agrowon marathi special article on msp and inflation | Agrowon

दीडपट हमीभावाने शेतकऱ्यांचीच होरपळ
Ramesh Padhye 
सोमवार, 30 एप्रिल 2018

शेतमालाचे किमान आधारभाव उत्पादन खर्चाच्या दीडपट एवढे करण्याचे सूत्र प्रत्यक्षात आणले तर ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना जीवन असह्य होईल. 
 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मतमतांतरांना ॲग्रोवनच्या ८ एप्रिल २०१८ च्या अंकात प्रसिद्धी दिली आहे. या प्रतिक्रियांमधून उपस्थित होणारे मुख्य मुद्दे असे आहेत ः
-    भारत सरकार शेतमालाचे भाव वाढू नयेत वा कमी राहावेत यासाठी प्रयत्नशील राहिलेले आढळते. (प्रा. देसरडा)
-    किमान आधारभाव ५० टक्‍क्‍यांनी वाढविले तर महागाई वाढण्याचे काहीच कारण नाही.
-   शेतमालाचे भाव आणि महागाई यांची सांगड घालणे चूक आहे. तसे करण्याचे काम रिझर्व्ह बॅंक करते.
 -   रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी शेतात बेणणी करण्याचे काम करावे. आम्ही त्यांना सरकार देते त्याच्या दुप्पट पगार देऊ ( राजू शेट्टी)

कोणत्याही वस्तूचा बाजारभाव ग्राहक आणि उत्पादकांमधील सौदेबाजीद्वारे निश्‍चित होतो. त्यामध्ये सरकार मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करू शकत नाही. उदा: गहू आणि तांदूळ या तृणधान्यांचे भाव किलोला अनुक्रमे साठ रुपये व पंच्याहत्तर रुपये करण्याचा प्रयत्न सरकारने केला तर  या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी ५० टक्‍क्‍यांनी कमी होईल. त्यामुळे पुढील आवर्तनात धान्याचे उत्पादन करण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागणार नाही.
प्रा. देसरडा म्हणतात की, शेतमालाचे भाव कमी राहावेत यासाठी सरकार प्रयत्नशील राहिल्याचे निदर्शनास येते. या विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. भारत सरकार १९६५ पासून काही शेती उत्पादनांसाठी किमान आधारभाव निश्‍चित करते. त्यामुळे संबंधित शेतमालाच्या किमती चढ्या होतात, असा तज्ज्ञांचा आक्षेप राहिला आहे. सरकार खुल्या बाजारातून सुमारे ६० दशलक्ष टन धान्य खरेदी करून त्याचे गोरगरीब लोकांमध्ये फुकटात वाटप करते. या कृतीचा धान्यांच्या बाजारभावावर काय परिणाम होतो? खुल्या बाजारात विकण्यासाठी २२ टक्के धान्य कमी उपलब्ध झाल्यामुळे अर्थातच धान्य महाग होते. थोडक्‍यात, शेतमालाचे भाव खालच्या पातळीवर स्थिर राहावेत यासाठी सरकार प्रयत्नशील राहिलेले दिसत नाही.

सरकार शेतमालाचे भाव कोसळू नयेत यासाठी जसे प्रयत्नशील राहिलेले दिसते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी दरवर्षी लाखो कोटी रुपये खर्च करताना दिसते. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळावा म्हणून सरकारने लाखो कोटी रुपये खर्च करून धरणे बांधली, कालवे काढले. या सिंचन योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पादक बियाणे स्वस्तात उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी संशोधनावर सरकार वर्षाला हजारो कोटी रुपये खर्च करते. सरकारचे बियाणे महामंडळ हा उद्योगही सरकारी तिजोरीवरील भार वाढविणारा आहे. तसेच रासायनिक खतांवरील सवलत (वर्षाला ८० हजार कोटी रुपये), शेतीसाठी जवळपास फुकटात वीज पुरवठा (वर्षाला सुमारे एक लाख २५ हजार कोटी रुपये), सिंचनासाठी अत्यल्प दराने पाणी पुरवठा, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान ज्ञात व्हावे म्हणून कृषी विस्तारकांचा मोठा फौजफाटा बाळगणे आणि ग्रामीण विकासासाठी वर्षाला लाख दीड लाख कोटी रुपये खर्च करण्याचे काम सरकार करते. असे प्रयत्न करूनही ग्रामीण भागातील दारिद्य्र कमी झालेले नाही हे वास्तव आहे. परंतु सरकारच्या उपरोक्त धोरणामुळे ग्रामीण भागात एक सधन शेतकऱ्यांचा गट निर्माण झाला आहे, हे देखील खरे आहे. 

सरकारने शेतमालाचे किमान आधारभाव पन्नास टक्‍क्‍यांनी वाढवावेत आणि शेतमालाचे भाव किमान आधारभावापेक्षा कमी राहणार नाहीत अशी व्यवस्था निर्माण करावी, अशी शेतकऱ्यांची एक मागणी आहे. म्हणजे सरकारने शेतमालासाठी किमान आधारभाव नव्हे, तर उसाप्रमाणे एफआरपी निश्‍चित करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांना ती स्वच्छ शब्दांत मांडता आलेली नाही. केवढी ही प्रगल्भता!
महागाईचे मोजमाप करणारा निर्देशांक म्हणजे ग्राहक मूल्य निर्देशांक हा होय. असा निर्देशांक गठित करण्याचे काम रिझर्व्ह बॅंक नव्हे तर लेबर ब्युरो करतो. मनात येतील त्या वस्तू व सेवा निवडण्याचा वा त्यांचा भार निश्‍चित करण्याचे स्वातंत्र्य लेबर ब्युरोला नसते. त्यामुळे भारतातील औद्योगिक कामगारांच्या एकूण उपभोग खर्चामधील खाद्यान्नावर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण लक्षात घेऊन ग्राहक मूल्य निर्देशांक गठित केला जातो. शेतकरी बंधूंनी आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी हे वास्तव जाणून घेतले पाहिजे. 

शेतमालाचे भाव सरकारने वाढविले तर काय होते हे २००७-०८ आणि २००८-०९ सालात आपण अनुभवले आहे. २००६ मध्ये डॉ. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाल्यावर २००७-०८ च्या रब्बी हंगामात सरकारने गव्हाच्या किमान आधारभावात ३३ टक्‍क्‍यांची वाढ केली. तसेच २००८-०९ च्या खरीप हंगामात भाताच्या किमान आधारभावात तशीच घसघशीत वाढ केली. त्यामुळे अर्थव्यवस्थेत महागाईचा आगडोंब उसळला. देशातील गोरगरीब लोकांना जिणे असह्य झाले. महागाई हा गोरगरीब लोकांवर लादलेला आणि त्यांना न चुकविता येणारा कर असतो, असे अर्थशास्त्र सांगते. तेव्हा किमान आधारभाव उत्पादन खर्चाच्या दीडपट एवढे करण्याचे सूत्र प्रत्यक्षात आणले तर महागाई वाढण्याचा दर किमान २५ ते ३० टक्के होईल. असे झाले म्हणजे ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना जीवन असह्य होईल. तसेच मोठ्या बागायतदारांच्या घरावर सोन्याची कौले चढतील. शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांना अर्थव्यवस्थेत असा बदल घडवून आणावयाचा आहे.

शेतकऱ्यांचे पुढारी राजू शेट्टी यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या व्यवस्थापकांना त्यांना मिळत असणाऱ्या पगाराच्या दुप्पट पगारावर शेतात बेणणी करण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले आहे. तेव्हा त्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, राजू शेट्टी यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी आधी त्यांच्याकडे राबणाऱ्या शेतमजुरांना चांगले जीवन जगण्यासाठी आवश्‍यक ठरणारे वेतन द्यावे. राजू शेट्टी वा त्यांच्यासारख्या शेतकरी नेत्याला रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर केले तर अर्थव्यवस्थेचे अल्पावधीत दिवाळे वाजेल हे सांगण्यासाठी कोणा अर्थतज्ज्ञाची गरज नाही. 

राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. यात सुधारणा व्हायला हवी. परंतु त्यासाठी सरकारने कोणता कार्यक्रम राबवायला हवा या संदर्भात अजून चर्चाही सुरू नाही. राज्यातील ७५ टक्के शेतकरी हे सीमांत वा अल्प भूधारक आहेत. ८२ टक्के शेतीला साधी संरक्षक सिंचनाची जोड नाही. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी हे शेतमालाचे नक्त ग्राहक आहेत, नक्त विक्रेते नव्हेत. त्यामुळे शेतमालाचे भाव वाढविले तर त्यांची होरपळच होणार आहे. राज्यातील बहुसंख्य गरीब शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणायची असेल तर दर हेक्‍टरी उत्पादन दुप्पट व्हायला हवे. तसे झाले तर गरीब शेतकऱ्यांची पोटाची खळगी तरी भरेल. शेतीला सिंचनाची जोड मिळण्यासाठी काय करावे याचा आदर्श वस्तुपाठ वाघाड धरणाच्या लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष उतरवला आहे. तसेच राळेगण सिद्धी, हिवरे बाजार, कडवंची यांसारख्या गावांनी लोकसहभागातून जलसंधारणेची कामे करून या गावांमधील शेती संपन्न करून दारिद्य्र निवारणाचे काम केले आहे. शेतमालाचे भाव वाढवून मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांनी असा ग्रामीण विकासाचा कार्यक्रम निश्‍चित करून तो राबविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु शेतकरी संघटनेच्या नेत्यांना गरीब शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणायची नाही आहे. त्यांना सधन शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

Ramesh Padhye : ९९६९११३०२९

(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...