सारे फस्त अन् पीक जमीनदोस्त

जंगली जनावरांच्या नुकसानीने राज्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. बहुसंख्‍य शेतकरी म्‍हणतात, ‘‘वन विभागाकडून आम्‍हाला एक रुपयाही नको, फक्‍त आपली जनावरे जंगलात राखा, आमच्‍या शेतीत घुसू देऊ नका. आणखी काही नको.
sampadkiya
sampadkiya

जंगली जनावरांद्वारे शेतीचे नुकसान हे संकट किती गहिरे आणि व्‍यापक आहे याची कल्‍पना उर्वरित समाजाला पुरेपूर नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. शेतात पेरणी केल्‍यापासून तर शेवटचे पीक निघेपर्यंत म्‍हणजे जून ते जानेवारी व ओलित पीक हिवाळ्याचे असले तर मार्चपर्यंत शेतातले पीक शेतकऱ्याला पोटच्‍या पोरासारखे जगवावे व राखावे लागते. रात्रीचे १० तास दररोज, असे किमान १८० दिवस, खरे तर १८० रात्री, शेतकऱ्याला या रात्रपाळ्या कराव्‍या लागतात. दिवसभर शेताचे काम आणि रात्रभर शेताची राखण. पेरणी केल्‍यापासून जंगली जनावरांचा (व पक्ष्‍यांचा) धोका सुरू होतो. रात्री व दिवसा मिळून रानडुक्‍कर, पक्षी येऊन पेरलेले सर्व बियाणे व रोपे उकरून खातात व अनेक पटींनी जास्‍तीची नासाडी करतात. सारी पेरणी वाया जाते. पेरणीनंतर, उगवलेली रोपे, पुढे उभी पिके, शेवटी आलेल्‍या शेंगा, कणसे, फळे, बोंडे हे सर्व रोही (नील गाय), रानडुक्‍कर, माकडे, चितळ, हरणे, मोर, पोपट इ. मंडळी काहीच सोडत नाहीत. दिवसा व रात्री राखण केली नाही तर सारे फस्‍त, पीक जमीनदोस्‍त आणि शेतकरी उद्‍ध्‍वस्‍त! याचा अर्थ काय होतो आणि शेतकऱ्याला काय भोगावे लागते हे समजायला अशी कल्‍पना करा, की आपली वर्षभरच्‍या पगाराची कमाई रात्री बाहेर उघड्यावर कुठेतरी सोडून घरात झोपावे असे झाले तर? किंवा उघड्यावर ती कमाई पडलेली अन् रस्‍त्‍यावर १८० रात्री रात्रभर जागून आपल्‍याला तिची राखण करावी लागली तर?

सरकारची चुकीची धोरणे देशभरातला कोणताही भाग या संकटातून सुटलेला नाही. महाराष्‍ट्रात मुख्‍यतः रानडुक्‍कर, रोही, माकडे, हरणे, पोपट आणि मोर ही जनावरे पिकांची नासाडी करतात. एक दोन चार नव्‍हेत तर दहा, वीस, पन्‍नास, शंभरच्‍या कळपांनी ही जनावरे केवळ जंगलालगतच्‍या गावांमधे नव्‍हे; तर सर्वत्र पिके उद्ध्वस्त करतात.  शेती परवडेनाशी झाल्‍याची कंबरडे मोडणारी जी कारणे त्‍यात हे आणखी एक मोठे कारण सिद्ध होत आहे आणि शेतकऱ्यांच्‍या आत्‍महत्‍येचा वणवा वाढताच आहे. आणि देशातील ६०-७० कोटी लोक आपले कौटुंबिक जीवन किती हाल-अपेष्‍टांचे काढताहेत याची कल्‍पनाही बाकी समाजाला व सरकारला नाही. शेत छोटे असले तर बहुतांश शेतकऱ्यांच्‍या घरातला एक जण रखवालीसाठी शेतावर रात्र काढतात आणि शेत छोटे नसले तर शेतात दोघा-तिघांना रात्री शेतीची राखण करावी लागत आहे. यासाठी सरकारकडून वन-विभागाकडून जी भरपाई मिळण्‍याची तथाकथित तरतूद आहे. ती फार जाचक, अपुरी आणि ''भीक नको पण कुत्र आवर'' अशीच आहे, असे सर्व शेतकऱ्यांना वाटते. बहुसंख्‍य शेतकरी म्‍हणतात, ‘‘वन विभागाकडून आम्‍हाला एक रुपयाही नको, फक्‍त आपली जनावरे जंगलात राखा, आमच्‍या शेतीत घुसू देऊ नका. आणखी काही नको.  उर्वरित समाजाची समजही या प्रश्‍नाबाबत फार अज्ञानमूलक आणि असंवेदनशील आहे. देशातल्‍या शेतकऱ्यांकडून उरलेल्‍या अर्ध्‍या लोकसंख्‍येला म्‍हणजे शेती क्षेत्राबाहेरील जवळपास ६० ते ७० कोटी लोकांना, वर्षांचे ३६५ दिवस, दररोज तीन वेळा भरलेले ताट कसे येत आहे आणि त्‍यासाठी शेतकरी दररोज दिवसरात्र किती उद्ध्‍वस्‍त जीवन सहन करून हे आणून देत आहे, याची जाणीव आहे का? त्‍यांचा आर्थिक ताळेबंद (बॅलन्‍सशीट) दर वर्षाला खाली-खाली कोसळत जात आहे, या भकास वस्‍तुस्थितीचे भान तरी आहे का?

अबब! किती हे नुकसान! या संकटाची व्‍याप्‍ती व गहिरेपण यांचा केवळ भावनिक विचार न होता, नेमकेपणे समजून घ्‍यावे व समजून द्यावे म्‍हणून वर्धा जिल्‍ह्यात आम्‍ही चेतना-विकास या सामाजिक संस्‍थेच्‍या वतीने वर्ष २०१३ पासून संशोधनात्‍मक तपासणी-पाहणी सतत तीन वर्षे केली. वर्धा जिल्‍ह्यातील सर्व वेगवेगळ्या भागांचे प्रतिनिधित्‍व होऊ शकले आणि जंगल लगतची व जंगलापासून दूरच्‍या गावांचाही प्रतिनिधिक प्रमाणशीर समावेश होईल, अशी १२ गावे घेतली. प्रत्‍येक गावातून ढोबळमानाने दोन शेतकरी, एकूण २२ शेतकरी व त्‍यांची एकूण १२३ एकर शेती (पैकी २८ एकर शेती हंगामी ओलीतामुळे दुबार पिकाखाली, म्‍हणजे जवळपास २३ टक्के, बाकी सर्व ७७ टक्के कोरडवाहू ) जमिनीचा प्रकार मध्‍यम काळी हे सर्व अभ्‍यासात घेतले. जंगली जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानाची तंतोतंत बारकाईने आकडेवारी गोळा केली. वर्ष २०१६-१७ सालची तपशिलांची सरासरी अशी....  जंगली जनावरांमुळे नुकसान व रखवालीसाठी खर्च झालेले शेतकरी संख्‍या २२ पैकी २२  (१०० टक्के)  पिकांचे नुकसान. दरवर्षी दर एकरी  रुपये. :  ३३३६  चारा, कडबा, वैरण नुकसान, दरवर्षी दर एकरी रुपये :   ४१३      रात्री शेत-रखवाली खर्च  (दरवर्षी दर एकरी ३० रात्री x २०० रुपये) : ६००० रुपये.      साध्‍या काटक्‍या कुंपण खर्च. दरवर्षी दर एकरी ः ७९८ रुपये        दरवर्षी दर एकरी रुपये. १०, ५४७ हा तर फक्‍त आर्थिक हिशेब रुपयांत झाला असून, तो अपूर्णच आहे. याशिवाय होणारे मनस्‍ताप, चिंता, ताण, रात्री रखवालीचा धोका, कौटुंबिक जीवनाचा चुराडा होणे, पुरेशी झोप व विश्रांती न मिळाल्‍यामुळे आरोग्‍यावर प्रतिकूल परिणाम इ. या सर्वांचे मोल किती होईल? स्‍वतःला त्‍या जागी ठेवले म्‍हणजे खरी किंमत निघू शकेल. 

परवडू शकणाऱ्या उपायांचा शोध इतक्‍या भयंकर प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना जगावे लागते. यासाठी पीक-संरक्षणाच्‍या उपायांचा शोध आम्‍ही वर्ष २०१० ते २०१३ तीन वर्षे घेतला. त्‍यामध्ये निदान २० गाव-प्रतिनिधी कार्यकर्ता पातळीच्‍या शेतकऱ्यांना सहभागी केले आणि शक्‍य ते सर्व तऱ्हेचे ऐकीव, अनुभवलेले, सुचलेले उपाय या शेतकऱ्यांनी गावोगावी केले. त्‍यात कशा-कशा प्रकारच्‍या उपायांचा समावेश नव्‍हता, हे विचारू नका! शेतात रात्री विजेचे किंवा बिना-विजेचे असे रॉकेलचे प्रकाश-दिवे लावणे, फटी उघड्या असलेल्‍या मडक्‍यात दिवा लावून त्‍यामुळे सलग सार्वत्रिक प्रकाशाऐवजी तीव्र प्रकाशाची तिरीप निर्माण करणे, वाघाची लीद शेताच्‍या बांधावर टाकणे, केस जाळणे, टिपडं वाजवून आवाज करत राहणे, मासेमारी करणाऱ्यांचे कोळी-जाळे (नायलॉनची जाळी) जमिनीपासून तीन फूट उंचीपर्यंत शेतालाच भोवताल बांधावर लावणे, साधे तार किंवा काटेरी तार यांचे कुंपण लावणे आदी. दुर्दैवाची बाब अशी की कोणताही उपाय परिणामकारक सिद्ध झाला नाही. प्रसंगी सुरवातीस १-२ दिवस परिणामकारक असल्‍याचे भासले, तरी लवकरच जनावरांना समजले व त्‍यांनी त्‍यावर उपाय काढून मात केली आणि जैसे थे झाले.  अशोक बंग,  निरंजना मारू-बंग  : ९८२२२२८७१० (अशोक बंग हे शेती अभ्‍यासक व निरंजना मारू-बंग वनस्‍पती शास्‍त्रज्ञ  व चेतना-विकास सामाजिक संस्‍थेच्या सह-संचालक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com