वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणाचा किफायतशीर मार्ग

आम्‍ही गावकऱ्यांच्‍या सोबत मिळून पर्यायी असा कमी भांडवली खर्चाचा वन्य प्राण्यांपासून पीक संरक्षणाचा सौरऊर्जा कुंपणाचा नमुना विकसित केला. सर्व शेतकऱ्यांना कुंपणाच्‍या देखरेखीचे व दुरुस्‍तीचे प्रशिक्षण दिले.
sampadkiya
sampadkiya

वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान कमी करण्यासाठी वेगवेगळ्या दिशांनी शोध व बोध घेता-घेता शेवटी सौरऊर्जा विद्युत कुंपण या उपायावर गाडी येऊन ठेपली. त्‍याची परिणामकारकता समाधानकारक दिसली (पक्ष्‍यांपासून होणारे नुकसान वगळता). पण एक प्रचंड अडचण त्‍यात होती. मूळ भांडवली खर्च फार भारी होता. एकापेक्षा जास्‍त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन १५ एकरांच्‍या शेत-जमिनीला हे केले तरीही एकूण खर्च ३ ते ४ लाख रुपये, म्‍हणजे एकरी भांडवली खर्च वीस ते पंचवीस हजार रुपये इतका भारी पडतो आणि हे करून देणाऱ्या कंपन्‍या त्‍यानंतरच्‍या दुरुस्‍ती व देखरेख यासाठी भरवशाची काहीही सेवा, मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण सातत्‍याने देत नाहीत. परिणामी सुरवातीला चाललेले हे संच नंतर बंद पडतात. 

मूळ भांडवली खर्चासाठी बँकांकडून कर्ज घेणे बहुतेकांना शक्‍य होत नाही कारण शेतमालाला रास्‍त भाव नसल्‍यामुळे ते थकीत कर्जदार असतात. या बिकट परिस्थितीतून वाट काढणे शक्‍य आहे का?  आम्‍ही गावकऱ्यांच्‍या सोबत मिळून पर्यायी असा कमी भांडवली खर्चाचा वन्य प्राण्यांपासून पीक संरक्षणाचा सौरऊर्जा कुंपणाचा नमुना विकसित केला. त्‍यात भारी खर्चिक साहित्‍य-सामग्रीऐवजी काहीसे स्‍वस्‍त (कमी वर्षे टिकले तरी चालेल) पण सर्वतोपरी परिणामकारक असे साहित्‍य वापरले.  स्वस्त साहित्‍य वापरून सर्व सिस्‍टिम बसवून चालू करण्‍याच्‍या तांत्रिक कामांचे प्रशिक्षण होतकरू निवडक गावकरी मंडळींनाच दिले. सर्व शेतकऱ्यांना कुंपणाच्‍या देखरेखीचे व दुरुस्‍तीचे प्रशिक्षण दिले. गावांच्‍या परिसरात एका प्रशिक्षित गावकऱ्याला जास्‍तीचे प्रशिक्षण (आठवडाभरचे) देऊन त्‍यांना ‘गाव कारागीर’ बनवले. त्‍यांना तपासणीची अधिकची साधने देऊन त्‍यांची ‘रेफरल स‍र्व्हिस’ शेतकऱ्यांना उपलब्‍ध करून दिली. हे सर्व अल्‍पखर्चिक व हवे तेव्‍हा जवळच उपलब्‍ध झाल्‍यामुळे सौर-ऊर्जा कुंपणे बंद पडण्‍याऐवजी नीट चालू राहू शकलीत.   स्‍पर्श झाल्‍यावर फक्‍त शॉक लागतो, त्‍यामुळे प्राणी पळ काढतात. परंतु कुणालाही (माणसासह सर्व सजीव) इजा किंवा जीवितहानी होत नाही. सौर ऊर्जेवर हे चालते. या सर्वांमुळे वन्‍य पशूसह सर्व घटक सुरक्षित राखून पर्यावरणस्‍नेही पद्धतीने पीक संरक्षण होते. ५-७ दिवस ऊन पडले नाही तरी, या संचाचा भागच असलेल्‍या बॅटरीवर कुंपण चालू स्थितीत राहते. 

अर्थकारण सौरऊर्जा कुंपणाचे या अभ्‍यासातून व शोधकार्यातून शेतकऱ्यांना पुढील प्रमाणेे बचत, फायदा आदी लाभ होतात, हे सिद्ध झाले. सौरऊर्जा विद्युत कुंपणामुळे होणाऱ्या बचती व कमाई :  जंगली जनावरे त्रास    शून्य किंवा अत्‍यल्‍प    पीक नुकसान    शून्‍य.   रात्री राखण खर्च (जागली)     शून्‍य.   मानवी हानी    शून्‍य.    सौरऊर्जा विद्युत कुंपण  खर्च वार्षिक    ३००० रुपये  (भांडवलावर व्‍याज, घसारा, देखरेख व दुरुस्‍ती) पूर्वार्धात दिलेल्‍या तक्‍त्‍यातील खर्च व नुकसानीचे आकडे यांची बेरीज केल्‍यास दरवर्षी एकरी ढोबळमानाने दहा हजार रुपये एवढा खर्च, नुकसान होत आहे. त्‍या सर्व खर्चात पूर्ण बचत होते. या कुंपणासाठी होणारा सर्वसमावेशक वार्षिक एकरी खर्च रुपये ३००० वजा केला तर दर वर्षाला एकरी बचत व फायदा हा जवळपास सात हजार रुपये इतका भक्‍कम होतो. 

धोरण असे हवे? हे सर्व पुराव्‍यानिशी आता नेमक्‍या आकड्यांसह सिद्ध झाल्‍यावर धोरणाची दिशा काय असावी?  शेतकऱ्याला (व शेतमजुरांना) या जाचक व यातनादायी संकटातून तत्‍काळ बाहेर काढणे याची तातडीची गरज आहे. यात उत्‍पादक, उपभोक्‍ता आणि जंगली प्राणी व पर्यावरण या सर्वांचे एकत्रित हितैक्‍य आहे.   

जंगले, जंगली जनावरे, पर्यावरण हे सर्व बळकट व्‍हावे ही साऱ्या समाजाची व राष्‍ट्राची गरज आहे. पण त्‍याचा बोजा व जबाबदारी शेतकऱ्यांनी उचलावी हे धोरण अनैतिक व बेजबाबदार आहे. आधीच उणे सबसिडीवर उत्‍पादन करून सर्वांना खाऊ घालण्यात अन्‍नदात्‍याचे कंबरडे मोडले आहे. म्‍हणून ही जबाबदारी साऱ्या समाजाने, राष्‍ट्राने घेऊन शेती क्षेत्राला या अन्‍याय ओझ्यातून मुक्‍त करावे.  

 यासाठी सर्व जंगली जनावरे जंगलातच राहतील, जंगला बाहेर शेतीत घुसणार नाहीत अशी व्‍यवस्‍था करावी. ते शक्‍य नसेल तर दरवर्षाला प्रत्‍येक शेतकऱ्याच्‍या खात्‍यात थेट भरपाई रक्कम दर एकराला जवळपास रुपये दहा हजार इतके आपोआप जमा होत जावे असे धोरण व अंमल लगेच सुरू व्‍हावा. (आतापावेतो दर वर्षाची मागील थकबाकी काढली तर किती प्रचंड रकमेचा हा बोजा शेतकऱ्याच्‍या छातीवर आपला समाज टाकत आला याचा हिशोब काढून बघितला तर छाती फाटायला होईल. 

या मागील थकबाकीच्‍या प्रचंड रकमेचे व्‍याजच किती मोठी रक्कम होईल. काय म्‍हणता? दर वर्षाला भरपाई द्यायची नाही तर, सर्व शेतकऱ्यांच्‍या शेताला पूर्णपणे सौरऊर्जा विद्युत कुंपण सरकारने घालून द्यावे व त्‍याच्‍या चालू खर्चांसाठी (देखरेख, घसारा, दुरुस्‍ती इ.) वर्षाला एकरी जवळपास तीन हजार रुपये (आजच्‍या मूल्‍यपातळीप्रमाणे. पुढे मूल्‍यपातळीप्रमाणे ही रक्कम दरवर्षाला प्रमाणात वाढावी) शेतकऱ्याच्‍या खात्‍यात थेट जमा करावे. हे धोरण व अंमल लगेच सुरू व्‍हावा. हे आव्‍हान व आवाहन सरकारला आहे. सरकार हे शेती क्षेत्रात असलेल्‍या ६० टक्के लोकांचे सुद्धा आहे की नाही हे यातून सिद्ध होईल आणि सरकारने असे करावे यासाठी उर्वरित ४० टक्‍के मतदारांनी उपभोक्‍ता म्‍हणून हे करण्‍यात खुशीने सामील व्‍हावे. आणखी किती काळ शेती क्षेत्राची लूट चालू ठेवून लुटारू म्‍हणून सरकार व नागरिक सन्‍मानाने (!) जगणार? Ashok Bang, Niranjana Maru-Bang : ९८२२२२८७१० (अशोक बंग हे शेती अभ्‍यासक व निरंजना मारू-बंग वनस्‍पती शास्‍त्रज्ञ  व चेतना-विकास सामाजिक संस्‍थेच्या  सह-संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com