सावधान! ग्रामीण भाग भाजतोय

इंग्लंडमधील हवामान खात्याने २०१८ ते २०२२ या काळात जागतिक तापमान दीड अंशाने वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. या तापमानवाढीच्या झळा भारतामधील ग्रामीण भागाला अधिक बसणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. म्हणून सुदृढ पर्यावरणास उपयोगी ठरणारी कोणती कृती आपण करू शकतो, याचा विचार प्रत्येकानेच करणे गरजेचे आहे.
sampadkiya
sampadkiya

दोन आठवड्यांपूर्वी मराठवाड्यामधील ग्रामीण भागात गेलो आणि परिसर मार्च महिन्याच्या शेवटीच कसा भाजून निघत आहे याचा अनुभव घेतला. पूर्वी उन्हाळ्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे तापमान कमी असे. गावाकडचा निसर्ग, वाहत्या नदया, आंब्याने लगडलेल्या बागा, सेंद्रिय शेती, मातीची पर्यावरणपूरक घरे आणि दिसणारी मोजकीच वाहने हे त्यास कारणीभूत होते. पण आज भाजणाऱ्या ग्रामीण भागाकडे पाहताना यातील काहीही दिसत नाही. चार दशकांपूर्वी विदर्भाचा अपवाद वगळता उर्वरित महाराष्ट्र ३५ ते ३७ अंश सेल्शिअस या तापमानावर भर उन्हाळ्यात स्थिर असायचा मग आता ही परिस्थिती का बदलली? कुणी बदलली? यास जबाबदार कोण? प्रत्येक वेळेस जागतिक वातावरण बदलाकडे बोट दाखविताना सदृढ पर्यावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपण सोयीस्करपणे विसरत चाललो आहोत.

ग्रामीण भागाचे तापमान वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील हरवलेली वृक्षराजी. पूर्वी वृक्षाच्या गर्दीमधून गाव दिसत नसे. आता वृक्षच दिसत नाहीत आणि त्यातही वड, पिंपळ, उंबर आणि कदंब या तापमान कमी करणाऱ्या वृक्षांना गाव परिसर आणि महामार्गावरून पूर्णपणे हद्दपार करण्यात आले आहे. या वृक्षाची पाने सूर्य प्रकाशाने तापतात. त्यामुळे खालच्या बाजूस असलेल्या हजारो पर्णरंध्रांमधून पाण्याची वाफ बाहेर पडते. अशावेळी जेंव्हा वाऱ्याची झुळूक येते तेंव्हा थंडावा निर्माण होतो. या वृक्षाच्या छायेखाली उन्हाळ्यात भर दुपारी तापमान बाहेरच्या पेक्षा ५ ते ६ अंश सेंल्शिअसने कमी असते. ग्रामीण भागात अशा वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून त्याचे संवर्धन झाले तर तापमानात निश्चित फरक पडू शकतो. यासाठी शाळा, महाविद्यालये, मंदिर, देवालये, कार्यालये, रुग्णालये, स्मशानभूमी यांना लक्ष करून लोकसहभागामधून शाश्वत वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. आपण वृक्ष लागवड करतो पण कोणते वृक्ष वातावरण बदलास सक्षम असतात याबाबत अज्ञानी आहोत. सध्या वृक्ष लागवड हा उरकण्याचा कार्यक्रम आहे म्हणूनच प्रत्येक खड्ड्याचे प्रतिवर्षी नियमित बारसे होते. लोक सहभागातून ग्रामीण भागात केलेली वृक्ष लागवड भविष्यामधील वाढत्या तापमानास एकमेव उत्तर आहे.  

पूर्वी गाव तेथे बाराही महिने वाहणारी नदी होती. आता पंचक्रोशीत वाहते पाणी असलेली नदी शोधणे अवघड काम आहे. नद्या आहेत पण कोरडया ठणठणीत, त्यांच्या मध्ये सर्व गावाचा कचरा आहे, पण वाळूचा कण नाही. अशी कोरडी नदी वाढत्या तापमानात सातत्याने भर टाकत असते. लोक सहभागातून नदी संवर्धन कार्यक्रम केला आणि उन्हाळ्यात तिच्यात थोडे जरी वाहणारे स्वच्छ पाणी आले तर तापमान निश्चित कमी होऊ शकते. नदी जिवंत करण्यासाठी तिची रुंदी आणि खोली वाढवणे आणि सोबत दोन्हींही काठावर मुळापाशी पाणी धरून ठेवणारे वृक्ष लावले तर ती जिवंत होते. नदीच्या काठास, पाण्यास लागून ‘वाळा’ ही तंतुमय मुळे असलेली वनस्पती लावली तर पाणी कधीही आटू शकत नाही. मात्र, हे करताना ‘नदी ही माझी आई आहे’ या भावनेमधून गावामधील प्रत्येक तरुणाने यात सहभाग घ्यावयास हवा. 

गाव परिसरात सेंद्रिय शेतीवर भर दिला असता, जमीन पाणी धरून ठेवते आणि हवेत गारवा निर्माण होतो. रासायनिक शेती माती हलकी करते, तिच्यामध्ये वालुकामय कणांचे प्रमाण वाढून तापमान चढू लागते. पूर्वी गावामधील घरबांधणीमध्ये माती आणि लाकूड यांचा समावेश होत होता. आता मात्र सिमेंट, विटा आणि फरश्यांचा वापर वाढल्यामुळे सूर्यकिरणे मोठ्या प्रमाणावर परावर्तीत होऊन उष्णता वाढू लागली आहे. उन्हाळ्यात बंगल्यासमोर पाणी मारत बसण्यापेक्षा घरावर, बंगल्यावर हिरव्या वेली सोडणे, गच्चीवर आणि सभोवती बाग, परिसरात झाडे लावली तर तापमान निश्चित कमी होईल. मात्र, हे एकट्याने करून चालणार नाही तर यामध्ये प्रत्येकाचाच सहभाग हवा.

गावामधील स्वयंचलित वाहनांची वाढणारी संख्या हा वाढत्या तापमानासाठी चिंतेचा विषय आहे आणि यासाठी स्वयंशिक्षणच जास्त उपयोगी पडू शकते. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही ओला आणि सुका कचरा वातावरण तापवत आहे. यातून निर्माण होणारा कर्ब आणि मिथेन वायू तापमान सतत वाढवत असतात. आपल्या घरातच याचे विघटीकरण केले तर उन्हाळ्यात आपल्या गावाचे तापमान निश्चित कमी होऊ शकते. ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे घोषवाक्य गावात सर्वत्र असावे. अस्वच्छ गाव, उघड्यावर शौच, कुजणारा कचरा, संथ वाहणारे नाले हे वाढत्या तापमानाचे दर्शक आहेत, कारण येथे ‘मिथेन’ या हरित वायूची सातत्याने निमिर्ती होत असते. वातावरणात पसरलेला हा वायू मोठ्या प्रमाणावर उष्णता शोषून तापमान वाढवितो. ग्रामीण भागाचे तापमान वाढण्यास पिण्याच्या पाण्याचा अपव्ययसुद्धा जबाबदार आहे. पूर्वी वाहत्या नद्यांच्या काठावरील वाळुमध्ये पाण्याचे झरे तसेच घरोघरी ‘आड’ होते. म्हणून पाण्याचा वापर अतिशय मोजका आणि मर्यादित होत असे. कारण पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी कष्ट घ्यावे लागत होते. आता सार्वजनिक वितरण माध्यमातून नळाला पाणी येते. ते साठवूनही नळ वहात असताना पाण्याचा अपव्यय वाढू लागतो. वाया जाणारे पाणी नाल्यात येते आणि मिथेन निर्मितीस प्रोत्साहन देते. उन्हाळ्यात वाया जाणाऱ्या पाण्यापासून निर्माण होणारे बाष्पामुळे उन्हाळ्यात तापमान वाढू लागते.

शहरी भागात तापमान वाढण्यासाठी उत्तुंग इमारती, विकास कामात झालेली वृक्षांची प्रचंड कत्तल, प्रचंड प्रमाणात निर्माण होणारे सांडपाणी, लाखोमध्ये असणारी वाहनांची संख्या, जल आणि वायू प्रदूषण करणारे प्रक्रिया उद्योग, वाढती लोकसंख्या कारणीभूत आहे. मात्र यातील एक ही गोष्ट ग्रामीण भागात आढळत नसतानाही येथील तापमान वाढत आहे. इंग्लडमधील हवामान खात्याने २०१८ ते २०२२ या काळात जागतिक तापमानात दीड अंशाने वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. या तापमानवाढीच्या झळा भारतामधील ग्रामीण भागाला अधिक बसणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. म्हणून सुदृढ पर्यावरणास उपयोगी ठरणारी कोणती कृती आपण करू शकतो याचा प्रत्येकानेच विचार करणे गरजेचे आहे. २००८ च्या अॅालिंपिकच्या वेळी चीनने त्यांच्या बीजिंग या राजधानीचे तापमान तीन वर्षे सातत्याने प्रयत्न करून ५ अंश सेल्शिअसने कमी केले आणि अमेरिका युरोप यांच्यावर मात करत स्वत:च्या देशासाठी १०० सुवर्णपदके लुटली. पर्यावरणाचा असा आचार आणि विचार प्रत्येक गावाने प्रत्यक्ष कृतीत आणला तर तापमानाची वाढ रोखून शेतीस संरक्षण मिळेल आणि हे अशक्य मुळीच नाही बरं का?  DR. NAGESH TEKALE : ९८६९६१२५३१ (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com