वन्यप्राणी नुकसानभरपाई ः गरज प्रबोधनाची

वन्यप्राण्यांनी शेतपिकांचे, फळबागांचे नुकसान केल्यास किंवा मानव जीविताची अथवा पाळीव प्राण्यांची हानी केल्यास काही अटी आणि शर्तींच्या अाधीन राहून शासनातर्फे नुकसानभरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नसून अधिक प्रबोधन होणे गरजेचे आहे.
sampadkiya
sampadkiya

आपले पूर्वज वन्यप्राणांचे महत्त्व जाणून होते. वाघ, सिंह, हत्ती, गरुड, अजगर, नाग अशा मोठ्या प्राण्यांची निसर्ग संतुलन राखण्यातील भूमिका त्यांना माहीत होती. त्यांचे कायमस्वरूपी संवर्धन होणे आवश्यक आहे, हे त्यांनी जाणले होते. आपल्या भरल्या ताटातील एक घास परिसरातील जिवांसाठी बाजूला काढून ठेवावयाचा ही शिकवण आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिली आहे. मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील वाढता संघर्ष लक्षात घेतला, तर आज त्याचे अनुसरण प्रकर्षाने करावयाची वेळ आली आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. 

मानव जातीचा विकास म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास असे आज समीकरणच झाले आहे. केवळ आपल्या देशातच नव्हे; तर जगातील अनेक देशांत हीच परिस्थिती आहे. पर्यावरणाचे नुकसान करून साध्य होणारा विकास दीर्घकाळ टिकणारा नाही याची जाणीव पर्यावरण शास्त्रातील तज्ज्ञमंडळी आपल्याला सातत्याने करून देत आहेत इतकेच नव्हे; तर त्यामुळे भविष्यात पर्यावरणात जे बदल होतील त्याचे कितीतरी दुष्परिणाम थेट आपल्या जीवनावर होतील हे ही सांगत आहेत. पण केवळ मानव जातीच्या विकासाचा ध्यास घेतलेले आपण सर्वजण आजतरी याकडे काणाडोळा करत आहोत. मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील दिवसेंदिवस वाढत जाणारा संघर्ष हे आपण निसर्गात केलेल्या नको तेव्हढ्या ढवळाढवळीचे परिणाम आहेत. निसर्गातील इतर जिवांना दुय्यम स्थान देण्याच्या आपल्या मनोवृत्तीमुळे आपण आपल्याशी संघर्ष करणाऱ्या वन्यप्राण्यांना नष्ट करून किंवा त्यांना कायमच पिंजऱ्यात बंदिस्त करून या संघर्षातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण निसर्गामध्ये प्रत्येक सजीवाला स्वतःच असं स्थान असतं; आणि पर्यावरणांच संतूलन टिकवून ठेवण्यासाठी छोटे छोटे जीवही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अशा जातींना संपवून, त्यांचा नायनाट करून आपल्याला काही काळ स्वस्थता लाभेलही; पण आपल्या अशा वर्तणुकीमुळे भविष्यात निसर्गाचं संतुलन जास्त बिघडण्याची शक्यता आहे. त्याची वाईट फळं आपल्याला आणि विशेषतः आपल्या भावी पिढ्यांना भोगावी लागतील. थोडं सजग होऊन आपण आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीकडे पाहिलं तर लक्षात येईल, की इथं प्रत्येक जीव त्याची जात अनंतकाळ पृथ्वीवर टिकून राहावी यासाठी अविरत परिश्रम घेत असतो. मानवाची जातही पृथ्वीवर अनंत काळ राहावी आणि येणारी प्रत्येक पिढी अधिक सुखी, समाधानी व्हावी, असे वाटत असेल तर निसर्गातील प्रत्येक सजीवांचे महत्त्व आपण जाणले पाहिजे. त्यांना जपले पाहिजे, वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊन हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मानवी वस्तीत वारंवार येणारा बिबट्या या सर्व प्राण्यांचे प्रतिनिधित्व करत आहे. सर्व संघर्ष जागे साठी आणि अन्नपाणी यांसारख्या जीवनावश्यक गरजांसाठी आहे. माणसाच्या तुलनेत वन्यप्राण्यांच्या गरजा कितीतरी कमी आहेत. वन्यप्राण्यांसाठी आपण जंगलाचा काही भाग राखीव ठेवला आणि त्यांच्या अन्न आणि पाणी यांसारख्या किरकोळ गरजा भागविल्यास त्यांच्या बरोबर होणारा संघर्ष निश्चित कमी करता येईल.

वन्यप्राण्यांंमुळे नुकसान झाल्याने लोकांच्या मनात वन्यप्राण्यांबद्दल राग निर्माण होतो. पर्यायाने त्यांच्या संरक्षण संवर्धनामध्ये ते सहकार्य करत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्यास नियमानुसार त्याची नुकसानभरपाई त्यांना तत्काळ देणे आवश्यक आहे. नुकसानभरपाई देणे  शक्य नसल्यास त्याची कारणे त्यांना समजावून सांगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

नुकसानभरपाईचा तपशील वन्यप्राण्यांनी शेतपिकांचे, फळबागांचे नुकसान केल्यास किंवा मानव जीविताची अथवा पाळीव प्राण्यांची हानी केल्यास काही अटी आणि शर्तींच्या अाधीन राहून शासनातर्फे नुकसानभरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अ) वन्यप्राण्यांमुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास मिळणारे सानुग्रह अनुदान. वाघ, बिबट, गवा, अस्वल, हत्ती, मगर, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा आणि रानकुत्रा या वन्यप्राण्यांमुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास खालीलप्रमाणे सानुग्रह अनुदान दिले जाते.    व्यक्ती मृत झाल्यास - ८,००,००० रु.    व्यक्तीला कायमचे अपंगत्व - ४,००,००० रु.    व्यक्ती गंभीर जखमी - १,००,००० रु.    व्यक्ती किरकोळ जखमी  - १५००० रु. 

ब) पशुधनाचा मृत्यू/ अपंगत्व/जखमी झाल्यास मिळणारी नुकसानभरपाई.    गाय, बैल, म्हैस मृत्यू - बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा रुपये २५,००० यापैकी कमी असणारी रक्कम.    मेंढी, बकरी व इतर पशुधन मृत्यू - बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा रुपये ६,००० यापैकी कमी असणारी रक्कम.    गाय, बैल, म्हैस यांना कायम अपंगत्व -  बाजारभाव किमतीच्या ५० टक्के किंवा रुपये ७,५०० यापैकी कमी असणारी रक्कम.    गाय, बैल, म्हैस, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी -  बाजारभाव किमतीच्या २५ टक्के किंवा रुपये २,५०० यापैकी कमी असणारी रक्कम. 

क) वन्यप्राण्यांनी शेतपिकांचे नुकसान केल्यास रानडुक्कर, रानगवा, हरिण (सारंग आणि कुरंग), रोही (नीलगाय), माकड तसेच वनहत्ती या वन्यप्राण्यांनी शेतपिकांचे नुकसान केल्यास खालीलप्रमाणे नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.     रुपये १०,००० पर्यंत नुकसान - पूर्ण परंतु किमान रुपये १०,०००    रुपये १०,००० पेक्षा जास्त नुकसान - रुपये १०,००० अधिक त्यापेक्षा जास्तीच्या नुकसानीच्या ८० टक्के रक्कम (२५ हजार कमाल मर्यादा)    ऊस - रुपये ८०० प्रति मे. टन (२५ हजार कमाल मर्यादा)

ड) वन्यहत्ती व रानगवे यांनी फळबागांचे नुकसान केल्यास प्रतिझाड मिळणारे अर्थसाह्य नारळ  - ४८०० रु., सुपारी - २८०० रु., कलमी आंबा - ३,००० रु., केळी - १२० रु., संत्रा, मोसंबी - २४०० रुपयांपर्यंत,  इतर फळझाडे - ५०० रु.  गिधाडांद्वारे होणाऱ्या नारळांची नुकसानभरपाई प्रतिनारळ ७ रुपये, प्रतिहंगाम प्रतिझाड जास्तीत जास्त रुपये ४००. गिधाडांच्या विणीचा हंगाम संपेपर्यंत शेतीमालकाने घरट्यास संरक्षण देणे आवश्यक आहे. वन्यप्राण्यांद्वारे जीवित-वित्त हानी झाली, तर नुकसानीच्या प्रमाणात नाही; परंतु शेतकऱ्यांची नड भागावी, त्यास थोडाफार आर्थिक आधार लाभावा या हेतूने नुकसान भरपाई मिळते. परंतु बहुतांश शेतकऱ्यांमध्ये याबाबत प्रबोधन झालेले नाही. हे काम शेतीशी संबंधित गाव पातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांनी करायला हवी. संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत प्रयत्नही वाढवायला हवेत.  PRABHAKAR KUKDOLKAR ः ९४२२५०६६७८ (लेखक निवृत्त वन अधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com