‘वावर`च्या माध्यमातून जिल्ह्याचा होणार कायापालट

अकोला : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांना वावर संस्था नोंदणी प्रमाणपत्र देताना जिल्हा उपनिबंधक.
अकोला : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांना वावर संस्था नोंदणी प्रमाणपत्र देताना जिल्हा उपनिबंधक.

 शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि ग्राहकांच्या हिताकरिता जिल्हा प्रशासनाचा ‘वावर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम अकोलेकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. ॲप, वेबसाइट यांसारख्या अत्याधुनिक तंत्राची जोड देऊन अत्यंत गुणवत्तापूर्ण ताजा शेतीमाल थेट ग्राहकांना स्वस्त दरात या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्याचे नियोजन सुरू झाले आहे.

नियोजन भवनात ‘वावर’संदर्भात नुकतीच बैठक झाली. या वेळी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अपर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, सहकार उपनिबंधक गोपाळ मावळे आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. ‘शेतकरी ते ग्राहक’ ही ‘वावर’ची टॅगलाइन आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून देऊन आत्महत्यांचे प्रमाण घटविण्याकरिता जिल्हा प्रशासनाने ‘वावर’चा उपक्रम हाती घेतला आहे,  असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकरी ते ग्राहक या तत्त्वानुसार ग्राहकांपर्यंत पोहोचविल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे, यासाठी ‘वावर’ नावाने सहकारी संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने या उपक्रमाची दखल घेऊन २० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निश्चित केले आहे. प्राथमिक स्तरावर ‘वावर’च्या संदर्भातील कामकाज पूर्णत्वास गेले आहे. 

शेतीमालाचे ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग 

वेबसाइट, मोबाईल ॲप, कॉल सेंटर अशा आधुनिक तंत्राची ‘वावर’ला जोड देण्यात आली आहे. याबरोबरीने शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत माल पोहोचविण्यासाठी तरुण होतकरू ५०० शेतकऱ्यांना ई-कार्ट देण्याबरोबरच त्यांना मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ॲग्रो मॉल, कोल्ड स्टोरेज या सुविधादेखील उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे ‘वावर’ या नावाने शेतीमालाचे ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग जिल्हा प्रशासन करणार आहे. ‘वावर’च्या यशस्वितेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.या उपक्रमासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com