agrowon marathi special article on genome editing part honey bees | Agrowon

उत्पन्नवाढीसाठी पाळा मधमाश्‍या
DR. R.P. PHADKE
बुधवार, 7 मार्च 2018
१९ आणि २० फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्ली येथे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या विषयावर केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. कृषी मंत्रालयाने जनतेकडून या चर्चासत्रासाठी सूचना मागविल्या होत्या. मी या चर्चासत्रासाठी उत्पन्नवाढीत मधमाश्‍यांचे योगदान यावर इंग्रजीत लेख पाठविला होता. त्याच लेखाचा हा मराठीतील स्वैर अनुवाद आहे.

भा रताने पहिली हरितक्रांती १९७० च्या दशकात पाहिली. ही हरितक्रांती तृणधान्यांत (गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका इ.) झाली. परंतु तेलबिया, डाळी, फळे आदी पिकांमध्ये हेक्‍टरी उत्पादन वाढत नव्हते. यासाठी केंद्र शासनाने १९८० च्या दशकात तेलबिया-डाळी आणि फळ अशी अभियाने सुरू केली. ही अभियाने सुरू होऊन २५-३० वर्षे झाली; परंतु या पिकांच्या हेक्‍टरी उत्पादनात अजूनही वाढ होत नाही. काही पिकांत तर हेक्‍टरी उत्पादन घटत आहे. खाद्यतेल आणि डाळी यांची आयात दर वर्षी वाढत आहे. २०१६ मध्ये आपण ७४ हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आणि २५ हजार कोटी रुपयांच्या डाळी आयात केल्या. भारताच्या एकूण कृषी उत्पादन आयातीपैकी ही आयात ७२ टक्के होती. बाकी आयात काजू - बदाम, फळे अशी होती.

फुलातील पूं-बीज (परागकण) आणि स्त्रीबीज यांचे मिलन झाल्यावर बीजधारणा किंवा फलधारणा होते. तृणधान्ये ही स्वपरागफलित किंवा वाऱ्यामार्फत परागवहन होऊन (उदा. मका) पर-परागफलित आहेत. त्यांच्यात पर-परागवहनासाठी दुसऱ्या माध्यमाची गरज नसते. परंतु बाकीची बहुतांश पिके पर-परागीभवनासाठी परागसिंचक कीटकांवर, मुख्यत्वेकरून मधमाश्‍यांवर अवलंबून असतात. सुधारित बियाणे, खत, पाणी आणि पीक-संरक्षण या पारंपरिक चार निविष्ठा वापरून पिके जेव्हा फुलोऱ्यावर येतात तेव्हा शेतात फुलांच्या संख्येनुसार योग्य संख्येने मधमाश्‍या नसतील, तर शेतातील सर्वच्या सर्व फुलांत परागीभवनाअभावी काही टक्के फुले अफल राहून त्यांच्यात बीजधारणा होत नाही. परिणामी, अशा पिकांचे कमाल क्षमतेइतके हेक्‍टरी उत्पादन मिळत नाही. अशी पर-परागसिंचित सफल पिके जेव्हा फुलांत येतात तेव्हा पर-परागसिंचनासाठी मधमाश्‍या ही पाचवी आणि महत्त्वाची निविष्ठा दुर्लक्षित आहे. जोपर्यंत ही निविष्ठा आपण उपलब्ध करीत नाही तोपर्यंत हेक्‍टरी उत्पादनात वाढ असंभवनीय आहे. कीटकनाशकांच्या वापरामुळे निसर्गातील परागसिंचक कीटकांची संख्या घटत चालली आहे. यामुळे मधमाश्‍यांचे संरक्षण आणि त्यांचा परागीभवनासाठी नियोजनबद्ध वापर अनिवार्य झाला आहे.

जगात एकूण घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी ७० टक्के पिके परागीभवनासाठी परागसिंचक कीटकांवर अवलंबून आहेत. या परागसिंचन प्रक्रियेत मधमाश्‍यांचा सहभाग ७५ ते ८० टक्के असतो. सोयाबीन, काही लिंबूवर्गीय फळे, तूर अशी काही पिके स्वपरागफलित आहेत. त्यांच्या बीजधारणेसाठी परागसिंचक कीटकांची गरज नसते. परंतु अशा पिकांच्या फुलोऱ्याच्या वेळी शेतात मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवल्यास अशा पिकांचेही हेक्‍टरी उत्पादन २० ते ५० टक्‍क्‍यांनी वाढते, असे ब्राझीलमधील कृषिशास्त्रज्ञांचे संशोधन आहे. अमेरिकेतील एक विद्यापीठ आणि जर्मनीतील एक विद्यापीठ यांनी संयुक्तपणे एक प्रकल्प राबविला. या प्रकल्पात जगातील मधमाश्‍यांतर्फे परागीभवन झालेल्या १०० पेक्षा जास्त पिकांवर अभ्यास केला. प्रकल्पाच्या अहवालानुसार मधमाश्‍यांमुळे पिकांचे हेक्‍टरी उत्पादनात वाढ तर होतेच, त्याचबरोबर अशा पिकांच्या पौष्टिक मूल्यातही वाढ होते, असे निष्कर्ष आहेत. इंटरनॅशनल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टिम यांच्या अहवालाप्रमाणे मधमाश्‍या आणि इतर परागसिंचक कीटक यांचे अन्नधान्याचे निर्मितीत दर वर्षी सुमारे ५७ हजार ७०० कोटी डॉलर्सचे योगदान असते.

डॉ. स्वामिनाथन यांनी २००६ मध्ये ‘भूकमुक्त भारताकडे’ असा विस्तृत लेख लिहिला होता. तेलबिया, डाळी, फळ पिकांच्या घटत्या हेक्‍टरी उत्पादनाबद्दल चिंता व्यक्त करून, अन्नधान्ये आणि अन्नधान्यावर प्रक्रिया केलेल्या वस्तू आयात करणे म्हणजे परकीय चलन गमावून बेरोजगारी आयात करण्यासारखे आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर केंद्र शासनाने १५ ऑगस्ट २००७ मध्ये ‘भूकमुक्त भारत’ असे अभियान सुरू केले होते. हे अभियान सुरू होऊन दहा वर्षे झाली, काय आहे आजची परिस्थिती? राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सेवा या संस्थेच्या २०१२ मधील अहवालाप्रमाणे भारतातील पाच वर्षांच्या आतील ४२ टक्के मुले कुपोषित होती. याच संस्थेच्या २०१७ च्या अहवालानुसार कुपोषित बालकांची संख्या ५२ टक्के झाली आहे. शाळांतील ५० टक्के मुलींत लोह कमतरता आहे. राज्यातील अनेक पिकांचे हेक्‍टरी उत्पादन जागतिक हेक्‍टरी उत्पादनाच्या ४० ते ५० टक्के आहे. केंद्र-राज्य शासनाने येत्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प सोडला आहे. २० वर्षांत जे साध्य झाले नाही ते पाच वर्षांत कसे साध्य करणार? हे अशक्‍य नाही आहे. उन्नत बियाणे, जलसिंचन, गोबर गॅस यांसारख्या इतर कार्यक्रमांबरोबर परागसिंचनासाठी मधमाश्‍या या अनिवार्य निविष्ठेवरही लक्ष केंद्रित करावयास हवे. चीनने गेल्या काही दशकांत मधमाश्‍यांच्या वसाहतींची संख्या ६० लाखांवरून एक कोटीपर्यंत वाढविली आहे. ही संख्या तीन कोटींपर्यंत वाढविण्याच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. इस्राईलनेसुद्धा हे साध्य केले आहे. महाराष्ट्राच्या १-२ जिल्ह्याइतके क्षेत्रफळ, त्यातील ४० टक्के जमीन शेतीस उपयुक्त, सरासरी पर्जन्यमान ७-८ इंच अशी भौगोलिक परिस्थिती असून, इस्राईल एक लाख १० हजार मधमाश्‍यांच्या वसाहतीपासून दर वर्षी ३० ते ३४ लाख किलो मध उत्पादन घेतो आणि सर्व वसाहती परागीभवनासाठी वापरून शेती उत्पादनात स्वावलंबनच नाही, तर काही शेतमालाची निर्यातही करू शकतो; तर सह्याद्रीचे वरदान लाभलेला ५-७ मोठ्या नद्या, २०-२५ उपनद्या, जलसिंचनाचे प्रकल्प असलेला महाराष्ट्र पाच लाख मधमाश्‍यांच्या वसाहती का नाही पाळू शकणार?
युरोप - अमेरिकेत एपिल मेलिफेरा या एकच प्रकारच्या मधमाश्‍या आहेत. सुदैवाने भारतात/ महाराष्ट्रात आग्या, पाळीव सातेरी, फुलोरी आणि पोयाची अशा चार प्रकारच्या मधमाश्‍या आहेत. या सर्वच मधमाश्‍या कार्यक्षम परागसिंचक आहेत. पाळीव सातेरी मधमाश्‍यांच्या एका वसाहतीत १० ते १५ हजार मधमाश्‍या असतात. फुलोऱ्याच्या हंगामात एक मधमाशी रोज ५०० ते ७०० फुलांवरून फिरून मकरंद - पराग गोळा करते आणि तितक्‍याच फुलांत परागीभवन होते.

मधमाश्‍यापालन व्यवसाय ही शेतीतील अशी निविष्ठा आहे की ज्यात रोजगारनिर्मिती, एरवी फुलांतील सुकून जाणारा मकरंद गोळा करून मधनिर्मिती आणि अनेक पिकांमध्ये परागीभवन करून पिकांचे हेक्‍टरी उत्पादनात आणि पिकांचे पौष्टिकतेत वाढ, असे तिहेरी फायदे आहेत. यासाठी वन, कृषी आणि ग्रामोद्योग या तीन सरकारी खात्यांनी एकत्रित प्रयत्न केल्यासच हा व्यवसाय वेगाने वाढू शकतो.
DR. R.P. PHADKE : ९८८११२१०८८
(लेखक केंद्रीय मधुमक्षिका संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...