वन्यप्राणी नुकसानीत अशी मिळवा भरपाई

वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीत भरपाई हवी असेल, तर गावकऱ्यांनी वन आणि वन्यजीव कायद्याचे पालन तर करायलाच हवे, पण वन विभागाच्या वन्यजीव संवर्धनाच्या कामात सक्रिय सहभागही घ्यायला हवा.
sampadkiya
sampadkiya

ॲग्रोवनच्या ३ एप्रिलच्या अंकात वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यास तसेच मानव जीविताची अथवा पाळीव प्राण्यांची हानी केल्यास देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईबाबत माहिती दिली होती. ही नुकसानभरपाई काही अटी व शर्तीच्या अधिन राहून देण्यात येते. त्यामुळे या अटी व शर्ती कोणत्या असे विचारणारे अनेक फोन राज्यभरातून आलेत. या अटी शर्ती शेतकऱ्यांना माहीत असल्याशिवाय नुकसानभरपाईचा लाभ त्यांना घेता येणार नाही. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी नेमक्या कोणत्या अटी आणि शर्ती आहेत पाहूया...   

अ) वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत / गंभीर अथवा किरकोळ जखमी झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास  -   वन्यप्राण्यांकडून झालेले हल्ला हा सदर व्यक्तीने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या तरतुदींचा भंग करताना झालेला नसावा. उदा. वन अधिकाऱ्याच्या लेखी परवानगी शिवाय एखादी व्यक्ती राखीव अथवा संरक्षित क्षेत्रात गेली किंवा परवानगी घेतली आहे; परंतु तिने वन्यप्राण्यांच्या शिकार करण्याचा प्रयत्न केला तर नुकसानभरपाई मिळत नाही.  -  हल्ला झालेल्या व्यक्तीने अथवा त्यांच्या नातेवाईक/मित्रांनी हल्ला झाल्यापासून ४८ तासांच्या आत नजिकच्या वन अधिकाऱ्याला/कर्मचाऱ्याला कळवावे. हल्ला झाल्यापासून तीन दिवसांच्या आंत वन किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पंचनामा करणे आवश्यक आहे. वेळेचे बंधन यासाठी आहे की, जास्त वेळ गेला तर पुरावे कमकुवत किंवा नष्ट होतात मग पंचनामा करणे कठीण होते. पंचनाम्यात नुकसान भरपाईची योग्य रक्कम नमूद करण्यात अडचणी येतात. संशय निर्माण झाल्याने निर्णय घ्यायला विलंब होऊ शकतो. किंवा वन अधिकाऱ्याकडून चुकीचा निर्णय दिला जाऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.  -  व्यक्ती मृत झाल्यास आर्थिक मदत फक्त कायदेशीर वारसालाच दिली जाते. अर्थ सहायाची रक्कम केवळ रेखांकित धनादेशाद्वारे दिली जाते. त्यामुळे रोख रक्कम देण्यासाठी आग्रह धरू नये. धनादेशामुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो.  सदर व्यक्तीच्या नावे बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे.

ब) पशुधनाचा मृत्यू/अपंगत्व आल्यास   -  मालकाने जनावर मेल्यापासून किंवा घटना घडल्यापासून ४८ तासांच्या आत वन अधिकाऱ्याला कळविले पाहिजे. शक्यतो लेखी अर्ज करावा व अर्ज मिळाल्याचा सही, शिक्का घ्यावा. तक्रार दाखल केल्यावर वन अधिकाऱ्यांनी तातडीने जागेवर जाऊन पंचनामा करणे आवश्यक आहे. अधिकाऱ्याकडून पंचनाम्याची व जबाबाची प्रत मागून घावी व जपून ठेवावी. पंचनाम्यामध्ये पंचांनी जनावराची बाजारभावाप्रमाणे योग्य किंमत नमूद केली आहे की नाही याची खात्री करावी. त्याप्रमाणेच भरपाईची रक्कम निश्चित केली जाते.   -  वन्यप्राण्याने ज्या ठिकाणी जनावर मारले असेल त्या ठिकाणावरून जनावराचे शव हलवू नये. जनावर हलवले तर वन्य प्राणी ते खात नाहीत व दुसरे जनावर मारतात.  -  जनावराचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या ठिकाणापासून १० कि.मी. भागात कोणत्याही वन्यप्राण्याचा सहा दिवसांपर्यंत विष देऊन मृत्यू झालेला नसावा. मेलेल्या जनावरावर विष टाकून वन्यप्राण्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. नाहीतर नुकसान भरपाई तर मिळणार नाहीच उलट संबंधित व्यक्तीवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाखाली शिकारीचा गुन्हा दाखल करण्याचा वन व पोलिस अधिकाऱ्यांना अधिकार आहे. त्यासाठी कायद्यात जबर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.   -  जनावर अनधीकृतरीत्या जंगलात चरत असताना वन्यप्राण्याने मारले तर भरपाई मिळत नाही.

क) वन्यप्राण्यांनी पिकाचे नुकसान केल्यास  -  पीक नुकसानीची तक्रार अधिकार क्षेत्र असलेल नजीकचे वनरक्षक, वनपाल अथवा वन परिक्षेत्र अधिकारी यांचेपैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसांत करावी.  -  त्याची शहानिशा संबंधीत वनरक्षक, कृषी सहाय्यक आणि तलाठी अशा तीन सदस्यांच्या समितीमार्फत १० दिवसांचे आंत करण्यात येते. त्यासाठी जागेवर जाऊन पंचनामा करणे, नुकसान क्षेत्राची मोजणी करणे, पुरावे तपासणे व नुकसानीचे मूल्य ठरविणे हे या समितीकडून अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनीही नुकसानीची मोबाईलवर छायाचित्रे काढून पुरावे गोळा करून ठेवल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. अनेक वेळा शासकीय कामाच्या व्यस्ततेमुळे हे तीन कर्मचारी एकत्र येण्यास विलंब होतो व वन कर्मचाऱ्यांवर त्याचे खापर फोडले जाते पण ते योग्य नाही.   -  प्रत्येक प्रकरणी नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित सहाय्यक वनसंरक्षक यांनी घटना घडल्याचे तारखेपासून तीस दिवसांत काढणे आवश्यक आहे. व आदेश काढल्यानंतर एक महिन्याचे आत बाधित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे. थोडक्यात काय तर भरपाईची रक्कम शेतकऱ्याला उशिरात उशिरा साठ दिवसांत मिळालीच पाहिजे.    -   ऊस पिकाचे नुकसानीसाठी रुपये ८०० प्रती मे. टन असे वजनावर आधारीत न ठेवता ज्या तालुक्यामध्ये ऊस पिकाचे नुकसान होईल त्या तालुक्याच्या मागील ८ वर्षाची कृषी विभागाने काढलेल्या उसाच्या उत्पादकतेवरून सरासरी उत्पादकता काढून त्यानुसार ऊस पिकाची नुकसान भरपाई देण्यात येते.    -  ज्या व्यक्तींना पीक संरक्षणार्थ बंदूक परवाने देण्यात आले आहेत, अशा व्यक्तीच्या शेतीची नुकसान भरपाई विहित दराने वन्यहत्ती किंवा रानगवा किंवा इतर वन्यप्राणी यांना इजा किंवा त्यांची शिकार झाली नसल्याची खात्री झाल्यानंतरच देण्यात येते. रानडुकरांची शिकार करण्याचे अधिकार संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत; पण त्याचा पुरेसा वापर करण्यात येत नसल्याने समस्या तीव्र झाली आहे. आता शेतकऱ्यांनाच रानडुकराच्या शिकारीचे परवाने दिल्याशिवाय समस्या सुटणार नाही असे वाटते. पण शेतकऱ्यांनीही बंधने पाळून संयमाने त्याचा वापर करायला हवा.

ड) नुकसान भरपाईसाठी अपात्र ठरविण्यात येणारी प्रकरणे.  -  वनजमिनीवर अतिक्रमणाद्वारे करण्यात येणारी शेती. -   भारतीय वन किंवा वन्यजीव अधिनियमांतर्गत ज्यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे अशा व्यक्तींची शेती.  -  ज्या कुटुंबात ४ पेक्षा जास्त गुरे मुक्त चराईसाठी जंगलात जातात त्या कुटुंबाची शेती.  -   मागील एक महिन्याच्या कालावधीत वन्यप्राण्यांच्या शिकारीची घटना झालेली गावे.

थोडक्यात काय तर नुकसान भरपाई हवी असेल तर गावकऱ्यांनी वन आणि वन्यजीव कायद्याचे पालन तर करायलाच हवे, पण वन विभागाच्या वन्यजीव संवर्धनाच्या कामात सक्रिय सहभागही घ्यायला हवा. सेवा हमी कायद्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम ३० ते ६० दिवसांत देण्याची तरतूद करण्यात आली आहे, पण शेतकऱ्यांनीही वेळोवेळी त्यासाठी पाठपुरावा करण्याची व वन खात्यावर त्यासाठी सामाजिक दबाव टाकण्याची गरज आहे. PRABHAKAR KUKDOLKAR ः ९४२२५०६६७८ (लेखक निवृत्त वन अधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com