महिला बंदीजनांनी कारागृहाची शेती केली हिरवीगार

पीक उत्पादन वाढविण्यावर भर... महिला खुल्या कारागृहाची उपलब्ध जमीन वर्षभर लागवडीखाली आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. वर्षभर या शेतीतून कारागृहाच्या स्वयंपाकगृहात येथील भाजीपाला जातो. जमीन सुपीकता, दर्जेदार पिकासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती व्यवस्थापनावर आम्ही भर दिला आहे. - यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे
येरवडा येथील महिला खुले कारागृहाच्या शेतीमध्ये टोमॅटो रोप तारेला बांधताना महिला बंदी.
येरवडा येथील महिला खुले कारागृहाच्या शेतीमध्ये टोमॅटो रोप तारेला बांधताना महिला बंदी.

शेतीमध्ये हिरवं स्वप्न फुलविण्यात महिलांचे योगदान महत्त्वाचं आहे, याला येरवडा मध्यवर्ती कारागृहातील शेतीदेखील अपवाद नाहीत. येथील महिला खुले कारागृहातील बंद्यांनी कारागृहाची सोळा हेक्टर शेती हिरवीगार केली आहे. वर्षभर अठरा प्रकारच्या भाज्या, आठ प्रकारच्या पालेभाज्या त्याचबरोबरीने भात, हरभरा, चारापिकांची लागवड येथे केली जाते. जमीन मशागत, पीक लागवड ते तोडणीपर्यंतची सर्व कामे महिला बंदीजन करतात. कारागृहाची शेती कसत या महिला बंद्यांनी यंदाच्या वर्षी १९ लाख २८ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवून दिलंय.

ॲग्रोवनच्या साथीने शेतीमध्ये सुधारणा कारागृहाचे कृषी पर्यवेक्षक रवींद्र दाभाडे म्हणाले की, येथील पीक पद्धतीने नियोजन करताना दैनिक ॲग्रोवनमधील पीक लागवड व्यवस्थापन सल्ले, तांत्रिक लेख आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथांचे अनुभव आम्हाला मार्गदर्शक ठरतात. मी पीकनिहाय ॲग्रोवन अंकाची फाइल केली. त्यानुसार आम्ही वेलवर्गीय भाजीपाल्याची ताटी आणि मांडव पद्धतीने लागवड, वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये पालेभाज्यांचे आंतरपीक, बांधावर तसेच स्वतंत्र क्षेत्रात शेवगा लागवड, कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे, कामगंध सापळे आणि मुख्य पिकात मका, मोहरी, चवळीसारख्या सापळा पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. वर्षभर जमीन लागवडीखाली राहील, असा पीक आराखडा तयार केला. कृषी विद्यापीठ, तसेच कंपन्यांनी विकसित केलेल्या भाजीपाल्याच्या नवीन सुधारित, संकरित जातींची लागवड करतो. आम्ही प्रयोगशील शेतकऱ्यांच्याकडून शेवगा, आले, पडवळाचे बियाणे  खरेदी केले. त्याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा झाला. यंदा आम्ही कांदा, लसूण, आले, मोहरीची लागवड केली. शेतीतील उपलब्ध पालापाचोळा  आणि शेणापासून गांडूळ खतनिर्मितीला सुरवात केली आहे.

महिला खुले कारागृहाची शेती

  • लागवडीखाली क्षेत्र ः बागायती १४ हेक्टर, जिरायती २ हेक्टर आणि वनीकरण १० हेक्टर. 
  •  हंगामानुसार वर्षभर विविध पालेभाज्या, फळभाज्या तसेच भात, हरभरा लागवड. 
  •  सुधारित पद्धतीने पीक लागवड. सुधारित, संकरित बियाणांचा वापर, एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड, रोगनियंत्रण. 
  •   बियाणे प्रक्रिया, लागवड तंत्र, अवजारांचा वापर, खतांचा वापर, एकात्मिक कीड, रोगनियंत्रणाबाबत महिला बंद्यांना प्रशिक्षण.
  •   भाताच्या सह्याद्री-२ या जातीची चारसूत्री पद्धतीने लागवड करून उत्पादनात वाढ. पुढील हंगामात एसआरटी पद्धतीने भात लागवडीचे नियोजन. शून्य मशागत तंत्राचा अवलंब.
  •  कारागृह स्वयंपाकघराची मागणी लक्षात घेता हंगामानुसार अर्धा एकर ते एक एकर क्षेत्रावर भेंडी, टोमॅटो, वांगी, मिरची, कांदा, डांगर, प्लॉवर, कोबी, घोसाळे, दोडके, पडवळ, दुधीभोपळा, मुळा, रताळे, मटार, पावटा, मेथी, पालक, शेपू, आंबट चुका लागवड.
  •  मशागतीसाठी पाच बैल. चाऱ्यासाठी मका, लसूण घास लागवड.
  •  महिला बंदी स्वतः बैलचलीत अवजाराने नांगरट, कुळवणी करतात. श्रम कमी करण्यासाठी सुधारित अवजारांच्या वापरावर भर.
  •  सन १५-१६ मध्ये या शेतीतून १२,५८,८६२ रुपये,१६-१७ मध्ये १५,२१,४१४ रुपये आणि यंदाच्या वर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत १९,२८,००० रुपये उत्पन्न. 
  • नवीन तंत्र शिकवतोय... खुल्या कारागृहातील महिला बंद्यांना पीक लागवड, व्यवस्थापनातील नवीन तंत्र, अवजारांची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या कष्टातूनच आम्हाला पीक उत्पादनात वाढ मिळत आहे. या महिलांना आम्ही मजुरीदेखील देतो. येथील शेतीत नवीन तंत्र शिकून या महिला बंदी शिक्षा संपल्यानंतर स्वतःच्या शेतीमध्ये अवलंब करून स्वावलंबी बनतील, अशी खात्री आहे. - स्वाती पवार, तुरुंग अधिकारी, महिला कारागृह

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com