सालगडी ते बागायतदार मरकुंदे कुटुंबीयांचा प्रवास

सालगडी ते बागायतदार मरकुंदे कुटुंबीयांचा प्रवास

पार्डी मक्ता (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथील मरकुंदे कुटुंबीयांनी शेतीमध्ये चांगली प्रगती केली आहे. सुरवातीच्या काळात सालगडी, जनावरे राखणे यांसारखी कामे मरकुंदे कुटुंबीयांनी केली. अविरत कष्ट करत टप्याटप्याने मरकुंदे कुटुंबीयांनी दहा एकर जिरायती शेती बागायती केली आहे. 

गावातील शेतकऱ्यांकडे सालगडी, जनावरांची राखणी आणि त्यानंतर टप्याटप्याने जिरायती शेती विकसित करत मरकुंदे कुटुंब आज बागायतदार झाले आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मरकुंदे कुटुंबीय गेल्या सहा वर्षांपासून सुधारित पद्धतीने केळी, हळद आणि कलिंगडाची लागवड करतात. या तीनही पिकांचे दर्जेदार उत्पादन घेण्यावर मरकुंदे कुटुंबीयांचा भर आहे. पार्डी मक्ता (ता. अर्धापूर, जि. नांदेड) या गावांतील रामजी मरकुंदे कष्टाळू शेतकरी. त्यांना गोविंद, भगवान आणि विश्वनाथ ही तीन मुले. रामजी मरकुंदे यांचे १९९२ मध्ये निधन झाले. त्यांचा मुलगा गोविंद यांच्याकडे शेतीची जबाबदारी आली. आज गोविंद हे  ६० वर्षांचे आहेत. तेच या कुटुंबाचे कारभारी. आजच्या काळात एकत्रित कुटुंब अभावानेच दिसून येते, मात्र मुरकुंदे कुटुंब मात्र गुण्यागोविंदाने एकत्र नांदत शेती नियोजनात रमले आहे. 

कष्टातून फुलविली शेती 

 मरकुंदे कुटुंबीयांची दहा एकर जिरायती शेती. देशी कापूस, ज्वारी, हरभरा या पिकांतून फारसे उत्पादन मिळायचे नाही. घरी कमालीचे दारिद्र. त्यामुळे गोविंदरावांनी चौथीला असताना शाळा सोडून गावातील लोकांची जनावरे राखण्यास सुरवात केली. त्यांतर काही वर्षांनी १९८० पर्यंत सालगडी म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांचे बंधू भगवान यांनी देखील सालगडी म्हणून १९८० पर्यंत काम केले. परंतु स्वतःची दहा एकर शेती बागायती करायचे स्वप्न असल्याने दोघा भावांनी १९८० मध्ये सालगड्याची नोकरी सोडली.  १९८१ आणि १९८५ मध्ये घरच्या लोकांच्या सहकार्याने विहीर खोदली. विहिरींना चांगले पाणी लागले आणि जिरायती शेती टप्याटप्याने बागायती होऊ लागली. जिरायती पिकांच्या जागी  केळी, हळद, गहू या पिकांची लागवड सुरू झाली. गेल्या सहा वर्षांपासून मरकुंदे कुटुंबीयांनी बाजारपेठेचा अभ्यास करत केळी, हळद, कलिंगड लागवडीचे नियोजन ठेवले आहे. 

शेणखताचा जास्तीत जास्त वापर   जमिनीची सुपिकता टिकवून ठेवणासाठी मरकुंदे बंधू जास्तीत जास्त शेणखताचा वापर करतात.  दरवर्षी  दहा एकर शेतीमध्ये २५ ट्रॉली शेणखत मिसळले जाते. मरकुंदे बंधुंकडे दहा जनावरे आहेत. त्यामुळे दरवर्षी घरचे ८ ते १० ट्रॉली शेणखत तयार होते.  उर्वरित शेणखत परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून खरेदी केले जाते.  

दर्जेदार केळी उत्पादनावर भर  केळी लागवडीबाबत शिवानंद मरकुंदे म्हणाले की, आम्ही १९८५ पासून अर्धापुरी केळी लागवड करत आहोत. आम्हाला १० ते ११ किलोचा घड मिळायचा. याचबरोबर सर्वच केळी निसवायची देखील नाही. त्यामुळे पीक परवडायचे नाही. दरम्यानच्या काळात परिसरातील केळी उत्पादकांचा अभ्यास करत आम्ही २०११ पासून ऊती संवर्धित केळी लागवड सुरू केली. सुधारित लागवडी तंत्र आणि ठिबक सिंचनाचा वापर करण्यास सुरवात केली. शेणखताचा जास्तीत जास्त वापर आणि रासायनिक खतांचा शिफारशीनुसार वापर करत आम्ही केळी उत्पादन वाढविले. 

    आम्ही दरवर्षी साडेतीन एकर क्षेत्रावर १५ जुलैनंतर ऊती संवर्धित केळी रोपांची लागवड करतो. जमिनीची योग्य मशागत केल्यानंतर शेणखत आणि शिफारशीनुसार बेसल डोस जमिनीत मिसळला जातो. केळी लागवडीसाठी दर साडे पाच फुटावर गादीवाफा केला जातो. गादीवाफ्याची रूंदी दीड फूट ठेवली जाते. गादीवाफ्यावर ठिबकची नळी अंथरून दर सहा फुटावर केळी रोपाची लागवड केली जाते. माती परिक्षणानुसार पहिल्यांदा एक हजार रोपांसाठी ७५ किलो डीएपी, ५० किलो पोटॅश, ५० किलो युरिया, ५० किलो दुय्यम अन्नद्रव्ये व १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये असा बेसल डोस दिला जातो. त्यानंतर लागवडीनंतर साठ दिवस, शंभर दिवसांनी शिफारशीत खत मात्रा दिली जाते. वाढीच्या टप्‍प्यात तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार विद्राव्य खत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतो. योग्य व्यवस्थापनामुळे झाडांची चांगली वाढ होते. प्रति झाड आम्हाला ३३ ते ३५ किलोची रास मिळते. एकरी सरासरी ३५ टन उत्पादन मिळते. बागेमध्येच व्यापारी केळी खरेदीला येतात. ही केळी चंदीगड,पंजाब बाजारपेठेत जातात. खर्च वजा जाता आम्हाला एकरी सव्वा लाखांचे उत्पन्न मिळते. 

   कलिंगड ठरते फायदेशीर  गेल्या चार वर्षांपासून मरकुंदे बंधू केळी निघाल्यानंतर कलिंगडाची लागवड करतात. दरवर्षी तीन क्षेत्रावर कलिंगड लागवड असते. कलिंगड लागवडीबाबत शिवानंद मरकुंदे म्हणाले की, केळीचे घड उतरले, की सप्टेंबर महिन्यात केळी खोडाचे कोयत्याने बारीक तुकडे करून रोटाव्हेटरच्या साह्याने शेतात मिसळून देतो. त्यामुळे त्यांचा चांगला भुगा होऊन खत तयार होते. रोटाव्हेटर केल्यानंतर जमीन चांगली तापू देतो. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी कलिंगड लागवडीचे नियोजन करतो. यासाठी दर सहा फुटावर दीड फूट रुंदीचा गादीवाफा करतो. माती परिक्षणानुसार एकरी १०० किलो डीएपी, ५० किलो पोटॅश, १०० किलो निंबोळी पेंड, २० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये गादीवाफ्यात मिसळतो. यानंतर वाफ्यावर ठिबक सिंचन नळी ठेऊन आच्छादन पेपर अंथरतो. त्यावर झिगझॅग पद्धतीने दर एक फुटावर गरम ग्लासने छिद्रे पाडतो. दोन दिवस ठिबक सिंचन संच चालवून गादीवाफे ओलावून घेतो. त्यानंतर छिद्रे पाडलेल्या ठिकाणी कलिंगडाची एक बी टोकतो. ठिबक सिंचनाने शिफारशीनुसार विद्राव्य खताची मात्रा दिली जाते. तसेच गरजेनुसार कीड, रोग नियंत्रणाच्या दृष्टीने फवारण्या घेतल्या जातात. फेब्रुवारी ते मार्चमध्ये कलिंगडाची काढणी होते. योग्य व्यवस्थापनामुळे एकरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळते. जागेवरच व्यापारी कलिंगडाची खरेदी करतात. आम्हाला खर्च वजा जाता एकरी एक लाख रुपये नफा गेल्यावर्षी कलिंगडातून मिळाला.

   गुणवत्तापूर्ण हळद    हळद लागवडीबाबत शिवानंद मरकुंदे म्हणाले, की आम्ही दरवर्षी तीन एकरावर हळद लागवड करतो. जमिनीची चांगली मशागत करून आम्ही जून महिन्यात हळदीच्या सेलम जातीची लागवड करतो. लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत मिसळतो. एकरी १०० किलो निंबोळी पेंड, १०० किलो डीएपी, ५० किलो पोटॅश, ५० किलो दुय्यम अन्नद्रव्ये मिसळतो. दोन गादी वाफ्यात पाच फुटाचे अंतर ठेवतो. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन अंथरून दोन्ही बाजूला एक फुटाच्या अंतराने प्रक्रिया केलेले बेणे लावतो. वाढीच्या टप्‍प्यात ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शिफारशीनुसार विद्राव्य खत दिले जाते. शेवटच्या टप्‍प्यात पिकाला पाणी कमी केले जाते. पिकाची नऊ महिन्यांनी पूर्ण वाढ झाल्यानंतर ट्रॅक्‍टरला हळद काढणी यंत्र बसवून काढणी करतो. आम्हाला एकरी ३५ क्विंटल वाळलेली हळद मिळते. नांदेड बाजारपेठेत हळदीची विक्री करतो. हळदीच्या पिकातूनही चांगला आर्थिक नफा मिळविण्याचा आमचा प्रयत्न असतो. 

बत्तीस सदस्यांचे एकत्र कुटुंब मरकुंदे यांचे एकत्र कुटुंब आहे. गोविंद मरकुंदे यांना शिवानंद, प्रकाश आणि अनिल ही तीन मुले. तिघांचीही लग्ने झाली आहेत. त्यांना २ मुले व ६ मुली आहेत. भगवान मरकुंदे यांना विकास, संतोष आणि सुनील ही तीन मुले. त्यापैकी दोघांची लग्ने झाली आहेत. त्यांना एक मुलगा व ४ मुली आहेत. विश्‍वनाथ मरकुंदे यांना अविनाश हा मुलगा आणि दोन मुली आहेत. एक मुलगा, आणि मुलीचे लग्न झाले आहे. मरकुंदे कुटुंबामध्ये एकूण ३२ सदस्य आहेत.        गावामध्ये मरकुंदे कुटुंबाची कापड, किराणा आणि  कटलरीचे दुकान आहे. कुटुंबातील सदस्य दुकानांचे व्यवस्थापन करतात. याचबरोबरीने दररोज किमान आठ ते दहा जण शेती नियोजनात असतात. त्यामुळे पीक व्यवस्थापनासाठी मजुरांवर फारसे अवलंबून रहावे लागत नाही. पिकाचे योग्य व्यवस्थापन झाल्याने उत्पादनात वाढ मिळविणे शक्य झाले आहे.

शिवानंद मरकुंदे ः ९०४९१०२३२६  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com