agrowon marathi special article on world water day | Agrowon

विहिरींद्वारे महाराष्ट्र होईल जलमय
BAPU ADAKINE
गुरुवार, 22 मार्च 2018

महाराष्ट्रात सध्या २० लाखांच्या आसपास विहिरी असून, दररोज संख्येत वाढ होत आहे. भूजल विकास यंत्रणेच्या अनुमानानुसार राज्यात आणखी लाखो विहिरी करायला वाव आहे. शक्‍य असलेल्या सर्व विहिरी तयार झाल्यास सिंचन क्षेत्राच्या टक्‍क्‍यांत मोठी वाढ होईल.

राज्यात शक्‍य अशा सर्व ठिकाणी धरणे झाली. धरणांमुळे सगळीकडे विपुल पाणी होईल, असे वाटले होते, पण तसे घडले नाही. अंदाज केला होता ४०-५० टक्के सिंचनाचा, पण प्रत्यक्षात ८-१० टक्‍क्‍यांच्या वर सिंचन होत नाही. उपलब्ध असलेले पाणीसुद्धा कसे वापरायचे, हे माहीत नाही. धरणात अडवलेले अर्धे अधिक पाणी कालव्याद्वारे पुन्हा नदीत सोडायचे, अशी सर्वेश्‍याम पद्धत आहे. पाणीवापराबाबत कोणीही गांभीर्याने विचार करायला तयार नाही. त्यामुळे शेकडो धरणे बांधली, तरी सिंचन फारच मर्यादित राहिले. आज घडीला जे सिंचन होते त्यातले निम्म्यापेक्षा जास्त विहिरींच्या पाण्यावर होते. आपल्याकडे विहीर हे सिंचनासाठी अधिक उपयुक्त साधन असेल, तर काही वर्षे धरण व्यवस्थेवरचा खर्च बंद ठेवून सर्व लक्ष विहिरींवर केंद्रित का करू नये?
विहीर आणि धरणांची तुलना केली, तर विहीर अल्पमोली, अखुडशिंभी आणि बहुदुधी असल्याचे निदर्शनास येईल. विंधन विहीर काही तासांत तयार होते. उघडी विहीर दोन तीन महिन्यांत तयार होते; तर धरण तयार होऊन शेतात पाणी यायला एक-दोन पिढ्यांचा काळ लोटतो. विहिरीला अगदी थोडी जागा लागते. धरणासाठी अनेक गावे विस्थापित करावी लागतात. विस्थापितांचे प्रश्‍न कसे अडगळीला पडतात आणि किती लोक देशोधडीला लागतात, ते सर्वज्ञात आहे. विहिरीचा खर्च राई एवढा, तर धरणाचा पर्वताएवढा असतो. विहिरीच्या पाण्याची प्रतिघनमीटर उत्पादकता महत्तम मिळते, तसेच प्रकल्प कार्यक्षमता ९५ टक्‍क्‍यांच्या वर असते. धरणाच्या पाण्यावरची उत्पादकता व प्रकल्प कार्यक्षमता न परवडतील एवढ्या कमी असतात. विहिरीच्या पाण्यावर वैयक्तिक मालकी असते. धरणाचे पाणी परस्वाधीन असते. विहिरीचे पाणी फक्त शेतीसाठी वापरता येते. धरणाच्या पाण्यावर नागरी वसाहती, कारखाने, उद्योग अवलंबून असतात. विहिरींच्या व्यवस्थापनाचा खर्च नगण्य, तर धरणांचा अफाट! आणखी खूप मुद्दे आहेत, की ज्यामुळे विहीर धरणापेक्षा अधिक उपयुक्त ठरते. जे अधिक उपयुक्त आणि आवाक्‍यातले, त्याला प्रथम प्राधान्य द्यायचे, ही सूज्ञांची रीत असते. सूज्ञता असती, तर धरणांवरचा एवढा खर्च पाण्यात गेला नसता. तसा शहाणपणात आपल्या देशाचा ५१वा नंबर आहे म्हणतात, पण शहाणी माणसे शहाण्यासारखी कधीच वागत नाहीत, हा जागतिक इतिहास आहे!

ज्याच्या शेतात विहीर ते कुटुंब सुखी, असा आपला पारंपरिक अनुभव आहे. कुटुंबाच्या मिळकतीत थोडी बचत झाली की लगेच शेतात विहीर खोदायचा विचार सुरू होतो. पूर्वी अपार कष्ट करून ज्यांनी विहिरी खोदल्या त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण झाले. स्वातंत्र्यानंतर कर्जाच्या सोई झाल्यामुळे विहिरींची संख्या वाढली. विजेचे पंप आणि पीव्हीसी पाइप आल्यामुळे विहिरींचा वापर सुलभ झाला. खोदायचे तंत्र सुधारल्यामुळे कमी श्रमात, कमी वेळेत विहिरी झटपट होऊ लागल्या. लाभ क्षेत्रात विहिरी असणे अनिवार्य झाले. महाराष्ट्रात सध्या २० लाखांच्या आसपास विहिरी असून, दररोज संख्येत भर पडत आहे. भूजल विकास यंत्रणेच्या अनुमानानुसार राज्यात आणखी लाखो विहिरी करायला वाव आहे. शक्‍य असलेल्या सर्व विहिरी तयार झाल्यास सिंचन क्षेत्राची व्याप्ती मागे वर्तवलेल्या सर्व अंदाजांपेक्षा जास्त होईल. 

पाणी ही दर वर्षी नव्याने मिळणारी निसर्ग संपदा आहे. जगातल्या एकूण पृष्ठभागावर वर्षाला सरासरी ७०० मि.मी. पाऊस पडतो. महाराष्ट्रात सरासरी ९२० मि.मी. पाऊस पडतो. दिवसाला दरडोई ६७०० लिटर पाणी मिळते. घरगुती वापर, कारखानदारी, शेती, मनोरंजन अशा सर्व गरजांसाठी सध्या आपण दरडोई प्रतिदिन ८०० लिटरपेक्षा कमी पाणी वापरतो. याचा अर्थ निसर्गाने आपल्या गरजेपेक्षा आठ पट जास्त पाणी दिले आहे. एवढे मुबलक पाणी असूनसुद्धा टंचाई, म्हणजे आपले कुठेतरी चुकते आहे.

जमिनीच्या पृष्ठभागात माती किंवा मुरूम असतो. मशागत, वनस्पतीची मुळे, तसेच प्राण्यांच्या वास्तव्यामुळे वरचा एक-दोन मीटर खोलीचा थर सच्छिद्र झालेला असतो. या दोन मीटर खोलीत ७० ते ८० सेंमी पाणी बसते. एक हेक्‍टर क्षेत्रात ८० लाख लिटर पाणी साठवले जाते. जिथे कोणतेही उपाय केलेले नाहीत, अशा जमिनीत पावसाचे १८ ते २० टक्के पाणी मुरते. त्याच जमिनीला बांधबंदिस्ती करून मूलस्थानी जलसंधारणाचे तंत्र वापरल्यास पडणारा ६० ते ७० टक्के पाऊस जमिनीत मुरतो. 
जमिनीच्या पृष्ठभागापासून ३० मीटर खोलीपर्यंत खडकाची बरीच झीज झालेली असून, या ठिसूळ भागात विपुल पोकळ्या असतात. वरच्या दोन मीटर थरात भरलेले पाणी सरळ खाली शिरून खालची सच्छिद्रता भरून टाकते. खालच्या कठीण खडकापासून पाणी जसजसे भरेल तशी भूगर्भ जलाची पातळी वर येते. हे पाणी मोकळे असते. त्यावर दाब नसतो. ते उताराच्या दिशेने वाहते. परिसरातल्या विहिरीतून उपसा झाला किंवा नदीकडे पाणी झऱ्याच्या रूपाने गेले, तरी पाणीपातळी खाली जाते.

खडक झिजून फुटतात. त्यात लांब रुंद भेगा पडतात. भेगात पाणी भरल्यावर ते पुन्हा झिजतात व फुटतात. पृष्ठभागापासून ३० मीटर खोलीच्या थरात जो ‘फ्री वॉटर टेबल’ तयार होतो त्यातले पाणी कठीण खडकातल्या भेगात शिरून खालचा पोकळ भूस्तर भरला जातो. खालचा भूस्तर पूर्ण संपृक्त होईपर्यंत ही नैसर्गिक पुनर्भरण प्रक्रिया संपूर्ण प्रदेशाच्या भूगर्भात अव्याहत चालू असते. या विवेचनावरून महाराष्ट्रातले झीज न झालेले कठीण खडकाचे काही टापू व खारपट्टी वगळता इतरत्र सिंचन विहिरी करायला अजून पुष्कळ वाव आहे.

महाराष्ट्रात ५००-६०० मि.मी. पावसाच्या विभागात पाणलोट क्षेत्र विकसित करून विहिरीद्वारे ५० टक्के क्षेत्रावर बारमाही सिंचन अनेक वर्षांपासून होत असल्याची उदाहरणे आहेत. जमिनीची उत्पादकता अबाधित ठेवण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकासाचे काम कधीतरी प्रामाणिकपणे करणे आवश्‍यकच आहे. लाखो विहिरींची शृंखला सुरळीत कार्यरत राहण्यासाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा असणे जरुरी आहे. सध्या विजेची अवस्था वाईट आहे. अपारंपरिक ऊर्जास्त्रोते अजूनतरी व्यवहार्य झालेली नाहीत. सिंचन आणि इतर ग्रामीण गरजांसाठी स्वतंत्र विद्युत निर्मिती आणि वितरण व्यवस्था असल्याशिवाय सिंचनासोबत ग्रामीण औद्योगीकरणाला गती मिळणार नाही. 

BAPU ADAKINE : ९८२३२०६५२६
(लेखक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत.)
 

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...