बैलातील आतड्याच्या अाजारावर योग्य उपचार महत्त्वाचे

बैलांच्या खाद्यात अखाद्य जाणार नाही याची काळजी घ्यावी.
बैलांच्या खाद्यात अखाद्य जाणार नाही याची काळजी घ्यावी.

उन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसांत बैलांमध्ये विशेषतः आतडे बंद होण्याची समस्या होते. यामुळे वेदना तर होतातच; परंतु उपचारास उशीर झाला तर आतडे खराब होऊन बैल दगावू शकतो. म्हणून या आजाराविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

आजाराची कारणे

  • आतडे बंद झाल्यामुळे आतड्यातील विष्ठा पुढे जाणे थांबते. आतड्यास पीळ पडणे, आतडे एकात एक जाणे, गुंतणे यामुळे हे होऊ शकते. 
  •  सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात शेतात भरपूर काम केल्यानंतर जनावराला एकदम थंड पाणी किंवा भरपूर खाद्य दिल्यामुळे आतडे गुंतू शकते.
  •  जनावराला हगवण लागल्यामुळे आतड्यातील हालचाली वाढतात व आतडे एकात एक गुंतते. 
  •  जनावर लोळणे किंवा उडी मारणे यामुळे आतड्याला पीळ पडू शकतो व आतडे गुंतते.
  •  आतड्यामध्ये एखादी वस्तू उदा. कपडा, प्लॅस्टिक, विष्ठा घट्ट होऊन बसल्यामुळे आतडे गुंतते.
  •  भरपूर जंत असल्यामुळे आतडे बंद होते.
  •  जनावराने स्वतःचे चाटलेले केस किंवा वाळलेल्या गवताचा गोल आकाराचा चेंडू होऊन आतड्यात अडकू शकतो व आतडे बंद होते. 
  •  आतड्यास मार लागणे, आतड्यावरील ताण, प्रमाणापेक्षा भरपूर खुराक देणे यामुळेही आतडे बंद होऊ शकते. 
  •  आतड्यावर बाहेरून गळू, कर्करोग याचा दाब, आतडे इतर भागात चिकटणे व अंतर्गळासारख्या रोगातही आतडे बंद होऊ शकते. 
  • लक्षणे

  •  जनावर खाणे कमी करते.
  •  जनावरास कळ येते व पोटात वेदना होतात. या वेदनांमुळे जनावर करकर दात खाते, पोटावर लाथा झाडते.
  •  जनावर पाठ ताणते, ऊठ-बस करते, किंवा जमिनीवर लोळते.
  •   सतत लघवी करणे.
  •   जनावर सतत शेण टाकण्याचा प्रयत्न करते; पण शेण पडत नाही.
  •   जनावराचे शेण टाकणे संपूर्णपणे बंद  होते. 
  •  शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. 
  •  जनावराचे डोळे खोल जातात व अशक्तपणा येतो.
  •    जनावर शेण टाकण्याऐवजी चिकट पदार्थ टाकते, हा चिकट पदार्थ रक्तमिश्रित असू शकतो.  
  • उपचार 

  • पशुवैद्यकाकडून बंद आतड्यावर शस्त्रक्रियेने निश्चितपणे खात्रीशीर उपाय करता येतो. यासाठी उजव्या भकाळीवर छेद घेऊन आतडे बाहेर काढतात व बंद आतड्यातील वस्तू काढून टाकतात किंवा रोगी आतड्याचा भाग कापून आतडे एकमेकांना जोडले जाते. लवकर शस्त्रक्रिया करून घेतली तर जनावर वाचू शकते. 
  • या रोगाच्या उपचारास विलंब झाला तर आतडे फुटून जनावर दगावण्याची शक्यता असते. यामुळे शस्त्रक्रियेचा निर्णय लवकर घेणे आवश्यक ठरते. शस्त्रक्रियेनंतर १२ ते १४ दिवसांत जनावर पूर्णपणे बरे होऊ शकते. 
  •  जनावराच्या पोटात कळ असल्याचे लक्षण दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकास संपर्क साधून उपचार करावा.
  • प्रतिबंध

  •  जनावरांना अखाद्य वस्तू खाऊ देऊ नयेत. 
  •  जनावराला हगवण लागली असेल किंवा पोटामध्ये जंत असतील, तर पशुवैद्यकाकडून तात्काळ उपाय करावा. 
  •   बैलांनी काम केल्यावर लगेच भरपूर थंड पाणी किंवा खाद्य देऊ नये ते अर्ध्या ते एक तासाने द्यावे. 
  •  जनावराला लोळू किंवा उडी मारू देऊ नये. 
  •  जनावराच्या खाद्यात एखादी अखाद्य वस्तू उदा. कपडा, प्लॅस्टिक जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  •   जनावराला स्वत:चे केस चाटू देऊ नये. 
  •  जनावराने आखाद्य वस्तू खाऊ नये म्हणून दररोज प्रत्येकी ५० ग्रॅम क्षार मिश्रण खाद्यातून द्यावे.
  •  पोटात वाळलेल्या गवताचा गोल आकाराचा चेंडू होऊ नये म्हणून जनावराला योग्य प्रमाणात ओला व वाळलेला चारा द्यावा अाणि भरपूर पाणी पाजावे.
  •  जनावराच्या आतड्यास मार लागू देऊ नये.
  •  आतड्यावर बाहेरून गळू, कर्करोग याचा दाब, आतडे इतर भागात चिकटणे व अंतर्गळासारख्या रोगात तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करावा.
  • -  डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६ (मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com