देशी गाईंचे संगोपन करताना

जातिवंत देशी गाईंचे संगोपन करावे. यामुळे दुग्धोत्पादनात सातत्य रहाते.
जातिवंत देशी गाईंचे संगोपन करावे. यामुळे दुग्धोत्पादनात सातत्य रहाते.

भारतीय गोवंशामध्ये बदलत्या वातावरणामध्ये तग धरण्याची आणि दूध देण्याची क्षमता आहे.  बाजारपेठेत देशी गाईच्या दुधाची मागणी वाढत आहे. त्यामुळे जातिवंत दुधाळ गाईची निवड, योग्य पैदास धोरण, रोगांची चाचणी, मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब आणि योग्य खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे.

देशामध्ये एकूण गोवंशापैकी ७६ टक्के गोवंश हा गावठी आहे. फक्त २४ टक्के गाई शुद्ध जातीच्या राहिल्या आहेत. त्यामुळे देशी गोवंश पालन करताना शुद्ध जातीची निवड महत्त्वाची आहे. भारतात सहिवाल (पंजाब, हरियाणा), लालसिंधी (सिंध प्रांत), थारपारकर (कच्छ प्रांत)  गीर व कांक्रेज (गुजरात), हरियाणी (हरियाणा) आणि राजस्थानातील राठी (राजस्थान) या दुधाळ जाती आहेत. राज्याचा विचार करता खिल्लार, लालकंधारी, देवणी, गवळाऊ, डांगी आणि कोकण कपिला हे गोवंश आहेत. महाराष्ट्रात देशी गोवंशाचे दुग्धोत्पादन फारसे नाही. कारण दुधाच्या वाढीपेक्षा काम करणाऱ्या बैलांची पैदास करण्याकडेच जास्त कल राहिला आहे. या जातींचे योग्य संवर्धन केले तर निश्चितपणे जातीवंत दुधाळ गोवंश तयार करणे शक्य आहे. आपल्याकडील देशी गाईंच्या जातीत ३०० दिवसांत जास्त दूध देणारा देशी गोवंश म्हणजे सहिवाल, गीर, लालसिंधी आणि थारपारकर असा क्रम लागतो.

गाईची निवड करताना ः 

  • शरीररचना, रंग याचबरोबर वैशिष्ट्ये लक्षात घ्यावीत. ज्यांच्याकडे गाईची वंशावळ आहे त्यांच्याकडून गाय खरेदी करावी. पहिल्या, दुसऱ्या वेतातील गाईची निवड करावी. 
  •  गाई खरेदीपूर्वी ब्रुसेलोसीस, टीबी, जेडी, आयबीआर आणि ए१,ए२ तपासणी करावी. परंतु अनेक उत्साही गोपालक कोणतीही चाचणी न करता गाईंची खरेदी करतात. त्यामुळे त्या रोगाचा प्रसार आपल्या भागातील जनावरात होण्याची शक्यता वाढते.
  • चपळ बैलांची पैदास व दूध देण्याचा गुणधर्म असलेल्या गाईची पैदास हे भिन्न गुणधर्म आहेत. हे गुणधर्म एकाच जातीत उतरवता येणे शक्य नाही. 
  •  उत्तम जातीची पैदास म्हणजे खात्रीच्या आनुवंशिक गुणांचा ठेवा. एकूण गोपालनात हा ठेवा ४० टक्के गुणवत्तेचा आणि उरलेले ६० टक्के हा रोजची देखभाल, खाद्य आणि आरोग्य  व्यवस्थापनावर अवलंबून आहे. 
  •  दुभती गाय निरोगी, स्वच्छ पाणीदार डोळे असलेली असावी. फार दूरच्या गावाहून घेतलेल्या गाईबाबत अपेक्षित दूध १० ते २० टक्क्यांनी कमी धरावे. उदा. पंजाबमधील वातावरणास १२ लिटर दूध देणारी गाय महाराष्ट्राच्या हवामानात ८ ते १० लिटर दूध देईल, असा अंदाज बांधावा.
  •  सडांची लांबी, दोन सडांतील अंतर आणि ठेवण समांतर असावी. कासेवरील शिरा जाड, मोठ्या व नागमोडी असाव्यात. कासेवरील कातडी मऊ असावी. बऱ्याच जातीमध्ये उपजातीसुद्धा आढळून येतात. गायी खरेदी करताना कासेची चारही सडे सुरू आहेत का, हे तपासून पहावे.
  • आरोग्य व्यवस्थापन ः  

  •  जनावराच्या पाठीवर थाप मारली असता कातडी थरथरते. हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.
  •  चांगले दूध देणारी गाय कधीही लठ्ठ नसते. गाईच्या छातीच्या शेवटच्या तीन फासळ्या दिसल्या पाहिजेत. 
  •   चांगला आहार, लसीकरण, जंतनिर्मूलन, गोठ्यातील घरमाश्यांचे नियंत्रण, चुन्याच्या निवळीची फवारणी, गोचीड नियंत्रणाकडे कायम लक्ष द्यावे.
  • प्रत्येक वर्षी एक वेत 

  •  देशी गोपालनात १२ ते १४ महिन्यांनी एक वेत मिळणे महत्त्वाचे आहे. गाई व्यायल्यानंतर ६० ते ९० दिवसांनी माजावर येते. पहिला माज सोडून दुसऱ्या माजावर गाईंचे रेतन करावे. अशा प्रकारे ९० ते १२० दिवसांत रेतन झाले पाहिजे.  
  •  गाय माजावर आली नाही, तर पशुवैद्यकाकडून तपासणी करून उपचार करावेत. गाय सात महिन्यांची गाभण असताना आटवण्यास सुरवात करून आठ दिवसांत पूर्ण आटवावी. ३०५ दिवस दूध घेऊन म्हणजे पुन्हा गाभण राहिल्यानंतर सात महिन्यांनी गाय आटवायलाच हवी. गाय या वेळी जास्त दूध देत असेल तर, न आटण्याचा विचार चुकीचा आहे. कारण पुढील वेतासाठी जास्त दूध देणाऱ्या गाईत कासेतील दूध निर्माण करणाऱ्या पेशींच्या पुनरुज्जीवनासाठी पंचेचाळीस ते साठ दिवसांची आवश्यकता आहे. असे न केल्यास पुढच्या वेतात गाय कमी दिवस दूध देईल आणि जास्त दिवस भाकड राहील. 
  • गोठ्यात गाईंची संख्या जास्त असेल तर मुका माज ओळखण्यासाठी नसबंदी केलेला वळू गाईमध्ये सोडणे फायद्याचे ठरते. असा वळू मुका माज असलेल्या गाई वासाने ओळखतो. मग या गाई वेगळ्या काढून त्यांना कृत्रिम रेतन करावे. गाईचा एखादा माज ओळखण्याचे लक्षात आले नाही तर गाय रेतन करण्याचा काळ २१ दिवसांनी लांबतो. म्हणजे हे २१ दिवस गाईचा व्यवस्थापन खर्च वाढतो. व्याल्यानंतर शरीरात साठवलेल्या शक्तीवर गाय दूध देते. त्याच्या जोडीला योग्य खुराक असल्यावर दूध देण्याचे प्रमाण वाढते. 
  • पैदास धोरण 

  • देशातील गोवंशाच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उपलब्ध गाईंपासून विविध तंत्रज्ञानाचा वापर करून (आयव्हीएफ, ईटी) जातीवंत दुधाळ गाईंची संख्या वाढविणे शक्य आहे.
  •  उच्च जातीच्या वळूपासून तयार केलेली रेतमात्रा वापरून पैदास झालेल्या जातीवंत गाई निवडाव्यात.  
  •  सध्याच्या स्थितीमध्ये चांगली गाई विकत घेणे अवघड आहे. परंतु चांगली दुधाळ गाई आपल्या गोठ्यामध्ये तयार करू शकतो. 
  •   सध्या एनडीआरआय, एनडीडीबी आणि कृषी विद्यापीठांकडे जातिवंत गोवंशाच्या रेतमात्रा उपलब्ध आहेत. या रेतमात्रांचा वापर करावा.  
  •  पशुपैदास योग्य रितीने होण्यासाठी प्रत्येक गाईची नोंद करून सर्व माहिती अद्ययावत ठेवावी. त्यामुळे आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ तयार होईल. 
  • जनावरांचे वर्तन 

  • देशी गोवंशाचे वर्तन हा घटक खूप महात्त्वाचा आहे. आपण देशी गाई जशी सांभाळतो, त्याप्रमाणे ती आपणास प्रतिसाद देत असते. देशी जनावरांमध्ये वास, स्पर्श, दृष्टी आणि चव याचे ज्ञान खूप तीव्र असते. 
  •  सहवासाचा गुण या जनावरांमध्ये उपजत असतो. गाईचा उत्तम दूध देण्याचा गुण हा त्यांच्या स्वभावधर्मावर अवलंबून आहे. स्वभावधर्म हा त्यांना मिळणाऱ्या वागणुकीवर, लहानपणापासून हाताळण्यावर अवलंबून आहे.  
  •  जनावरे ही सवयीची गुलाम आहेत. चांगल्या सवयी लावण्यासाठी नियमित देखभाल गरजेची आहे. याकरिता त्यांचा स्वभाव आणि वागणुकीची माहिती आपणास असणे आवश्यक आहे. 
  • डॉ. सोमनाथ माने ः ९८८१७२१०२२ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com