अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडे

अन्नपूर्णा केंद्रातून महिलांना रोजगार
अन्नपूर्णा केंद्रातून महिलांना रोजगार

आवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते, तेव्हा त्यासाठी करावे लागणारे काम हे ओझं न वाटता केवळ आनंददायी साधन बनते. अशाच पैकी एक आहेत गायत्री योगेश्‍वर कोष्टी. मुळातच त्यांना सुरवातीपासून स्वयंपाकाची आवड. त्यामुळे आवडीला व्यावसायिक शिस्तीची जोड मिळाली आणि गायत्रीताईंचा ‘अन्नपूर्णा महिला गृह उद्योग' प्रत्यक्षात साकारला. या उद्योगात सध्या सोळा महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला. येत्या काळात महिलांचीच प्रक्रिया कंपनी स्थापन करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. 

फारसे खेळते भांडवल आणि कुठलाही व्यावसायिक अनुभव नसताना गायत्री योगेश्‍वर कोष्टी यांनी चार वर्षांपूर्वी मार्च महिन्यात स्वत: खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करायचं ठरवलं. पुढे त्यात सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिकपणा ठेवून अन्नपूर्णा भाजीपोळी केंद्राचं ठळक स्वरूप दिलं. या प्रवासाविषयी सांगताना त्या म्हणाल्या, की शिक्षण पूर्ण झाल्यावर एका खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र त्यात मन रमत नव्हतं. स्वत:चा प्रक्रिया उद्योग असावा आणि यातून परिसरातील निराधार महिलांना आधार द्यावा असं सारखं वाटत होतं. सुरवातीला अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांतील कामगारांना नाष्टा पुरवण्याचं काम सुरू केलं. उपमा, पोहे, थालिपीठ, इडली हे पदार्थ घरी तयार करून ते डब्यामधून कंपन्यांमध्ये नेले जात होते. ओव्हरटाइम करणाऱ्या कामगारांना काही कंपन्या नाष्टा देत असत तर काही देत नसत. ही गॅप भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या खाद्यपदार्थांच्या मागणीमध्ये सातत्य नव्हते. त्यामुळे नियमित उत्पन्न मिळण्यास अडचणी येत होत्या. कंपन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान जेवण पुरवण्याचं कामही केलं.

खाद्यपदार्थांची चांगली गुणवत्ता असल्याने कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत होता. मात्र हे काम नंतर जास्त धावपळीचं होऊ लागलं. त्यामुळे स्वतःचं स्थायी स्वरूपाचं एक केंद्र असावं असं वाटत होतं. २०१५ मध्ये उपेंद्रनगर येथे गाळा घेऊन भाजी पोळी केंद्र सुरू केले. तीन महिलांच्या सोबत हा व्यवसाय नव्याने सुरू केला. केंद्र सुरू करायचं तर नवी जागा, नवी गाळा हवा. मात्र त्यासाठी लागणारं भांडवल नव्हतं. राहत्या घरापासून एक जुनी जागा त्यांनी निवडली. बंद अवस्थेत असलेला गाळा परवडेल अशा दरात मिळाला. त्याची स्वच्छता केली. तिथे रात्री विजेची व्यवस्था नव्हती. बॅटरीच्या उजेडावर काम सुरू झाले. भांडवलासाठी पती योगेश्‍वर यांनी त्यांच्या मित्रांकडून उसनवार मदत मागितली. मित्रांनी कुणी पाच हजार, कुणी दहा हजार अशी मदत केली. एकूण ५० हजारांच्या आसपास भांडवल जमवले. त्यातून भाजीपाला खरेदी करणे, महिलांना रोज वेतन देणे हा खर्च भागवला जाऊ लागला.

गृह उद्योगाकडे वाटचाल   मागील चार वर्षांच्या प्रवासात गायत्रीताईंच्या अन्नपूर्णा पोळीभाजी केंद्राचे स्वरूप अन्नपूर्णा महिला गृह उद्योगात परावर्तीत झाले. २०१५ ला अन्नपदार्थ विक्री व्यवसायाची सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी गृह उद्योगाची दुसरी शाखा नाशिकमधील गजबजलेल्या त्रिमूर्ती चौक आणि तिसरी शाखा रविवार कारंजा या भागात सुरू केली. या ठिकाणी ग्राहकांचा कल आणि गरज ओळखून अनेक नवीन पदार्थांत वाढ केली. शाकाहाराबरोबरच मांसाहारी पदार्थ बनविण्यास सुरवात केली. काही दिवसांतच गुलाबजाम, दालबट्टी, पुरणपोळी, खापराचे मांडे, आमरस हे पदार्थ वर्षभर मिळण्याचं एकमेव ठिकाण अशी ओळख बनली. व्यवसायात सुरवातीला तीन महिलांना रोजगार मिळत होता. आता त्यांच्या मदतीला सोळा  महिला आहेत. येत्या काळात अजून जास्तीत जास्त महिलांना रोजगार देण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. पुढील टप्प्यात त्यांच्याकडील उत्तम पदार्थांचे वैशिष्ट्यपूर्ण पॅकिंग करून ते `रेडी टू इट' स्वरूपात द्यावयाचे आहे. या वर्षभरात ते काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. सकाळी सात ते रात्री दहा असा गायत्रीताईंचा दिनक्रम असतो.   

खाद्यपदार्थ विक्री केंद्राची सुरवात  नाशिकच्या सिडको भागातील उपेंद्रनगरमध्ये ‘अन्नपूर्णा पोळी भाजी केंद्र' सुरू झाले. पाच रुपयांत पोळी, १५ रुपयांत ठेचा भाकरी आणि ३५ रुपयांत संपूर्ण जेवण असा मेन्यू गायत्रीताईंनी ठरवला. हॉटेलांतील खाद्यपदार्थांपेक्षा कमी दर आणि चांगली गुणवत्ता यामुळे अन्नपूर्णा पोळीभाजी केंद्राला प्रतिसाद वाढत गेला. गायत्रीताईंनी २०१५ मध्ये ठरविलेल्या दरात आतापर्यंत फारसा मोठा बदल केलेला नाही. यावर त्या म्हणाल्या, की ‘कमी कालावधीत पैसा कमावणे हाच मुख्य उद्देश आम्ही ठेवलेला नाही. कमी दरामुळे आणि चांगल्या दर्जामुळे आम्ही जास्तीत जास्त ग्राहक जोडले. विश्‍वासार्हतेमुळे ग्राहक टिकून राहिले. कमी दरातही खर्च निघून आम्हाला चांगला नफा मिळत असेल, तर जास्तीच्या मागे का लागावे? यातून सातत्याने जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळत आहे, हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.'

घरातील लक्ष्मीला एक दिवस सुटी द्या!

पोळीभाजी व्यवसायाबद्दल लोकांमध्ये जाहिरात करताना गायत्रीताईंनी वेगळे तंत्र वापरले. प्रत्येक घरात स्वयंपाक तर बनतोच, मग लोकांनी ‘अन्नपूर्णा'चीच पोळीभाजी का घ्यावी? याबद्दल लोकांशी बोलताना त्यांनी अहोरात्र काम करणाऱ्या तुमच्या घरातील लक्ष्मीला आठवड्यातील एक दिवस स्वयंपाकापासून सुटी द्या. एकच दिवस कुटुंबासाठी आमची पोळी भाजी घेऊन पाहा.अशा पद्धतीने आवाहन केले. योग्य दर असल्याने अनेकांनी या पद्धतीने पोळी भाजी खरेदी करण्यास सुरवात केली. पोळी भाजीला चव असल्याने परिसरातील ग्राहकांकडून मागणी वाढू लागली. अशा पद्धतीने आम्हाला नियमित ग्राहक मिळाला, असे गायत्रीताई म्हणाल्या.

अन्नपूर्णा गृह उद्योगाचे वेगळेपण

  • ग्राहकाला सर, मॅडमऐवजी ताई, भाऊ, दादा असे मराठी भाषेत संबोधले जाते.
  • खाद्यपदार्थ निर्मितीत १०० टक्के स्वच्छता.
  • प्लॅस्टिकचा वापरावर बंदी, फूड ग्रेड पाऊचमध्ये पॅकिंग.
  •  प्रत्येक सहकाऱ्याला गणवेश.
  •  रास्त दर, उच्च गुणवत्ता, जास्त ग्राहक हे सूत्र.
  •  वितरण केंद्रावर ताज्या पोळ्या व भाजीची निर्मिती. 
  •  स्वयंपाकासाठी सर्व मसाल्यांची घरीच निर्मिती.
  • - गायत्री कोष्टी : ९९२३०३५३०६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com