शिक्षण, ग्रामोद्योगाला दिली चालना

शिक्षणाची झाली सोय आम्ही पाच बहिणी, एक भाऊ अशी भावंडं. त्यापैकी आम्ही दोघी इथं आलो. मोठी बहीण प्रियांका आठवीला अन्‌ मी सहावीला आहे. शिकून मोठं व्हायचं आहे. - रूपाली गारोळे (सावरगाव, ता. हदगाव, जि. नांदेड)
शाळेमध्ये संगणक प्रशिक्षण वर्ग.
शाळेमध्ये संगणक प्रशिक्षण वर्ग.

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मायेची ऊब आणि संकटांचा सामना करण्याचे बळ देण्याचे काम ''आपली मुलं''च्या छताखाली होत आहे. यासाठी साई ग्रामीण पुनर्रचना संस्थेने पुढाकार घेतला. शैक्षणिक उपक्रमाच्या बरोबरीने ग्रामीण भागातील महिलांना शेतीमधील तंत्र तसेच प्रक्रिया उद्योगाचेही प्रशिक्षण संस्था देणार आहे. भांबेरी (ता. अंबड, जि. जालना) येथील शामसुंदर कनके यांचे शिक्षण बी.एसस्सी. बीएडपर्यंत झाले आहे. सातवीत असताना आर्थिक अडचणींमुळे त्यांच्यावर शिक्षण सोडण्याची वेळ आली होती. त्यामुळे गरिबीत शिक्षण घेणं किती अवघड असते, याची त्यांना जाणीव होती. संघर्षमय जीवन वाट्याला आलेल्या कनके यांनी परभणी येथे १९९० ते २००३ पर्यंत खासगी शिकवणी वर्ग चालविले. त्यानंतर त्यांनी खासगी शिकवणीचे काम सोडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्यादृष्टीने काम हाती घेतले. शामसुंदर कनके यांनी औरंगाबादमध्ये १९९८ साली अडबंगीनाथ यांच्या नावाने सेवाभावी संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून २००४ मध्ये त्यांनी डॉ. हेडगेवार पब्लिक स्कूल, समर्थ विद्या मंदिर शिक्षण संस्था सुरू केली. ग्रामविकासाला चालना देण्यासाठी कनके यांनी २००६ मध्ये साई ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे रोपटे लावले. या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास करण्याचा उद्देश ठेवला. या उद्देशाला कर्तव्याची जोड देत त्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी दानशुरांच्या सहकार्यातून पूर्ण करण्याचा विडा उचलला. यासाठी स्वतःची मिळकत या संस्थेच्या उभारणीसाठी खर्च केली. हे काम पाहाताना 'पत्रास कारण की....बोलायची हिम्मत नाही...` या काव्य पंक्ती आठवून जातात.

 आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी संवाद  शामसुंदर कनके यांनी मराठवाडा आणि विदार्भातील जिल्हाधिकारी कार्यालयामधून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माहिती जमा केली. त्या कुटुंबीयांना आधार देण्याची तयारी दाखवणारी पत्रे पाठविली. एवढ्यावरच न थांबता औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेडसह विदर्भातील अकोला, वाशीम व बुलडाणा या जिल्ह्यांतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची स्वतः भेट घेऊन संवाद साधत त्यांना धीर दिला.

‘आपली मुलं` उपक्रमाला सुरवात  शामसुंदर कनके यांनी औरंगाबादमध्ये जून २०१५ अखेरपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या सुमारे दोनशे मुलांना स्वखर्चाने 'आपली मुलं' या स्वसंकल्पनेतील शैक्षणिक संकुलाच्या छताखाली एकत्र आणले. आता ही संख्या पावणेतीनशे मुलांवर पोहोचली आहे. यामध्ये ७२ मुली आहेत. या उपक्रमाची दखल घेत बरेच जण त्यांना सढळ हाताने मदतही करतात. अजुनही विविध सुविधांसाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींपैकी सातजणी सध्या संस्थेमध्ये मुलांचे संगोपन करतात. याबद्दल त्यांना मानधनही दिले जाते.  कनके यांनी स्वत:च्या कुटुंबासाठी राहत्या घरातील केवळ एक खोली ठेवली आहे. त्यांचा एक मुलगा वेल्लूर येथे अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला तर एक सहावीत शिकतोय.        चोंढाळ्यात आकार घेतंय शैक्षणिक संकुल साई ग्रामीण पुनर्रचना संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेले ''आपली मुलं'' हे शैक्षणिक संकुल आता पैठण तालुक्‍यातील चोंढाळा येथे कनके यांच्या मालकीच्या बत्तीस एकरात आकार घेत आहे. यासाठी उमदा फाउंडेशन, पुणे, बीजवाईज फाउंडेशन, पुणे आणि अजित सीड्‌सचा मोठा हातभार लागल्याचे कनके यांनी सांगितले. तीनही संस्थांच्या मदतीतून शाळा आणि पाण्याचा प्रश्न सुटत आहे. या प्रक्षेत्रावर शेततळेही खोदण्यात आले आहे. मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्याची कनके यांची इच्छा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च, अन्नधान्य मदत, विद्यार्थ्यांसाठी कपड्यांच्या मदतीची त्यांना गरज आहे. जेणेकरून ही मुले आनंदाने शिकतील, स्वतःच्या पायावर उभी राहातील, असा विश्वास त्यांना वाटतो. 

    उपक्रमाबाबत कनके म्हणाले, की संस्थेचा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीच्या उपायोजना विकसीत करण्याचा प्रयत्न आहे. याच परिसरात मुलांना शिक्षण, वृद्धाश्रम, विधवांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी गृह उद्योग, प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणाची सोय करणार आहे. संस्थेच्या प्रक्षेत्रावर महिलांना शेतीविषयक नवीन तंत्रही शिकविले जाणार आहे. यासाठी लोकसहभागाची गरज आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या वेदना मी क्षणाक्षणाला अनुभवतोय. या वेदनांची तीव्रता संपविण्यासाठी उपाययोजनांचा प्रयत्न आहे.

पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सोय  औरंगाबादमध्ये संस्थेच्या समर्थ विद्या मंदिर, डॉ. हेगडेवार पब्लिक स्कूलमध्ये मुलांना पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण मिळते. अजूनही शासनाचे कोणतेही अनुदान या शाळांना मिळत नाही. अत्यल्प मानधनावर ज्ञानदानाचे पवित्र काम कनकेंचे सहकारी करीत आहेत. याचबरोबरीने औरंगाबाद शहरातील चार व्यक्‍ती आपली नोकरी सांभाळून त्यानंतर मिळणाऱ्या वेळेत शालेय विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम विनामूल्य करतात.

 राज्यस्तरावर चमकले विद्यार्थी समर्थ विद्या मंदिर आणि डॉ. हेडगेवार पब्लिक स्कूलमधील मुलांनी भालाफेक, धावणे आणि गोळाफेक  स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर स्वतःचा ठसा उमटवला आहे. 

 संगणक प्रशिक्षण तीन महिन्यांपूर्वी मुंबईच्या समता फाउंडेशनने ‘आपली मुलं`च्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे म्हणून वीस संगणक संच भेट दिले. तसेच डिजिटल लॅबसाठी सहकार्यही केले. या उपक्रमामुळे संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक शिकण्याची कायमस्वरूपी सोय झाली आहे.

 -  शामसुंदर कनके, ९४२३३९२५६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com