अळिंबी उत्पादनातून शोधला रोजगार

अळिंबी उत्पादनासाठी बेड भरताना अर्चना भोगे.
अळिंबी उत्पादनासाठी बेड भरताना अर्चना भोगे.

जामखेड (जि. नगर) येथील सौ. अर्चना सुनील भोगे यांनी परिसरातील बाजारपेठेचा अभ्यास करीत घरगुती स्वरूपात धिंगरी अळिंबी (आॅयस्टर मशरूम) उत्पादनास सुरवात केली. टप्प्याटप्प्याने ग्राहकांकडून मागणी वाढत असल्याने त्यांनी अळिंबी उत्पादनात वाढ केली. ताज्या अळिंबीसोबत त्यांनी विविध खाद्य पदार्थांची निर्मिती करून बाजारपेठेत वेगळी ओळख तयार केली आहे. गेल्या काही वर्षांत प्रक्रिया उद्योग, लघुउद्योगातून ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. या महिलांपैकीच एक आहेत जामखेड (जि. नगर) येथील अर्चना सुनील भोगे. ग्रामीण भागातील पारंपरिक प्रक्रिया उद्योगापेक्षा त्यांनी धिंगरी अळिंबी (आॅयस्टर मशरूम) उत्पादनाला एक वर्षापासून सुरवात केली. अळिंबी उत्पादन सुरू करण्यापूर्वी अर्चना भोगे यांनी सहा महिने परिसरातील बाजारपेठेचा अभ्यास केला. ग्राहकांची मागणी लक्षात घेतली. उत्पादनाबाबत तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केले. त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी त्यांना फायदा झाला.  

अळिंबी उत्पादनाला सुरवात 

अळिंबी उत्पादनाबाबत अर्चना भोगे म्हणाल्या, की २६ फूट लांब, १५ फूट रुंद आणि बारा फूट उंचीची शेड बांधली. हवा खेळती राहण्यासाठी शेडला खिडक्या ठेवल्या. अाळिंबीच्या वाढीसाठी  २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ६५ ते ९० टक्के आर्द्रता असावी लागते. तापमान व आर्द्रतेच्या नियंत्रणासाठी शेडच्या आतील बाजूने गोणपाट लावले जाते. उन्हाळ्यात तापमान थंड राहण्यासाठी गोणपाटावर पाण्याची फवारणी केली जाते.  

  • अळिंबी बेड तयार करण्यासाठी गव्हाच्या काडाचा वापर. गव्हाचे काड चालू हंगामातील आणि न भिजलेले घेतले जाते. काड जर एक ते दोन वर्षांपूर्वीचे तसेच भिजलेले असल्यास आळिंबी उत्पादनावर परिणाम होतो. 
  • गव्हाच्या काडाचे दोन ते तीन सें.मी. लांबीचे तुकडे सच्छिद्र पोत्यामध्ये भरले जातात. तज्ज्ञांच्या सल्यानुसार निर्जंतुकीकरणासाठी शंभर लिटर पाण्यात ७.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि ५० मि.लि. फाॅर्मेलीन मिसळले जाते. या द्रावणात काड भरलेले पोते सोळा तास भिजत ठेवले जाते. त्यानंतर पोते बाहेर काढून पाण्याचा निचरा केला जातो. 
  • काड भरण्यासाठी शंभर गेज जाडीच्या ३५ बाय ५५ सें.मी.आकाराच्या पिशव्यांचा वापर. पाच टक्के फाॅर्मेलीन द्रावणात निर्जंतूक केलेल्या प्लॅिस्टक पिशवीत निर्जंतूक केलेले काड भरले जाते. पिशवीत सर्वप्रथम पाच ते सहा सें.मी. जाडीचा काडाचा थर दिला जातो. त्यावर अळिंबीचे स्पाॅन पसरले जातात. स्पाॅनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या दोन टक्के ठेवले जाते. काड व स्पाॅन यांचे सरासरी चार ते पाच थर भरले जातात. थर भरताना काड दाबले जाते. पिशव्या भरल्यानंतर दोऱ्याने  तोंड घट्ट बांधले जाते. पिशवीच्या सर्व बाजूने सुई किंवा टाचणीने ५० छिद्रे पाडली जातात.
  • शेडच्या छताला ॲंगल. त्यास दोऱ्या बांधून  बेडच्या पिशव्या लटकवल्या जातात.
  • अळिंबीची चांगली वाढ होण्यासाठी २५ ते  २८ अंश सेल्सिअस तापमान ठेवले जाते. बेडच्या सर्व बाजूने स्पॉनची पांढरट वाढ दिसून आल्यावर प्लॅिस्टकची पिशवी एकविसाव्या दिवशी काढून टाकली जाते. 
  • प्लॅिस्टक पिशवी काढलेले बेड मांडणीवर किंवा दोरीला टांगलेल्या स्थितीत ठेवले जातात. या बेडवर तापमानानुसार दिवसातून दोन ते तीन वेळेस पाण्याची हलकी फवारणी केली जाते. याच बरोबरीने जमीन आणि शेडमध्ये लावलेल्या गोणपाटावर पाणी फवारून तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस व हवेतील आर्द्रता ६५ व ९० टक्के नियंत्रित केली जाते. 
  • साधारणपणे अळिंबीची पहिली तोडणी पिशवी भरल्यानंतर २६ दिवसांनी होते.
  • अळिंबी काढणीपूर्वी एक दिवस अगोदर अळिंबीवर पाणी फवारले जात नाही. यामुळे अळिंबी तजेलदार व कोरडी राहते. अळिंबीच्या कडा आत वळण्यापूर्वी काढणी. लहानमोठी सर्वच अळिंबी एकाच वेळी काढली जाते. 
  • अळिंबीचे दुसरे पीक घेण्यापूर्वी त्याच बेडवर हलका हात फिरवून कुजलेल्या व मोकळ्या झालेल्या काडाचा पातळ थर काढून टाकला जातो. नियमितपणे दोन तीन वेळा पाणी फवारले जाते. त्यानंतर दहा दिवसांनी दुसरे उत्पादन मिळते. त्यानंतर पुन्हा आठ ते दहा दिवसांनी तिसरे उत्पादन मिळते. 
  • साधारणपणे चार किलो वाळवलेल्या काडाच्या एका बेडपासून आठशे ग्रॅम ताज्या अळिंबीचे उत्पादन.
  • छिद्रे पाडलेल्या प्लॅिस्टक पिशवीत ताजी अळिंबी एक दिवस, तर फ्रीजमध्ये तीन दिवस टिकते. ताज्या अळिंबीस बाजारपेठ नसल्यास ती उन्हामध्ये किंवा ड्रायरने वाळवली जाते. उन्हात दोन ते तीन दिवसांत पूर्णपणे वाळते. वाळलेली अळिंबी प्लॅिस्टक पिशवीत सीलबंद करून हवाबंद केल्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ चांगल्या स्थितीत राहते. 
  • तयार केली बाजारपेठ अळिंबी उत्पादनाबाबत अर्चना भोगे म्हणाल्या, की पहिल्या वेळी ५६ बेडपासून अळिंबी उत्पादन घेतले. एक किलो स्पाॅनपासून सहा बेड होतात. एक किलो स्पाॅनचा खर्च ८० ते शंभर रुपये आहे. सहा बेडसाठी स्पॉनसहित सरासरी २०० रूपये खर्च येतो.एका बेडपासून आठशे ग्रॅम ताजी अळिंबी मिळते.        माझे पती सुनील भोगे, मुलगी सायली आणि मुलगा साहिल यांची अळिंबी उत्पादनासाठी मदत होते. जामखेडसारख्या ठिकाणी अळिंबी विक्रीसाठी बाजारपेठ नव्हती. परंतु गावातील नागरिकांमध्ये अळिंबीच्या आहारातील महत्त्व सांगण्यासाठी विशेष मोहीम राबविली. परिसरातील हॉटेलमध्ये मी स्वतः मशरूम मसाला, मशरूम लॉलीपॉप, मशरूम भजी हे खाद्यपदार्थ तयार करून दिले. त्यांच्याकडून खाद्य पदार्थाच्या चवीबाबत मते घेतली, त्यानुसार बदल केले. त्यामुळे हॉटेल, तसेच ग्राहकांकडून अळिंबी आणि खाद्य पदार्थांची मागणी वाढत आहे. सध्या मी ताजी अळिंबी पाचशे रुपये प्रतिकिलो दराने विकते.  दररोज सरासरी एक किलो अळिंबीची विक्री परिसरातील हॉटेल, दुकानदार आणि थेट ग्राहकांना केली जाते. दरमहा सरासरी उत्पादन खर्च वजा जाता सात हजाराचे उत्पन्न मिळते. अळिंबी विक्रीसाठी मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलशी मी संपर्क साधला आहे. 

    खाद्यपदार्थ निर्मितीला संधी

  •  धिंगरी अळिंबीमध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, खनिजे, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, लोह, सोडियम,  तसेच जीवनसत्व ब-१, ब-२ आणि क यांचे चांगले प्रमाण.
  •  भजी, सामोसे, सलॅड, सुकी किंवा रस्सा भाजी, अळिंबी टोमॅटो, अळिंबी भेंडी, भरलेली मिरची, आॅम्लेट, पुलाव, पिझा, सूप, लोणचे, लाॅलीपाॅप या सारख्या पदार्थांच्या निर्मितीमध्ये वापर.
  • -  सौ. अर्चना भोगे, ९७६७६४९८६२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com