agrowon marathi special article on weather situation in Bramhapuri,Dist. Chandrapur | Agrowon

...का वाढतंय ब्रह्मपुरीचं तापमान ?
संतोष डुकरे
रविवार, 10 जून 2018

राज्यातच नाही, तर अनेकदा देशातही सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणी झाली. गेल्या काही वर्षांत या ठिकाणचा कमाल तापमानाचा पारा सातत्याने उंचावत आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात येथे उष्णतेच्या झळा सर्वाधिक तीव्र असतात. वृक्षराजीने वेढलेल्या आणि खाणकाम किंवा औद्योगीकरण नसतानाही ब्रह्मपुरीचा उंचावता पारा हा स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरतो आहे.

राज्यातच नाही, तर अनेकदा देशातही सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणी झाली. गेल्या काही वर्षांत या ठिकाणचा कमाल तापमानाचा पारा सातत्याने उंचावत आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात येथे उष्णतेच्या झळा सर्वाधिक तीव्र असतात. वृक्षराजीने वेढलेल्या आणि खाणकाम किंवा औद्योगीकरण नसतानाही ब्रह्मपुरीचा उंचावता पारा हा स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरतो आहे.

एखाद्या ठिकाणी कोणत्याही एका हवामान घटकांची नोंद सातत्याने कमाल स्थितीला नोंदली जात असेल, तर हवामानशास्त्रीयदृष्ट्या ही अतिशय महत्त्वाची, दिशादर्शक किंवा धोकादर्शक बाब असते. हवामान बदलाची गती, त्याचे परिणाम आणि त्याला सामोरे जाण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना या सर्वांच्या अनुषंगाने या घटनांची दखल घेणे, त्यांची शास्रीय पद्धतीने उकल होणे अतिशय महत्त्वाचे आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूरच्या कमाल तापमानाची योग्य पद्धतीने दखल घेण्याची गरज आहे.
अनेकदा हवामान घटकांची नोंद घेणाऱ्या उपकरणांमध्ये झालेला बिघाड लक्षात न आल्यास एखादं वेळी अशी नोंद होते. हवामान खात्यामार्फत या नोंदींची खातरजमा केली जाते. बिघाडामुळे असेल तर नोंदींमध्ये सुधारणाही होते. विशेषतः किमान तापमानाच्या बाबतीत मानवी नोंदीमध्ये असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. आता स्वयंचलित यंत्रणा आणि त्या जोडीला मानवी नोंदी उपलब्ध असलेल्या ब्रह्मपुरीत अशी शक्यता नाही. कारण येथे यंत्रणा व मनुष्यबळही सजग असल्याचे दिसते.

ब्रह्मपुरी येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तापमान नोंदी घेण्यासाठी राज्यात सर्वसाधारणपणे वापरली जाणारी सर्व उपकरणे कार्यरत आहेत. यामध्ये ड्राय बल्ब, वेट बल्ब, थर्मामीटर वगैरे. मानवी नोंदणी पद्धती, भारतीय हवामानशास्र विभागाचे स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) आणि कृषी विभागाच्या महावेध प्रकल्पाचे स्वयंचलित हवामान केंद्र या तिन्ही हवामान नोंदीच्या यंत्रणा अवघ्या २० ते २५ फुटांच्या परिघात आहेत. हवामानाच्या नोंदी घेणारी व्यक्तीही प्रशिक्षित व गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याने नोंदी घेण्यातही चूक आढळत नाही. तात्पर्य येथील तापमान वाढ ही वस्तुस्थिती स्वीकारून अभ्यासावी लागणार आहे.
चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी विदर्भात सर्वाधिक तापमान असते, हे सर्वमान्य आहे. येथील ३३ कोळसा खाणी, वीज निर्मिती केंद्र, कच्चा पोलादाचे कारखाने, सिमेंट उद्योग, औद्योगिक वसाहती आणि वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यामुळे येथील तापमान जास्त असते असे सर्वसाधारपणे बोलले जाते. चंद्रपूरच्या बाबतीत ही स्थिती गृहीत धरली तर ब्रह्मपुरीच्या सातत्याने उंचावलेल्या तापमानाच्या कारणांना कोणते निकष लावणार ?  

वाढत्या तापमानाचा शोध घेण्याची गरज 
ब्रह्मपुरीचे तापमान सर्वोच्च पातळीवर नक्की कशामुळे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ऐन मेच्या मध्यावर ब्रह्मपुरीची पाहणी करून संबंधितांशी चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला. अर्थात या गोष्टी संबंधितांच्या वैयक्तिक निरीक्षणांच्या आहेत. तरीही स्थानिक अभ्यासूंच्या मते येथील भूपृष्ठरचना हे इथल्या उंचावल्या तापमानाचे एक मुख्य कारण. इथली जमीन खडकाळ आहे. शिवाय हे ठिकाणी चंद्रपूर व इतर ठिकाणाच्या तुलनेत अधिक उंचावर (समुद्रसपाटीपासून २३० मीटर उंची) आहे. काही अभ्यासक इथे वाढत असलेले प्रदूषण आणि घटत्या वनसंपदेलाही तापमानवाढीचे कारण ठरवतात. काहींच्या मते इथल्या स्थानिक भौगोलिक व पर्यावरणीय स्थितीमुळे वातावरणात उष्णता धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याचा हा परिणाम आहे. 

हवामान खात्याची आकडेवारी, उष्ण वाऱ्यांचे प्रवाह, कमाल तापमानवाढीच्या नकाशावर दृष्टीक्षेप टाकला असता राजस्थानपासून गडचिरोलीपर्यंतच्या भागात तापमानवाढीचा पॅटर्न दिसतो. मात्र आसपासच्या भागात कमी आणि नेमक्या याच ठिकाणी जास्त तापमानाचा फरक का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. चंद्रपूरमधील स्थानिकांनी जिल्ह्यातील तापमानवाढीचे गौडबंगाल उलगडण्याची मागणी यापूर्वी अनेकदा केली आहे. नागपूरमधील ‘निरी` संस्थेमार्फत याबाबत उत्सुकता दाखविली, मात्र निधीअभावी याबाबत काहीही हालचाल न झाल्याचे बोलले जाते. हवामान खात्याकडेही याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

तापमानवाढ हे कृषी क्षेत्रापुढील मोठे आव्हान आहे. त्या अनुषंगाने चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या आरोग्यापासून कृषीसंलग्न बाजारपेठेपर्यंत अनेक बाबतीत प्रचंड चढउतार आढळून येताहेत. यंदाच्या उन्हाळ्यात कोकणातही काही दिवस उष्णतेची लाट होती, विदर्भात ती जास्त दिवस होती आणि तापमान सातत्याने सरासरीहून उंचावले आहे, ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी.

ब्रह्मपुरीची भौगोलिक आणि पर्यावरणीय स्थिती 
चंद्रपूरपासून सुमारे १२५ किलोमीटर उत्तर-पूर्वेला आणि नागपूरपासून सुमारे ११५ किलोमीटर दक्षिण पूर्वेला ब्रह्मपुरी आहे. गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांच्या सीमेनजीक बारमाही वैनगंगा नदीचे सानिध्य ब्रह्मपुरीला लाभले आहे. चंद्रपूरच्या आणि ब्रह्मपुरीच्या मध्यात विस्तीर्ण ताडोबा व्याघ्रप्रकल्पाची दाट वृक्षराजी आहे. दुसरीकडे आरमोरी - ब्रह्मपुरी दरम्यानही जंगल आहे. लगत भंडारा जिल्ह्यातही झाडीचे प्रमाण जास्त आहे. झाडीपट्टी म्हणून हा भाग पूर्वापार प्रसिद्ध आहे. शिवाय ब्रह्मपुरी परिसरात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगाम भात, कापूस व इतर पिके घेतली जातात. अनेक शेतकरी उन्हाळ्यातही भात व भाजीपाला पिकांचे यशस्वीपणे उत्पादन घेतात. इथं कोळसा खाणी नाहीत की औद्योगीकरण नाही, मग तरिही तापमानात वाढ का होते? हा प्रश्न आहे. अनेकदा ब्रह्मपुरीचा पारा चंद्रपूराहूनही अधिक उंचावलेला असतो.
 

जून महिन्यात उच्चांकी तापमान 

 • जून हा ब्रह्मपुरी आणि चंद्रपूरचा उच्चांकी कमाल तापमानाचा महिना.
 •  ब्रह्मपुरीत १६ जून २०१६  रोजी ४७.५ अंश सेल्सिअस तर चंद्रपूरला २ जून २००७ रोजी ४९ अंश सेल्सिअस कमाल तापमान. 
 • नागपूरला १९ मे २०१५ रोजी ४८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद.
 • मालेगाव, भिरा, बुलढाणा, अकोला, जळगाव, वर्धा, चंद्रपूर येथे गेल्या काही वर्षात सातत्याने तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सिअस. 
 •  मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर ही शहरेही आता उष्ण.
 •  १६ एप्रिल २०१८ ला चंद्रपूरमध्ये ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, हे त्या दिवसाचे जगातील सर्वाधिक कमाल तापमान.
 • राजस्थानमधील फालोडी येथे १९ मे २०१६ रोजी देशातील सर्वाधिक ५१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची उच्चांकी नोंद.

असे आहे ब्रह्मपुरीचे हवामान 

 •  सामान्यतः उष्ण व कोरडे हवामान. उन्हाळ्यामध्ये ४७ अंश तर हिवाळ्यामध्ये ७ अंश सेल्सिअस.
 •  पावसाचे चांगले प्रमाण. १३ जुलै २०१३ रोजी एका दिवसात २०२ मिलिमीटर पाऊस पडला. (यापूर्वी २४ तासात १३१ मिलिमीटर पावसाने चंद्रपूरमध्ये जलप्रलयसदृश्‍य स्थिती झाली होती.) येथे ३०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडूनही पुराची स्थिती उद्भवत नाही. 
 •  दिवस जसा तापतो, तशीच रात्रही उष्ण असते. विदर्भात सर्वाधिक काळ उष्णतेची लाट या भागात असते. 

मे महिन्यातील उच्चांकी तापमान (अंश सेल्सिअस)

 • ९ मे २०१८   : ४६.७
 • १२ मे २०१८  :  ४५.१
 • १३ मे २०१८   : ४३.५
 • २९ मे २०१८   : ४७

ब्रह्मपुरीचे सर्वोच्च कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

 • १६ जून २०१६  :  ४७.५
 • २०१७   : ४६.८
 • २९ मे २०१८  :  ४७

(आकडेवारी स्रोत ः  हवामान नोंद कक्ष, ब्रह्मपुरी)

 - श्री. डुकरे,९८८११४३१८०
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...