योग्य आहार अन् आरोग्य व्यवस्थापन हेच सूत्र

मुक्त संचार गोठ्यामुळे गाईंचे चांगले आरोग्य राहिले आहे.
मुक्त संचार गोठ्यामुळे गाईंचे चांगले आरोग्य राहिले आहे.

पंजाबमधील पशुपालकांनी जातिवंत दुधाळ गाई, म्हशींच्या निवडीवर भर दिला आहे. गुणवत्तापूर्ण अधिक दुग्धोत्पादनासाठी पशुपालक संतुलित आहार आणि आरोग्य व्यवस्थापनाबाबत जागरूक आहेत. हिरवा चारा, मूरघास नियोजनातून गाई, म्हशींना पुरेसा सकस आहार दिला जातो. वेळेवर आरोग्य तपासणी केली जाते.

गाई, म्हशींचे संगोपन करताना एकूण खर्चाच्या किमान ६० ते ७० टक्के खर्च आहारावर होतो. त्यामुळे आहार व्यवस्थापनास पशुपालनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंजाबमधील पशुपालक याकडे कटाक्षाने लक्ष देतात.  

 गाई, म्हशींपासून कमी खर्चात जास्त दुग्धोत्पादन मिळावे, यासाठी पंजाबमधील पशुपालक आहारावर अधिक लक्ष देतात. यामध्ये कमी खर्चात अधिक गुणवत्तेच्या आहार व्यवस्थापनावर त्यांचा भर असतो. येथील पशुपालकांचे असे नियोजन आहे की, गाई, म्हशींना चांगला चारा सकस दिल्यास जास्त रकमेचे पशुखाद्य कमी प्रमाणात वापरणे शक्य होते.   पंजाबमधील पशुपालक एकदल आणि द्विदल तसेच सुका चाऱ्याचे चांगले नियोजन करतात. त्यामुळे गाई, म्हशी क्षमतेप्रमाणे अधिक दूध देतात. दुधाची गुणवत्तासुद्धा चांगली ठेवण्यावर त्यांचा भर आहे.

  जनावरांचे आरोग्य 

 आहारनियोजन व्यवस्थितपणे झाल्याने जनावरांची रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यात पशुपालक यशस्वी ठरले आहेत.  गोठ्यामधील गाय, म्हैस जास्त दूध देणारी तसेच जास्त शुद्ध रक्ताची असली तरी त्यांच्यात आजाराचे प्रमाण कमी दिसते. येथील गाई, म्हशींची शरीरयष्टी चांगली अाहे. त्यामुळे गाई, म्हशी आजारी पडून होणारा तोटा कमी ठेवण्याचा येथील पशुपालकांचा प्रयत्न असतो.

  प्रजनन क्षमता 

 गाई, म्हशींच्या माजाचे चक्र नैसर्गिकरीत्या सुरळीतपणे असण्यासाठी आहाराचे महत्त्व मोठे आहे. गाई, म्हशी वेळेवर माजावर येणे आणि वेळेवर गाभण राहणे यासाठी येथील पशुपालक जनावरांच्या आहारावर लक्ष देतात.   आहारामध्ये क्षार पावडर आणि जीवनसत्त्वांचा शिफारशीनुसार समावेश केलेला असतो. त्यामुळे वेतातील अंतर नियमित ठेवण्यात येथील पशुपालक यशस्वी ठरले आहेत.

हिरव्या चाऱ्याचे नियोजन

  • दुग्धेत्पादनाच्यादृष्टीने गाई, म्हशींच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे महत्त्व आहे.
  •  योग्य गुणवत्तेच्या हिरव्या चाऱ्याच्या माध्यमातून गाई, म्हशींना जास्तीत जास्त पुरेसे अन्नघटक मिळावेत यासाठी पशुपालक जागरूक आहेत. 
  •  एकदल हिरव्या चाऱ्यामध्ये मका व ओट यांचा जास्तीत जास्त समावेश असतो. पशुपालक मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी मका लागवड करतात.
  •  उपलब्ध मक्याचा मूरघास केला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईवर मात करणे शक्य होते. गोठ्याजवळील जमिनीवर मोठ्या टाक्या बांधून किंवा खड्डा पद्धतीने मूरघास तयार केला जातो.
  •  पंजाबमधील तापमान थंड असल्याने या ठिकाणी ओट या चारा पिकाचे चांगले उत्पादन मिळते.  ओट चाऱ्यामध्ये ऊर्जा चांगली असल्याने मक्याच्या चाऱ्याबरोबर ओटचा चारा मिसळून गाई, म्हशींना दिला जातो. येथील पशुपालक ओटचा मूरघास तयार करतात.
  •  द्विदल चाऱ्यामध्ये बरसीम या चारा पिकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बरसीममध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण असते. गाई, म्हशींच्या आहारात बरसीम या चारा पिकाचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे पशुखाद्याचा वापर कमी करणे शक्य झाले आहे.
  • सुक्या चाऱ्याचे नियोजन

  •  गाई, म्हशींना हिरव्या चाऱ्याचे पचन अधिक सुलभ होण्यासाठी सुका चारा देणे महत्त्वाचे आहे हे येथील पशुपालकांच्या अनुभवावरून लक्षात   येते.
  •  आपल्याकडे बरेच पशुपालक गहू काढल्यानंतर काड पेटवून देतात. परंतु, पंजाबमधील पशुपालक गव्हाचे काड गोळा करू साठवून ठेवतात. त्याचा वापर जनावरांच्या आहारात केला जातो.
  •  गाई, म्हशींच्या संतुलित आहारात हिरवा चारा, मूरघास, पशुखाद्याच्या बरोबरीने सुका चारादेखील पुरेश्या प्रमाणात दिला जातो. 
  •  गाई, म्हशींना जास्त प्रमाणात हिरवा चारा किंवा मूरघास देत असले तरी दुधातील फॅट आणि एसएनएफ सुद्धा चांगला प्रकारे ठेवण्यात यशस्वी झाले  आहेत.
  •  पशुखाद्याचा वापर 

  •  जास्तीत जास्त अन्न घटक चाऱ्यातून दिल्यानंतर उर्वरित घटक हे पशुखाद्यातून दिले जातात. चाऱ्यामध्ये जास्त ऊर्जा व कमी प्रथिने असल्याने पशुखाद्य निर्मिती करताना कमी ऊर्जा व अधिक प्रथिनांचा विचार केला जातो.
  • पशुपालकांचा संतुलित आहार व्यवस्थापनावर भर आहे. कमीत कमी पशुखाद्यात अधिक दूध उत्पादनावर भर आहे.
  • गाई, म्हशींवर वेळेवर उपचार

  • पशुपालक प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पद्धतीचा योग्य वापर करतात. आहार तसेच गोठा व्यवस्थापनाच्या माध्यमातून गाई, म्हशींची काळजी घेतली जाते. वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केले जाते. वर्षातून चार वेळा जंत निर्मूलन केले जाते. अनियमित वाढणाऱ्या खुरांचा त्रास होऊ नये, यासाठी वर्षातून गरजेप्रमाणे खुरांची साळणी तांत्रिक पद्धतीने केली जाते. 
  • या ठिकाणी पशुवैद्यक गाय, म्हैस आजारी पडल्यावरच गोठ्यात येतात असे नाही. पशुवैद्यकाचे भेटीचे वेळापत्रक ठरलेले असते. त्यानुसार नियमित तपासणी करून गोठा व आहार व्यवस्थापनात बदल सुचविले जातात. त्यातूनही गाय, म्हैस आजारी पडली तर अशा जनावरास वेगळे ठेवले जाते. जनावर पूर्णपणे निरोगी झाल्यानंतरच पुन्हा गोठ्यात नेले जाते. आजारी जनावराचे दूध वेगळे करून वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. 
  •  ‘पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन`ने पशुवैद्यकांचा गट तयार केला आहे. सदस्यांच्या मागणीनुसार हे तज्ज्ञ गोठ्याला भेटी देऊन जनावरांच्यावर तात्काळ उपचार करतात. पशुवैद्यकाकडे आधुनिक उपकरणे असल्याने अचूक निदानास मदत होते. रोग निदान करण्यासाठी संस्थेची प्रयोगशाळा आहे. संस्थेच्या सदस्यांना सवलतीच्या दरात सुविधा दिल्या जातात. 
  •  गाई, म्हशींचे कृत्रिम रेतन पशुपालक स्वतः करतात. याबाबत त्यांना प्रक्षिक्षण देण्यात आले आहे. पशुपालकाच्या जवळ लिक्विड नायट्रोजनचा कंटेनर असतो. यामध्ये गरजेप्रमाणे रेतमात्रा ठेवलेल्या असतात. प्रत्येक रेतमात्रेची नोंद केलेली  असते.  
  • सुधारित बल्क कुलर

  •  लुधियाना येथील गुरू अांगद देव पशुवैद्यकीय व पशु विज्ञान विद्यापिठातील तज्ज्ञ सातत्याने पशुपालकांना तांत्रिक मार्गदर्शन करतात.
  •  विद्यापिठाने पशुपालकांची गरज लक्षात घेऊन चाळीस लिटर क्षमतेचा बल्क कुलर तयार केला आहे. 
  •  पशुपालकांची गरज लक्षात घेऊन पशू विद्यापीठाने नवीन संशोधनाला चालना दिली आहे. त्याचे फायदे दिसून येत आहेत.
  • - डॉ. शांताराम गायकवाड : ९८८१६६८०९९

     (लेखक गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com