टेकडी धरणाने होईल आदिवासींचा कायापालट

शक्‍य तेथे टेकडी धरण करून त्याच्या आधारे परिसरात स्विटकॉर्न, शेवगा, स्ट्रॉबेरीची शेती जोडीला दुग्धव्यवसाय या बाबी सरकारसह लोकांनीही मनावर घेऊन केल्यास आदिवासींचे कल्याण होईल.
sampadkiya
sampadkiya

महाराष्ट्रातील सर्व आदिवासी भाग प्रगतीपासून वंचित आहे, याबाबत कोणतीही ठोस पावले आतापर्यंत उचलली गेली नाहीत. जंगल तोडीच्या बंधनामुळे उपजीविकेच्या साधनांवर मर्यादा आल्या. आहार, आरोग्य, शिक्षण यांपासून हा भाग गेली ७० वर्षे दुर्लक्षित राहिला. त्याचे प्रमुख कारण दळणवळण, वीज आणि उत्पन्नाच्या साधनांचा अभाव हे आहे. त्याला पर्याय म्हणून टेकडी धरण ही फायदेशीर ठरणारी योजना मांडत आहे. ज्या भागामध्ये आदिवासी वस्ती आहे, त्याच्याजवळ टेकडी धरण (आकृती पाहा) लहान मोठ्या आकाराचे बांधायचे. यामुळे वीज आणि पाणी यांचा त्या परिसराला निश्‍चित असा पुरवठा होईल. 

टेकडी धरणामुळे होणाऱ्या आदिवासी कल्याणाच्या योजनेची वैशिष्ट्ये...  -   पाणी -  टेकडी धरणाच्या पर्जन्य छायेत पडणाऱ्या पावसाचे १०० टक्के पाणी साठवण होईल. आदिवासींना १२ ही महिने पिण्यासाठी, शेतीसाठी उद्योगासाठी, जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना कोणतेही शेती उत्पादन घेणे शक्य होईल. इतर कोणत्याही जलसंपदा योजनेमध्ये १०० टक्के पाणी साठवण व वापर नाही. पावसाचे पडलेले पाणी जेमतेम १० टक्के साठवले जाते व त्या १० टक्केपैकी अवघे ३५ टक्के पाणी प्रत्यक्ष वापरात येते. थोडक्यात काय सध्याची इफेक्टिव्ह एफिशियन्सी ३५ टक्के आहे. टेकडी धरणामुळे सतत २ वर्षे दुष्काळ पडला तरी परिसरात पाण्याची कमतरता राहणार नाही. 

-   वीज - उपलब्ध पाणीसाठ्यावर सोलर पॅनल टाकून त्यापासून वीजनिर्मिती करणे व पाण्याचे बाष्पीभवन थांबवणेदेखील शक्य होईल. तसेच टेकडीवरून खाली घरंगळत येणाऱ्या पाण्याच्या जोरावर जनित्रे बसवून हायड्रो वीज कमीत कमी खर्चात तयार करणे शक्य आहे. ही जनित्रे टेकडीभोवती धरणापासून कमीतकमी अंतरावर जमिनीला समांतर अशा टर्बाइनमुळे शक्य होईल. त्यामुळे विजेचा प्रश्न मिटेल. 

 -  आदिवासी हे आत्तापर्यंत जंगलामधील निरनिराळ्या औषधी वनस्पती वनोपजावर पोट भरत असत. कंदमुळे, फळे, खाऊन जीवन जगत असत. तथापि, त्या वृक्षांची तोड झाल्यामुळे ते सध्या शक्य होत नाही. शाश्वत पाण्यामुळे वृक्ष लागवड आणि संवर्धन होऊन त्यांची त्यावर उपजीविका शक्य होईल. उपलब्ध विजेवर पंप बसवून धरणातील पाणी टेकडीवर न्यावयाचे व तेथून संबंध टेकडीवर ग्रॅव्हीटीने ठिबक सिंचनाद्वारे झाडांना व पिकांना देणे शक्य आहे. तदवत दोन वन झाडांमध्ये चारा पिके घेता येतील. ती पिकेही उत्तम येतील. जंगलातील झाडातील पानांमुळे भरपूर खत तयार होईल.

-   टेकडी धरणातील गाळ तळामध्ये पाइप ठेवून तो धरणाखालील जमिनीसाठी सोडला जाईल व तो सुपीक गाळ शेतीसाठी उत्तम ठरेल व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल. 

-  वनवृक्ष लावून मोकळ्या पडलेल्या जमिनीमध्ये स्वीटकॉर्नची लागवड करता येऊ शकते. त्याच जोडीला शेवग्याची लागवड केल्यास शेवगाही भराभर वाढतो. शेवग्याच्या शेंगा व पानांत औषधी गुणधर्म आहेत. मोरिंग या नावाने शेवग्याच्या पानाची पावडर जगप्रसिद्ध असून, त्यामध्ये अनेक औषधे आहेत. मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब व मज्जारज्जू स्नायूचे सशक्तीकरण अशा अनेक रोगांवर हे ओषध म्हणून चालते. स्वीटकॉर्न दूध आणि शेवग्याच्या पानाची पावडर यांचे मिश्रण केल्यास व ते खाद्य म्हणून वापरल्यास आदिवासी भागामध्ये आरोग्याचा प्रश्‍नही ५० टक्‍क्‍यांनी कमी होईल.  तसेच डोंगर माथ्यावर सहज उगवणारी स्ट्रॉबेरी लागवडसुद्धा धरण परिसरात करता येईल. भारतामध्ये उपलब्ध अनेक हिलस्टेशन्स्‌वर स्ट्रॉबेरी येऊ शकते, आलेली आहे. महाराष्ट्रातही साताऱ्यापाठोपाठ सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नगर, बीड, रत्नागिरी, पालघर, नागपूर, वर्धा, नंदूरबार आदी जिल्ह्यांत स्ट्रॉबेरीचे पीक वाढत आहे. म्हणून शक्‍य तेथे टेकडी धरण करून त्याच्या आधारे परिसरात स्विटकॉर्न, शेवगा, स्ट्रॉबेरीची शेती जोडीला दुग्धव्यवसाय या बाबी सरकारसह लोकांनीही मनावर घेऊन केल्यास आदिवासींचे कल्याण होईल.

अनुभवाअंती साठवण जास्त होत असल्यास टेकडी धरणाच्या ऑबेटमेन्ट वॉलवर स्वयंचलित दरवाजे बसवता येतील. त्यामुळे टेकडी धरणातील पाण्याच्या फोर्समुळे ऑबेटमेन्ट वॉल वाहून जाईल, ही शंका काही लोक घेतील त्याचे आत्ताच निराकरण करतो. हाच पाण्याचा फोर्स समांतर जनित्रे बसविल्यास त्या पाण्याच्या फोर्सचा उपयोग करून विद्युत निर्मिती करता होईल व पाण्यावर नियंत्रण बसेल. या पार्श्वभूमीवर निसर्गाने आदिवासी भागावर दिलेल्या टेकड्यांचा उपयोग उत्कर्षाकरिता करता येणे सहज शक्य आहे. ह्याच न्यायाने कोकणातील ही पाणी प्रश्न मार्गी लागू शकतो. सदर ऑबेटमेन्ट वॉलसाठी येणारा खर्च खंदक खोदाईच्या दगडातून करता येणे शक्य आहे. तीही बचत मोठ्या प्रमाणात होईल.  

BHASKARRAO MHASKE : ९८९०३५१०३४ (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com