agrowon marathi special story of Pinki Pawar,Girnare,Dist.Nashik | Agrowon

अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंड
ज्ञानेश उगले
रविवार, 18 मार्च 2018

गिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार गेली वीस वर्षे दिवसभर राबून फाळ, खुरपं, विळा, कुऱ्हाड, कुदळ, रोटरचे पाते तयार करतेय. या अवजारांना गावशिवारातील शेतकऱ्यांची पसंतीही आहे. प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करण्यासाठी धडपडत राहणं हाच तिच्या जगण्याचा स्थायीभाव बनलाय.

गिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार गेली वीस वर्षे दिवसभर राबून फाळ, खुरपं, विळा, कुऱ्हाड, कुदळ, रोटरचे पाते तयार करतेय. या अवजारांना गावशिवारातील शेतकऱ्यांची पसंतीही आहे. प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करण्यासाठी धडपडत राहणं हाच तिच्या जगण्याचा स्थायीभाव बनलाय.

ठण... ठण... ठण... भट्टीत तापून लालबुंद झालेल्या कोयत्याच्या पात्यावर घणाचे घाव पडताहेत... कोयत्याचं पातं धारदार होतंय... लोहाराच्या तापलेल्या भट्टीजवळ कामात मग्न असलेली पिंकी पवार काम हातावेगळं करतेय... कुणाला खुरपं हवंय, कुणाला विळीला पाणी पाजून हवंय... एकापाठोपाठ एक कामांची रांग सुरूच... समोरचं काम उरकवण्याचा ध्यास... पिंकीच्या हातांना घडीभराची उसंत नाही. गिरणारे (जि. नाशिक) गावच्या लोहार गल्लीतील पिंकी सुधाकर पवार हिचं दुकान असं दिवसभर शेतकऱ्यांनी भरलेलं. सबंध आयुष्य आग फेकणारी भट्टी, लोखंड अाणि नाना प्रकारच्या अवजारांनी व्यापलंय. थोडंथोडकं नाही, तब्बल वीस वर्षांपासून ती लोहारकामात आहे. तिच्याकडून नेलेलं अवजार लवकर तुटणार नाही, ही ओळख तिच्या हाताच्या कारागिरीनं निर्माण झालीय. नाशिक जिल्ह्याच्या विविध गावांतील जुनेजाणते शेतकरीही दूरवरून केवळ तिच्याकडील अवजारं खरेदीसाठी गिरणारे गावात येतात. गुणवत्तापूर्ण काम, हाच तिचा ब्रँड झालाय.

संघर्षमय प्रवास 

 पिंकी सुधाकर पवार, वय वर्षे २९. लोहारकामातून घरप्रपंच चालवतेय. वयोवृद्ध वडिलांना आधार देतानाच दोन भावांच्या शिक्षणालाही हातभार लावतेय. पाशी, फाळ, खुरपं, विळे, कुऱ्हाड, कुदळी, रोटरचं पातं अशी कितीतरी छोटी अवजारं दिवसभर राबून तयार करते. तिची परमेश्‍वराच्या बरोबरीने हातातल्या कामावर श्रद्धा आहे. पिंकीच्या जगण्याचा प्रवास संघर्षाने भरलेला. मुलगी असूनही तिने लोहारकाम स्वीकारलं. पोलियोमुळे दोन्ही पायांचं अधुपण आलं, तेही तिने स्वीकारलंय.  घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यातच आई कर्करोगाने आजारी. वडील आणि कुटुंबाने असंख्य प्रयत्न केले, खर्च केले, तरी आई वाचू शकली नाही. लहानपणीच आईचं छत्र हरपलं. वडिलांसह मोठ्या बहिणींची साथ होती. दोनवेळच्या अन्नाचीही मारामार. जिथं जगणं वाचणंच अवघड होतं, अशा बिकट परिस्थितीतून पिंकी पुढं आली. त्यामुळे लढाऊ बाणा तिच्या पेशीपेशींत भिनलाय.

भाता अन् भट्टीचीच शाळा  

जगण्याच्या लढाईत पिंकीचं शाळेत जाणं, शिकणं राहून गेलं... मुलं पहिली- दुसरीला जातात, अक्षरं अन् अंकांची ओळख करून घेतात, मनमुराद खेळतात... त्याच सात ते आठ वर्षांच्या वयापासून पिंकीला सहवास लाभला तो फक्त हवा घेणाऱ्या- देणाऱ्या भात्याचा अन् लोखंडाला तापवणाऱ्या भट्टीचा. वडिलांचं काम पाहत पाहत भाता तिच्या हातात कधी आला हे कळलंही नाही. कळत्या वयापर्यंत ती निष्णात कारागीर बनली. सुरवातीला वडिलांना लोहारकामात मीना आणि विजया या मोठ्या बहिणी मदत करायच्या. दोन बहिणींनंतर यशवंत, श्‍याम, गजानन हे भाऊ आणि वडील सुधाकर असं पिंकीचं कुटुंब. दोन्ही मोठ्या बहिणींच्या लग्नानंतर कामाची सगळी जबाबदारी पिंकीवर पडली. त्या गोष्टीला आता वीस वर्षं झालीत. वडिलांचं वय आता ७२ वर्षांचं आहे. मोठा भाऊ यशवंत इयत्ता पाचवी शिकलाय, तो लोहारकाम करतो. लहान भाऊ श्‍याम, गजानन अजून शिकताहेत. या भावांची जमेल तशी लोहारकामात मदत होते. मात्र, तरीही दिवसभर राबणाऱ्या पिंकीच्या हातात सर्व कामांची सूत्रं आहेत. पिंकी कुटुंबाचा कर्ता माणूस, भट्टीवर पोलादाने पोळून निघावं, तसं पिंकीचं जगणं पोळून निघालं आहे. लग्नाचा विचार जवळपासही ती येऊ देत नाही. संघर्षशील जगण्याच्या भट्टीत इच्छा- आकांक्षांची राख होत असली, तरी त्याची खंत तिच्या बोलण्यातून चुकूनही येत नाही. आपलं काम हेच तिने सर्वस्व मानलंय.

आव्हानांमुळे लढाईला धार

 गिरणारे गावात लोहारकामाची तीसहून अधिक दुकानं होती. आता आठ दुकानं आहेत. पिंकीला लोहारकामात वीस वर्षं झाली. पहिली दहा वर्षं ही चांगला आर्थिक आधार देणारी होती. मागच्या दोन दशकांत या व्यवसायात मोठे बदल झाले. सुरवातीला हाताने ओढायची धमण होती. हाताच्या आणि हवेच्या दाबाने भट्टीतील विस्तव पेट घ्यायचा. पोलाद त्यावर शेकून निघायचं. त्यानंतरच्या वर्षांत ही धमण मागे पडली. त्याजागी हाताने फिरविण्याचं छोटंसं यंत्र आलं. त्यानंतर मागील दहा वर्षांत विजेवर चालणारी भट्टी आली. एका अतिरिक्त मजुराची गरज कमी झाली; मात्र विजेचा खर्च वाढला. वीजही पुरेशी मिळत नसल्याने अडचणी वाढल्या. भट्टीसाठी लागणारा कोळसा मिळणं मुश्‍कील झालंय. २००० नंतर लोहारकाम व्यवसायाला घरघर लागली. मागील दहा- बारा वर्षांत गाव शिवारात ट्रॅक्‍टरांची संख्या तीन पटीने वाढली. निंदणी, खुरपणी, बैल बारदाणा सगळा झपाट्याने कमी झाला. परिणामी बलुतेदारी, अलुतेदारीचा गावगाडा अडचणीत सापडला असला, तरी पिंकीची लढाई सुरू आहे.

कामातून मिळवली विश्‍वासार्हता
गिरणारे गावातून लोहार गल्लीकडे जाताना जुन्या विहिरीजवळ दर्शनी भागात पत्र्याच्या शेडमध्ये पिंकी पवारचं दुकान आहे. अहोरात्र कामात असलेल्या पिंकीच्या दुकानात शांतपणा कधी नसतोच. सतत एखादं तरी गिऱ्हाईक काम घेऊन आलेलं. सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत, तर कधी कधी हंगामात काम संपेपर्यंत रात्री नऊ वाजेपर्यंत ती दुकानात काम करताना दिसते. दुकान बंद असलं तरी दुरून आलेलं गिऱ्हाईक तिच्या घरी साहित्य, अवजार ठेवून जातं. काम करायचं ते पिंकीकडूनच, इतकी कामाची गुणवत्ता आणि विश्‍वासार्हता निर्माण केलीय. काळाच्या ओघात गावात येणारं गिऱ्हाईक कमी झालंय. पिंकी आता जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या कृषी प्रदर्शनांतून तिच्या अवजारांचा स्टॉल मांडते. त्यातूनही ती अधिकाधिक ग्राहकांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. 

स्वप्न हार्डवेअर  दुकानाचं...

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनही स्वस्तिपद्मे रेखिती...
....कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ओळी पिंकी पवारच्या संघर्षाचं चित्र रेखाटतात. पिंकी दिवसभर राबते. दोनशे- तीनशेचं उत्पन्न हाती येतं. गुरुवारी बाजारच्या दिवशी गावालगतच्या चाळीस खेड्यांतील शेतकरी बाजारासाठी गिरणारे गावात येतात. त्याच दिवशी उत्पन्नाचा आकडा पाचशेच्यावर जातो. त्यात घरखर्च, किराणा, आजारपण असं सगळं चालवायचं असतं. संघर्ष थांबलेला नाही. येत्या काळात हा व्यवसाय फार चालणार नाही. आपलं भवितव्य काय असेल, याची चिंताही पिंकीच्या बोलण्यातून लपत नाही. या व्यवसायासोबत स्वत:चं अवजारांचं दुकान असावं, त्यासोबत ट्रॅक्‍टर आदी यंत्रांना लागणाऱ्या विविध कंपन्यांच्या रेडीमेड वस्तू आणि त्यासोबत आपण तयार केलेली अवजारं विक्रीला असतील, हे तिचं स्वप्न आहे. त्यासाठी स्थानिक राष्ट्रीयीकृत बॅंकेत तिने कर्जाची मागणी केली. मात्र शिक्षण, कागदपत्रं, उलाढाल आदी कारणं दाखवून तिचा प्रस्ताव नाकारण्यात आला. तरीदेखील स्वकर्तृत्वावर भांडवलासाठी तिचा प्रयत्न सुरूच आहे. ती हिंमत हरलेली नाही आणि हरणारही नाही.

 पिंकी पवार, ८३०८६०७२८३
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...