वडाळा गावाने तयार केली तब्बल २८ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता

कामाचा कालावधी अवघा ४५ दिवस होता, हे काम अवघड होते, पण आमच्या ग्रामस्थांच्या सहभागामुळे हे शक्‍य झाले. एरव्ही या पद्धतीने आम्ही काम करू शकलो नसतो, पण या स्पर्धेच्या निमित्ताने हे घडले. आता पुढच्या वर्षी तालुक्‍यातील अन्य गावांसाठी आम्ही मदत करू. - बळिराम साठे, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद, सोलापूर
वडाळा (जि.सोलापूर) ग्रामस्थांनी ओढ्यानजीक गावच्या शिवारातील एकत्रित केलेले पाणी साठवण्यासाठी केलेला छोटा तलाव.
वडाळा (जि.सोलापूर) ग्रामस्थांनी ओढ्यानजीक गावच्या शिवारातील एकत्रित केलेले पाणी साठवण्यासाठी केलेला छोटा तलाव.

पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेमध्ये उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वडाळा गावाने सहभाग घेत यंदाच्या उन्हाळ्यात श्रमदान आणि मशिनद्वारे केलेल्या पाणी साठवण्याच्या कामात मोठी कामगिरी केली आहे. ओढा, नाला खोलीकरण, सरळीकरणासह सीसीटी, एलबीएस, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती आदीसह विविध कामातून सुमारे २८ कोटी लिटर इतकी पाणी साठवण क्षमता तयार केली आहे. ग्रामस्थांच्या श्रमाला जिद्दीचे बळ मिळाल्यानंतर काय होऊ शकते, याची प्रचिती या गावाने अनुभवली आहे. सोलापूरपासून २५ किलोमीटरवर वडाळा हे गाव आहे. पाण्याचा कायमचा कोणताच स्रोत नाही. नदी, तलाव असा कोणतीही शाश्‍वत सोय नसल्याने शिवाय पठारी भाग, माथा ते पायथा अशीही परिस्थिती नाही. त्यामुळे पाणी अडवायचं कसं ? हा मोठा प्रश्‍न होता. पण जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळिराम साठे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सौ. रूपाली गाडे, उपसरपंच जितेंद्र साठे, ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे, प्रभाकर गायकवाड, संपत गाडे, ज्ञानदेव साठे, बापू साठे, पांडुरंग नागणे, नागेश साठे आदींसह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या हिरिरीने पाणी फाउंडेशनच्या वॉटरकपस्पर्धेत सहभाग घेऊन जे काम उभं केलं, ते कौतुकस्पद आहे.  दीड ते दोन हजार हेक्‍टर भौगोलिक क्षेत्र असलेल्या या गावात गावच्या कडेचे माळरान, माथा क्षेत्र शोधून सीसीटी खोदले, तर सुमारे २८५ हेक्‍टर परिसरात कंपार्टमेंट बंडिंगची कामे केली आहेत. गावच्या कडेवरून वाहणाऱ्या सुमारे साडेसात किलोमीटर ओढ्याचे खोलीकरण, सरळीकरण केले. तसेच गावच्या जवळ असलेल्या जुन्या ओढ्यानजीक तीन मोठे शेततळे वजा तलाव तयार केले. त्यांची साठवण क्षमता तब्बल १४ कोटी लिटर इतकी आहे. यंत्राद्वारे हे काम केलेच, पण त्याला गावकाऱ्यांच्या श्रमदानाची जोड दिली. गावकऱ्यांनीही मोठ्या जिद्दीनं तब्बल ३० हजार घनफूट इतक्‍या क्षेत्रावर श्रमदान करून सीसीटी, दगडी बांध आदी कामे केली. अवघ्या ४५ दिवसांत ही कामे गावकऱ्यांनी श्रमदानातून पूर्ण केले. श्रमदानाशिवाय गावात ४३५ शोषखड्डे, पावणेचारशे शेतकऱ्यांच्या शेतीचे माती-पाणी परीक्षण आणि १० हजार २८८ रोपांचे वृक्षारोपण आदी नावीण्यपूर्ण कामेही केली आहेत.  

गावकऱ्यांनी केलेली कामे 

  •  गावकऱ्यांनी केलेले श्रमदान  ः ४६०० सीसीटी
  •  शेततळे ः ५१
  •  दगडी बांध ः  ३६
  •  वॅट ः ३७
  •  नाल्याचे काम ः  साडेसात किलोमीटर
  •  जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती ः ३
  •  रोपांची निर्मिती आणि लागवड ः  १०,२८८
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com