अवकाशाला गवसणी घालणारा शास्त्रज्ञ

थोर भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग वयाच्या ७६ व्या वर्षी इंग्लडमधील केंब्रिज विद्यापीठ परिसरातील त्यांच्या राहत्या घरी १४ मार्च २०१८ रोजी शांतपणे मृत्यूस सामोरे गेले. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. गेली ५० वर्षे ते फिरत्या खुर्चीमध्ये खिळून होते. अशाही परिस्थितीत त्यांनी संशोधनातून अवकाशाला गवसणी घातली.
sampadkiya
sampadkiya

स्टीफन हॉकिंग २००१च्या नवीन वर्षाच्या सुरवातीस भारतात आले होते. मुंबईस्थित टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत त्यांचे व्याख्यान होते. त्या व्याख्यानास मी आवर्जून गेलो होतो. अनेकांनी मला सांगितले, ‘जाऊ नकोस, प्रचंड गर्दी असेल आणि ते काय बोलतात ते तुला समजणारच नाही.’ तरीही मी गेलो. याची देही याची डोळा त्यांची प्रतिमा मनात साठवली. ते फार कमी बोलले आणि तेही प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातूनच. स्टीफन यांना पाहण्यापेक्षा मला त्यांची ती वैज्ञानिक खुर्ची पाहायची होती. अशी खुर्ची, जी त्यांच्या शरीरास २४ तास कायम जखडून होती आणि तीसुद्धा १९६९ ते १४ मार्च २०१८ पर्यंत. त्यांना पाहून डोळे भरून आले. ‘देव एवढा हृदयशून्य असू शकतो?’ असा प्रश्‍न मनात आला; पण असे जर कोणी त्यांना म्हटले असते, तर त्यांना आवडले नसते. कारण प्रत्येक बाबीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच ते पाहत असत आणि वैज्ञानिक संशोधनातून समस्येवर मात करीत असत. त्यांची ती वैज्ञानिक खुर्ची विजेवर चालणारी होती आणि स्टीफन स्वतः ती चालवत, तेही वेगाने. खुर्चीच्या समोर अत्याधुनिक संगणक होता. त्याच्यावर बोटांचा वापर करून ते संगणकामार्फत वैज्ञानिक भाषणे देत. कारण मज्जातंतूंच्या दुर्धर आजाराने त्यांचा पूर्ण आवाजच गेला होता. ते बोलताना अनेकवेळा मला यंत्रमानवाचाच भास होत होता. केवळ हाताची बोटे, तल्लख मेंदू आणि गालाचा एक स्नायू यांच्या जिवावर या माणसाने देवावर विजय मिळवून भौतिक आणि अंतराळ संशोधनामधील अनेक टप्पे सिद्धांताच्या रूपात प्राप्त केले.

१९६३ म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी स्टीफन हॉकिंग यांना ‘मोटार न्यूरॉन’ हा आजार जडला आणि फक्त मेंदू वगळता त्यांचे संपूर्ण शरीर हळूहळू निष्क्रिय झाले. तज्ज्ञ डॉक्‍टरांनी ते वयाची पंचविशीसुद्धा पाहू शकणार नाहीत, हे सांगितले असतानाही ते ७६ वर्षे तृप्त आयुष्य जगले आणि वैद्यकीय क्षेत्रात एक आश्‍चर्य तयार झाले. २३ व्या वर्षी मृत्यू होणार हे निदान करणाऱ्या डॉक्‍टरांचे आभार मानताना ते म्हणतात, ‘‘मी सुदैवी आहे, की माझा हा आजार हळूहळू वाढत आहे. इच्छाशक्तीने मला जगण्याचे बळ दिले. यातून एक धडा प्रत्येकाने घ्यावा, की कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये.’’ 

अवकाश म्हणजेच अंतराळ विज्ञानावर त्यांनी शंभर वर्ष पुढचे संशोधन केले आहे. कृष्णविवरांवरील त्यांच्या संशोधनाची विज्ञानजगताने नोंद घेतली. अवकाशात अनेक कृष्णविवरे आहेत. प्रचंड वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचा स्फोट होऊन कृष्णविवर जन्माला येते आणि नंतर ते कधीच नष्ट होत नाही. उलट त्याचा आकार आणि वस्तुमान वाढतच जाते, अशी धारणा होती. मात्र, हॉकिंग यांच्या सिद्धांताने त्यास तडा गेला. स्टीफन हॉकिंग म्हणतात, ‘‘कृष्णविवरांमधून सतत ऊर्जा म्हणजे किरणोत्सार बाहेर पडतो, त्यामुळे त्याचे वस्तुमान कमी होत जाते. ती लहान होत जातात आणि कालांतराने नष्ट होतात. म्हणजेच त्यांना अमरत्व प्राप्त नाही.’’ याला ‘हॉकिंग इफेक्‍ट’ असे नाव दिले गेले आणि कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सारास ‘हॉकिंग रेडिएशन’ असे संबोधले गेले. वास्तविक या दोन सिद्धांतामुळे ते भौतिकशास्त्रामधील नोबेल पुरस्कारास पात्र ठरू शकले असते; पण या सिद्धांतांच्या सत्यतेची पडताळणी होऊ शकत नाही आणि नोबेलसाठी ही आवश्‍यक अट आहे. डॉ. हॉकिंग यांच्या सिद्धांतांना खूप विरोध झाला. प्रश्‍न होता, की कृष्णविवर जेव्हा नष्ट होते, तेव्हा त्याचा आकार कमी करणारे कण कुठे जातात? भविष्यात याचे उत्तर मिळेलही; पण त्यासाठी अब्जावधी वर्षे लागतील. कारण एवढे मोठे विवर नष्ट होण्यास एवढा कालावधी लागतोच. ते म्हणतात, ‘‘अंतराळामधील कृष्णविवरामध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि ती मध्यभागी एका बिंदूत एकवटलेली आहे. त्यांचाच स्फोट होऊन ही विश्‍वनिर्मिती झाली आहे. 

शारीरिक क्षमता नसतानाही केवळ तल्लख बुद्धीच्या जोरावर त्यांनी अंतराळामधील अनेक गूढ उकलण्याचा प्रयत्न केला. देवाचे अस्तित्व, कृत्रिम बुद्धिमत्ता, परग्रहावर प्रगत जीवसृष्टी असून यापासून पृथ्वीला धोका आहे, पृथ्वीवरून माणूस नामशेष होण्यास मानवच कारणीभूत ठरेल, ही त्यांची विधाने कायम चर्चेत राहिली. विश्‍वाची निर्मिती देवाने केली हे त्यांना पटत नव्हते. ते म्हणत, ‘‘याचे उत्तर विज्ञानच देऊ शकते.’’ ते असेही म्हणत, ‘‘मला मृत्यूची भीती वाटत नाही; मात्र मरणाची मला घाईसुद्धा नाही.’’ केवढे सूचक विधान आहे हे! डॉ. हॉकिंग यांना ब्रिटनच्या राजघराण्यातर्फे ‘नाइटहुड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाला. मात्र, केवळ मूलभूत संशोधनासाठी पैसे कमी मिळतात म्हणून त्यांनी तो नाकारला. डॉ. हॉकिंग यांचे मूलभूत विज्ञानावर खूप प्रेम होते. ते म्हणतात, ‘‘जोपर्यंत शास्त्रज्ञाच्या ज्ञानाचा पाया त्याच्या विषयामधील मूलभूत विज्ञानाने पक्का रचला जात नाही, तोपर्यंत त्यावर रचलेली आधुनिक तंत्रज्ञानाची इमारत नेहमीच तकलादू असेल.’’ कृषी क्षेत्रात आज नेमके हेच घडत आहे. जमिनीमधील उपयोगी जीवाणूंचे महत्त्व, सेंद्रिय कर्ब, आर्द्रता, पारंपरिक पिके, त्यांची आलटापालट, जमिनीस एक वर्ष आराम, वृक्षांचे - पक्ष्यांचे महत्त्व या सर्व मूलभूत बाबी आपण विसरत चाललो आहोत. मूलभूत कृषी विज्ञानावरच आधुनिक कृषीची इमारत रचली जाऊ शकते, हे ज्या वेळी सर्वांना पटेल, त्या वेळी बळिराजा खऱ्या अर्थाने सुखी होईल. 

डॉ. हॉकिंग म्हणतात, ‘‘निःशब्द माणसाचे मन सर्वाधिक गोंगाटी असते,’’ किती सत्य आहे हे! लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सर्व शेतकरी मृत्यूपूर्वी किती तरी दिवस निःशब्द होते. त्यांच्या मनामधील उद्‌ध्वस्त शेती-कुटुंबाचा, मुलांच्या शिक्षणाचा, मुलीच्या लग्नाच्या चिंतेचा गोंगाट कुणी लक्षातच घेतला नाही. डॉ. हॉकिंग म्हणत, ‘‘जीवनाच्या यशस्वी पायऱ्या चढताना इतरांची मदत घ्या; पण त्यांच्यावर अवलंबून राहू नका. त्यांच्या स्वयंचलित खुर्चीला एका व्यक्तीने पाठीमागून आधार देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रसन्न मनाने त्यांनी त्याचे आभार मानले; पण लगेच म्हणाले, ‘‘अरे तू जर असा माझ्या मागे आधारासाठी उभा राहिलास, तर मी परावलंबी बनेन आणि माझी प्रगती, अवकाश संशोधन थांबेल.’’ किती सत्य आहे हे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. बळिराजा आज शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. मग ते कृषी निविष्ठा असो, की शेतीतील कोणतेही काम असो. यातून बळिराजाने योग्य तो बोध घेऊन स्वावलंबी बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत. डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे मौल्यवान आयुष्य आपणा सर्वांना प्रेरणादायी ठरावे, एवढीच इच्छा!     DR. NAGESH TEKALE  : ९८६९६१२५३१ (लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com