यंदाही डोंगरगणकरांचा वृक्ष लागवडीचा संकल्प

दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारणाच्या कामासोबत वृक्ष लागवडही महत्त्वाची आहे. आम्ही गावकऱ्यांनी दहा वर्षांपूर्वी श्रमदानातून दरवर्षी वृक्ष लागवडीचा संकल्प केला, तो दरवर्षी सुरूच ठेवला आहे. यंदाही आम्ही झाडे लावणार आहोत. अन्य गावांनाही आम्ही झाडे लावण्याबाबत सतत अवाहन करतो. - कैलास पटारे, सरपंच, डोंगरगण (ता. जि. नगर)
डोंगरगण (जि. नगर) ः गावकऱ्यांनी रोपवाटिकेत लागवडीसाठी तयार केलेली रोपे.
डोंगरगण (जि. नगर) ः गावकऱ्यांनी रोपवाटिकेत लागवडीसाठी तयार केलेली रोपे.

श्रीरामेश्‍वर देवस्थान म्हणून राज्यभर ओळख असलेल्या डोंगरगण (ता. नगर) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून यंदा अकरा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी सुरू केलेल्या रोपवाटिकेत सात हजार रोपे तयार केली असून चार हजार रोपे वन विभाग देणार आहे. गावशिवार आणि परिसरात असलेल्या माळरानावर आतापर्यंत तब्बल तीन लाख झाडे लावली आहेत. या कामामध्ये युवकांचा पुढाकार अधिक असतो. डोंगरगण येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून वृक्ष लागवड करण्याला दहा वर्षांपासूनच सुरवात केली आहे. सुरवातीला गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘बीज बॅंक'' उपक्रम राबवला. उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या झांडाच्या सुमारे सहा लाख बिया संकलित केल्या. पावसाळ्यात त्या गावशिवारात लावल्या. त्याचा चांगला फायदा झाला. गावाच्या मालकीचे परिसरात २२७ हेक्‍टर माळरान आहे. तेथे गावकरी श्रमदानातून झाडे लावण्यासाठी खड्डे खोदतात. गेल्या दहा वर्षांपासून गावकऱ्यांचा अविरत उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत ग्रामस्थांनी एकत्र येऊन तीन लाख वृक्षांची लागवड केली आहे. त्यातील १ लाख ५३ हजार झाडे जगली आहेत. त्यात पाचशे वडाची झाडे असून लिंब, चिंच, जांभूळ, आवळा, रिठा, करंजी यासह औषधी वनस्पतीचा समावेश आहे. दरवर्षी वृक्ष लागवडीचे काम सुरूच असून यंदा करा हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. यंदा गावाने पाणी फाउंडेशनच्या उपक्रमातही सहभाग घेत गावशिवारात तब्बल दीड महिना दिवस-रात्र श्रमदान केले आहे.    गावात पडणारा पाऊस, त्याचे होणारे व्यवस्थापन, पर्जन्यमापक बसविण्यासह सात हजार वृक्ष लागवड, त्यावर होणारा खर्च, तसेच पाणीवापराबाबत ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय ग्रामसभेमध्ये घेण्यात आला आहे. श्रमदानातून लाखो लिटर पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय झाला. यामध्ये पाणीवापराबाबतची माहिती, गावात पडणारा पाऊस, जनावरांच्या वर्गवारीनुसार त्यांना पिण्यासाठी लागणारे पाणी, गावातील प्रत्येक कुटुंबाला रोज लागणारे पाणी व पाणीबचतीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. गावात होणाऱ्या पावसाची नोंद ठेवणे, श्रमदानातून झालेल्या कामाची नोंद ठेवणे, तसेच गावाच्या पूर्वेकडील डोंगरापासून पश्‍चिमेपर्यंत श्रमदानातून झालेल्या कामाचे मूल्यमापन करणे, यासाठी ग्रामस्थ संघटित होऊन प्रयत्न करणार आहेत. वृक्ष लागवडीसाठी सात हजार रोपे तयार असून, गावठाण हद्दीत त्यांचे रोपण होणार आहे. गावातील पाचशे शेतकऱ्यांचे मातीपरीक्षण झाले आहे. सामूहिक शेतीसाठी प्रयत्न करण्याचे ग्रामसभेत ठरले आहे.

हजारे, पवारांनी केले कौतुक डोंगरगण गावकऱ्यांनी श्रमदानातून विकासाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श योजना संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावाला भेट देऊन श्रमदानातून केल्या जात असलेल्या कामाचे कौतुक केले आहे. येथील रामेश्‍वर देवस्थान सर्वदूर परिचित असल्याने येथे भाविकांची सतत वर्दळ असते. भाविकही श्रमदानातून झालेल्या कामाचे कौतुक करतात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com