झाडू व्यवसायातून आशाताईंच्या हाती आली ‘लक्ष्मी`

तांबेवाडी (जि.सोलापूर) ः आशाताई देवकर महिला सहकाऱ्यांसमवेत झाडू तयार करताना.
तांबेवाडी (जि.सोलापूर) ः आशाताई देवकर महिला सहकाऱ्यांसमवेत झाडू तयार करताना.

कोणतीही व्यवसायिक पार्श्‍वभूमी नसताना केवळ जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर तांबेवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील सौ. आशा हणमंत देवकर यांनी झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या आठ महिन्यांतच गटातील महिलांच्या साथीने झाडू निर्मिती व्यवसायाने चांगली गती घेतली. आज त्यांच्या झाडूने स्थानिक भागासह मुंबई, पुण्याचेही मार्केट मिळवले आहे.

नातेपुते-बारामती महामार्गावर माळशिरस तालुक्‍यातील तांबेवाडी हे छोटंसं गाव. या गावामध्ये सौ. आशा हणमंत देवकर राहतात. आशाताईंचे पती पूर्वी गवंडी व्यवसायात होते. पण, आता ठेकेदारीपद्धतीने छोट्या-मोठ्या बांधकामाची कामे घेतात. पण, त्याहीपेक्षा झाडू बनवण्याच्या व्यवसायात त्यांना चांगलीच रुची लागल्याने तेही आशाताईंना झाडू निर्मिती आणि विक्रीमध्ये मदत करतात. याशिवाय आशाताईंच्या सासू, नणंद आणि मुलेही जमेल तशी मदत करतात.  आशाताईंचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. २०१४ मध्ये पहिल्यांदा अनन्या स्वयंसाह्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी लघुउद्योग करण्याचे ठरवले. पण मार्ग मिळत नव्हता. दोन वर्षे अशीच गेली. पण गेल्यावर्षी २०१७ मध्ये एका खासगी कंपनीने झाडू बनवणे आणि त्याच्या मार्केटिंगच्या तंत्राबाबत त्यांना दिलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले. किंबहुना त्यांच्या आयुष्याला त्यामुळेच कलाटणी मिळाली. त्यांनी या व्यवसायातील बारकावे समजून घेतले. तेव्हा या व्यवसायात धोका कमी आणि किफायतशीर नफा त्यांना दिसत होता, त्यामुळे हा व्यवसाय करण्याचे ठरवले आणि सुरवातही झाली. घरच्यांनीही पाठिंबा दिला. याचबरोबरीने महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक रणजित शेंडे, निशिगंधा नामदास, दीपक मदने आणि नितीन साठे यांनी मार्गदर्शन केले आणि या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

पन्नास हजारांची गुंतवणूक 

झाडू निर्मिती व्यवसायासाठी भांडवलाचा प्रश्‍न होता. घरची आर्थिक परिस्थिती गुंतवणूक करण्यासारखी नव्हती. परंतु, अनन्या स्वयंसाह्यता महिला बचत गटासाठी एका बॅंकेने पूर्वी कर्ज दिले होते. ते आशाताईंनी वेळेत फेडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्या बॅंकेकडे गेल्या. तेव्हा पत पाहून बॅंकेने त्यांना पुन्हा पन्नास हजारांचे कर्ज मंजूर केले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नाला फळ मिळाले.

झाडू निर्मिती उद्योगाला सुरवात  

झाडू तयार करण्यासाठी विशिष्ठ प्रकारच्या काड्यावजा गवत आवश्‍यक आहे. तसेच प्लॅस्टिक पाइप आणि तार हे यासाठी लागणारे कच्चे साहित्य मुंबई आणि कोल्हापूरहून आणले जाते. झाडूच्या काड्या प्रतिकिलो ४० रुपये इतक्‍या दराने मिळतात. त्या माध्यमातून एका किलोमध्ये किमान चार झाडू तयार होतात. आशाताईंना सुरवातीला थोड्याशा अडचणी आल्या, पण आज मार्केटिंगचेही तंत्र चांगले अवगत झाल्याने, त्यांच्याकडे तयार झाडूंची संख्या आणि विक्रीही वाढली आहे. आशाताईंनी अनन्या स्वयंसाह्यता महिला बचत गटातील दहा महिलांनाही यामध्ये रोजगार दिला आहे. प्रतिझाडू दोन रुपयेप्रमाणे महिलांना मजुरी दिली जाते. एक महिला दिवसातून ५० ते १०० झाडू सहजपणे तयार करते. या महिलांच्या मदतीने दिवसाकाठी ५०० ते ७०० झाडू तयार होतात.  

उद्योगवाढीचे नियोजन   आशाताईंचा हा व्यवसाय आज चांगलाच स्थिरावला आहे. स्वतःच्या कामाबरोबर अन्य महिलांनाही रोजगार देण्याचे समाधान वेगळं असतं, असं त्या म्हणतात. आज एक झाडू किरकोळ विक्रीत ७० ते ८० रुपये आणि घाऊक विक्रीत ५० ते ५५ रुपयाला विकला जातो. साधारणपणे महिन्यातील एकूण झाडूची विक्री आणि सगळा खर्च वजा जाता गटातील प्रत्येक महिलेला सरासरी तीन हजार रुपये नफा मिळतो. झाडूने खऱ्या अर्थाने माझ्या हातात लक्ष्मी आली, यापुढेही हा उद्योग वाढवण्यासाठी माझा प्रयत्न आहे. माझ्या या कामात पती, सासू आणि घरातील सर्वांची साथ मिळते आहे, त्यामुळेच हे शक्‍य झाल्याचे आशाताई आवर्जून सांगतात.

मुंबई, पुणे शहरात मिळवले मार्केट माळशिरस, बारामती, फलटण, अकलूज, दहिवडी या स्थानिक भागांतील मोठी किराणा दुकाने, किरकोळ विक्रेते यांच्याकडे आशाताई झाडू विक्री करतात. झाडूचा दर्जा, गुणवत्ता, त्याचे पॅकिंग हे पाहून ग्राहक आता आगाऊ नोंदणीही करत आहेत. त्यानुसार हे झाडू तयार केले जातात. आज मुंबई आणि पुण्यालाही चांगले मार्केट मिळाले आहे.

गटातील महिलांची पूरक उद्योगाला सुरवात   पूरक व्यवसायाबाबत आशाताई म्हणाल्या, की गटातील महिलांनी पूरक उद्योगाच्यादृष्टीने शेळीपालन, गाय-म्हैसपालन, कोंबडीपालनास सुरवात केली. हे पूरक उद्योग सुरू करण्यापूर्वी महिलांनी शास्त्रीय प्रशिक्षणही घेतले. माझ्याकडे तीन शेळ्या आहेत. येत्या काळात शेळ्यांची संख्या वाढवणार आहे. गरजेनुसार करडे आणि बोकडांची विक्री केली जाते. येत्या काळात झाडूच्या बरोबरीने खराटा निर्मितीवरही आम्ही भर देणार आहोत.  

- सौ. आशा देवकर,९६३७५४४८६४  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com