय होते. वैश्‍विक विचार, स्थानिक कृती व त्यासाठी स्वत: जाणीवपूर्वक प्रयत्न हा भाईंच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण पैलू होता. 
 

भाई वैद्य या नावाने महाराष्ट्राला व देशाला दीर्घकाळ सुपरिचित असलेले व्यक्‍ती म्हणजे भालचंद्र सदाशिव वैद्य. खरं तर त्यांचे हे नाव तुरळकच वापरले जाई. कदाचित बहुसंख्य लोकांना ते माहीतही नसणार. मात्र भाई वैद्य म्हटलं की वयाच्या नव्वदीतदेखील समाजाच्या आणि विशेषत: तळागाळातील दलित श्रमिकांच्या प्रश्नांबाबत सतत विचार व कार्यमग्न असणारा एक सामाजिक कार्यकर्ता आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर गत पंचेचाळीस वर्षांतील भाईंसोबतच्या भेटी संवाद, चर्चा आणि विविध चळवळीतील आठवणीचा पट एकेक करत समोर आला. 

१९७२ च्या दुष्काळासंदर्भात त्यांची पहिली भेट झाल्याचे आठवते. महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या कामात डॉ. वि. म. दांडेकरांसोबत एस. एम. जोशी, भाई एन. डी. पाटील, पन्नालाल सुराणा, बाबा आढाव व काही वेळी भाई वैद्य यांची उपस्थिती असायची. त्या वेळी राज्यात लाखो लोक दुष्काळाने होरपळत होते. त्याचवेळी सार्वजनिक कामे काढण्यात यावी यासाठी बा. न. राजहंस तसेच भाई वैद्य व अन्य मंडळी प्रयत्नशील होती. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने होत होती. तेव्हापासून माझ्या मनावर भाईंची दृढ झालेली प्रतिमा म्हणजे, ‘सतत अध्ययनशील व कृतिशील कार्यकर्ता व नेता'' होय. मी पुण्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेत १९७४ ते १९७६ या काळात ''टिचर फेलो'' म्हणून कार्यरत होतो. त्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने एक चर्चा सुरू केली होती. मुख्य मुद्दा लोकशाही हक्‍काच्या संरक्षणाचा होता. भाई वैद्य हे हाडाचे लोकशाही समाजवादी असल्यामुळे ते याबाबत जनजागरण व संघर्ष यासाठी कार्यरत होते. या कालखंडात ते पुणे महापालिकेचे सदस्य व काही काळ महापौर होते. आणीबाणी पुकारल्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. समाजवादी चळवळीत साने गुरुजींची धडपडणारी मुले म्हणून जी मंडळी कार्यरत होती त्यामध्ये यदुनाथ थत्ते, डॉ. ग. प्र. प्रधान, भाई वैद्य ही मंडळी अग्रस्थानी होती. अर्थात समाजवादी चळवळीचे थोर नेते एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु लिमये यांच्यासोबत भाई वैद्य इंदिरा गांधींच्या राजकीय दडपशाहीचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत होते. 

शालेय जीवनापासून सामाजिक विषमता, भेदभाव तसेच सर्वसामान्य जनतेच्या जीवनमरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीत जे युवक जाणीवपूर्वक क्रियाशील झाले होते त्यामध्ये भाई वैद्य हे प्रमुख होते. सुरवातीपासूनच भारतीय स्वातंत्र्य म्हणजे कुणाचे व कशाचे स्वातंत्र्य असे प्रश्न विचारणारांचा एक समूह होता. विशेषत: ज्यांनी शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, स्त्रिया या कष्टकरी समूहाच्या मुक्‍तीसाठी स्वातंत्र्य आंदोलन असा आग्रह धरला, त्या मंडळींनी कॉंग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली होती.  यामध्ये भाई वैद्य यांनी १९४६ मध्ये सहभाग घेतला. त्यानंतर गत ७० वर्षांत असंख्य आंदोलनात ते सक्रिय होते. स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्‍ती आंदोलनात व त्यानंतर आणीबाणी विरोधी लढ्यात त्यांचा सहभाग होता. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. आणीबाणीनंतर राज्यात जे सत्तांतर झाले त्यामध्ये १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ''पुलोद'' चे सरकार स्थापन झाले. त्यामध्ये भाई वैद्य हे गृहराज्यमंत्री होते. त्या काळात त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात एका घटनेचे स्मरण होते. औरंगाबाद जिल्ह्यात त्या वेळी जमिनीच्या प्रश्नावर आंदोलन झाले. त्यामध्ये सरकारी, कर्मचारी पोलिस यंत्रणा व आंदोलक यांच्यात तणाव झाला. गृहमंत्री म्हणून भाई औरंगाबादेत आले. त्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली व त्यावर तोडगा निघाला. कर्मठ सामाजिक कार्यकर्ते असलेले भाई यांचे दैनंदिन जीवन चळवळीत व्यस्त असले तरी ते सतत वाचन करीत असत. माझ्याशी त्यांचा अनेक आर्थिक विषयावर चर्चासंवाद होत असे. शेती, पाणी, रोजगार, पर्यावरण, यासोबतच युरो कम्युनिझम, रशिया, चीन इत्यादी प्रश्नावर काय नवीन वाड:मय आले याची ते सतत विचारणा करीत असत. 

समाजवादी व साम्यवादी चळवळीतील महाराष्ट्र व देशपातळीवरील अनेक मान्यवर नेत्यांशी माझा परिचय राहिला आहे. त्यापैकी भाई वैद्य सतत खुल्या चर्चेसाठी सहज तयार असत. गांधी, लोहिया व आंबेडकरांबरोबरच मार्क्सच्या काही मूलभूत बाबीवर ते भर देत असत. विशेषत: मुद्दा आहे जग बदलण्याचा, ही विश्लेषणातून कृतीकडे जाण्याची गरज ते आग्रहाने मांडत असत. समाजवादी चळवळीत कायम विभाजन होत आले हे सर्वश्रृत आहे. समाजवादाचा सिद्धांत व व्यवहार याबाबत भाई मात्र शास्त्रशुद्ध भूमिका घेत असत. त्यांचा मुख्य पिंड लोहियावादी होता आणि म्हणूनच लोहिया त्यांना गोरगरिबांच्या शेवटच्या माणसाचा कैवारी असलेला गांधी म्हणत, तो त्यांना भावत असे. 

अलीकडच्या काळात हवामान बदलाच्या प्रश्नावरदेखील त्यांच्याशी चर्चा होत असे. एकदा तर त्यांनी ''पारिस्थितीकी अर्थशास्त्र''(इकॉलॉजिकल इकॉनॉमिक्स) ही संकल्पना व त्याचा सैद्धांतीक पाया याविषयी माझ्याकडून काही पुस्तके घेतली व वाचली. जोसेफ स्टिग्लीड्ज या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाचे ''प्राईस ऑफ इनइक्‍वॅलिटी'' या पुस्तकावर अत्यंत मर्मग्राही चर्चा केली. तात्पर्य वैश्‍विक विचार, स्थानिक कृती व त्यासाठी स्वत: जाणीवपूर्वक प्रयत्न हा भाईंच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण पैलू होता, ज्याची आज नितांत गरज आहे. 

आदरणीय भाईंच्या आठवणीच्या या स्मृती मनात दाटून आल्या असतांना त्यांनी गेल्या काही वर्षांत शिक्षणावर विशेषत: उपेक्षितांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि शिक्षकांना त्यासाठी कार्यप्रवण करण्यासाठी समाजवादी अध्यापक सभेची जी स्थापना केली ते त्यांचे अत्यंत मौलीक योगदान आहे. वर्ष दीड वर्षापूर्वी यासाठी त्यांनी राज्यभर जनजागरण दौरा केला. प्रकृती बरी नसतांनाही पुण्याहून औरंगाबादला आले. लगेचच दुसऱ्या दिवशी सातारा येथे कार्यक्रम असल्यामुळे परतीचा प्रवास केला. वयाच्या नव्वदीत हे सर्व करण्याची भाईंची तळमळ व जिद्द आम्हा सर्वांना प्रेरणादायी राहील. त्यांचे हे बहूआयामी जीवनकार्य चालू ठेवणे हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली होय. 
Prof. H.M, Desarda : ९४२१८८१६९५
(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)
(शब्दांकन ः संतोष मुंढे) 

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...