‘एकी'मुळे मिळाले आत्मविश्वासाचे बळ !

नाशिक शहरात स्वस्त धान्य दुकान चालविणाऱ्या सप्तश्रृंगी महिला बचत गटातील सदस्या.
नाशिक शहरात स्वस्त धान्य दुकान चालविणाऱ्या सप्तश्रृंगी महिला बचत गटातील सदस्या.

नऊ वर्षांपासून असलेले ‘एकी'चं महत्त्व नाशिक शहरातील सप्तश्रृंगी महिला स्वयंसाह्यता बचत गटाच्या महिलांनी चांगलंच ओळखलं आहे. या गटातील दहा महिला घरप्रपंच हिरिरीने सांभाळून ‘स्वस्त धान्य दुकान' चालवितात. तसेच स्वतःचा घरगुती प्रक्रिया उद्योगही चांगल्या प्रकारे करतात. योग्य सेवा आणि गुणवत्तेमुळे बचत गटाचे दुकान नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. नाशिक शहरातील सेंट्रल जेलच्या लगत भाजीबाजाराच्या रस्त्याने काहीसं पुढे गेले की सप्तश्रृंगी महिला विकास मंडळाचे कार्यालय तसेच स्वस्त धान्य दुकान असलेली छोटेखानी इमारत दिसते. परिसरात ‘महिलांचे रेशन दुकान' अशी या दुकानाची ओळख आहे. सकाळी दहा वाजल्यापासून दुकानाचे आवार महिलांच्या गर्दीने गजबजलेले दिसते. गहू, तांदूळ, मका, तूरदाळ या धान्यांची पोती गाडीतून उतरविणे, दुकानात थप्पी लावणे, येणाऱ्या ग्राहकांची नोंद घेणे, थम यंत्राच्या साह्याने मागणी नोंदविणे, धान्याचे वजन करणे, ग्राहकाला धान्य देणे या सर्व कामांत महिला गुंतलेल्या दिसतात. इथे विनाविलंब वेळेत धान्य मिळते. या शिवाय महिलांच्या उन्नतीसाठी असलेले विविध उपक्रम तसेच योजनांची माहिती मिळते. यामुळे सर्वस्तरातील महिलांची वर्दळ या केंद्रात सातत्याने दिसते.

परिस्थितीशी लढाई सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई चव्हाण यांच्या प्रयत्नातून सन २००९ मध्ये ‘सप्तश्रृंगी महिला बचत गटा'ची स्थापना झाली.परिसरातील महिलांच्या प्रगतीसाठी त्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. याच उद्देशाने त्यांनी  १९९८ मध्ये ‘सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ' स्थापन केले. त्या अंतर्गत त्यांनी परिसरातील महिलांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास यासाठी अनेक उपक्रम घेतले.    कुसुमताई या जेल रोड परिसरातील सामान्य कुटुंबातील महिला. त्यांचे पती पृथ्वीराज चव्हाण हे प्रेस कामगार म्हणून नोकरीला होते. पतीच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी कुसुमताईंवर आली. पतीच्या पेन्शनचाच कुटुंबाला आधार होता. या हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी मुला, मुलींना उत्तम शिक्षण मिळवून देण्यासाठी धडपड केली. परिसरातील अनेक महिलांची परिस्थिती बिकट असल्याचे त्यांना जाणवत होतं. गरजेच्या वेळी कुसुमताई त्यांच्या मदतीला जात असत. मात्र १९९८ पासून त्यांनी महिला विकास मंडळ स्थापन करून महिलांसाठी जास्तीत जास्त काम करायचे ठरवले. सन २००८ च्या दरम्यान त्यांचा संपर्क नाशिकच्या शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ‘लोकभारती' या सामाजिक संस्थेशी आला. संस्थेच्या संचालक नीलिमा साठे यांनी कुसुमताईंना स्वयंसाह्यता बचत गट सुरू करण्याविषयी सुचविले. याच दरम्यान परिसरातील सर्व महिलांना एकत्र बोलावून त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधण्यात आला. २००९ मध्ये सप्तश्रृंगी महिला बचत गटाची रितसर स्थापना झाली. धुणी भांडी, साफ सफाई करणाऱ्या तसेच घर सांभाळून शेवया, पापड निर्मिती करणाऱ्या महिला एकत्र आल्या. एकत्रित प्रयत्नांतून काही उपक्रम करायचे ठरले. व्यक्तिगत स्वरुपात सुरू असलेल्या प्रयत्नांनाही यामुळे बळ मिळाले.

बचतीतून आत्मनिर्भरतेकडे  सप्तश्रृंगी बचत गटाच्या अध्यक्षा कुसुमताई वाटचालीविषयी म्हणाल्या की, सर्वसामान्य घरातील महिलांची स्थिती अत्यंत हलाखीची असते. अशा महिलांना आधार देण्यासाठी महिला विकास मंडळ आणि त्यातून बचत गटाची स्थापना केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, परित्यक्‍त्या, आजारी महिलांना एकत्रित प्रयत्नांतून आम्ही आमच्या परीने आधार देत होतो. दरम्यान बचत गटाची सुरवात झाली. महिन्याला शंभर रुपये बचत करायचो. सुरवातीला ही बचत थोडीशी होती. मात्र जमलेल्या रक्‍कमेतून महिलांना १० हजार ते २० हजारांपर्यंतची कर्जे मिळायला लागली. त्यातून अडलेल्या एखाद्या महिलेची महत्त्वाची गरज भागू लागली. मुलांचे शिक्षण, लग्नाच्या खर्चाला या बचतीची मदत झाली.  नंतर आम्ही महिन्याला शंभर ऐवजी दोनशे रुपये बचत सुरू केली. बचतीमधून वाचलेल्या रकमेचा छोटा घरगुती व्यवसाय उभारणीला मदत झाली. आज आमच्या गटातील सर्व सदस्यांचा रेशन दुकानात सक्रिय सहभाग आहेच, त्या सोबत प्रत्येकीने व्यक्तिगत पातळीवर उत्पन्नाची वेगळी व्यवस्थाही केली आहे. 

संसाराला मिळाला आधार 

सप्तश्रृंगी महिला बचत गटाच्या प्रत्येक महिलेच्या संसाराला बचत गटामुळे आधार मिळाला. एकत्रीतपणे ‘रेशन दुकान' चालविणे असो की व्यक्तिगत व्यवसाय असो, गटाच्या माध्यमातून एकत्र आल्यामुळे आमच्यापुढील अनेक समस्या सुटण्यास मदत झाली असल्याचे गटातील महिला सांगतात. बचत गटाच्या सदस्य असलेल्या नर्मदा डांगळे कुरड्या, शेवया तयार करून देतात. चित्रा चव्हाण घरगुती मसाले तयार करतात. आशा जाधव  कांदे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. मधुरा शिंदे धुणीभांडी करतात. ज्योती चव्हाण या गृहिणी आहेत. शीला आहिरे या स्वस्त धान्य दुकानात पूर्णवेळ काम करतात. वनिता साळवे या व्यापारी बॅंकेत नोकरी करतात. शालिनी गांगुर्डे या धुणी भांडी तसेच स्वयंपाक करून देण्याचे काम करतात. जयश्री पोतदार दवाखान्यात काम करतात. या सगळ्या सदस्यांनी सप्तश्रृंगी महिला बचत गटाच्या कामाची जबाबदारी पेलली आहे. मागील पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून या महिला गटाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. बचत गटामुळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.  

रेशन दुकानाने दिली संधी

सप्तश्रृंगी बचत गटाला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळविणे मोठे दिव्य होते. दुकानासाठी कुसुमताईंसह गटातील सर्व महिलांनी शासनाकडे चांगला पाठपुरावा केला. सर्वसामान्य घरातील महिलांना मिळालेली ही मोठी संधीच होती. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा शासकीय अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून प्रमाणपत्र दिले, तो आमच्या दृष्टीने मोठ्या आनंदाचा क्षण होता, असं गटातील महिला  सांगतात.    मागील पाच वर्षांत महिलांनी संधीचे सोने केले. जेलरोड परिसरातील महिलांचे रेशन दुकान रोज सकाळी १० ते २ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू असते. गटातील सर्व महिला गरजेनुसार दोन टप्प्यात कामे करतात. रोज सकाळी दुकानाची साफ सफाई होते. दुकानात गहू, तांदूळ, मका, तुरदाळ हे धान्य नियमित मिळते. सुरवातीच्या काही काळ साखर येत असे. नंतर मात्र ती बंद झाली. धान्याचा ताजा स्टॉक ठेवणे, त्याचा वेळेत निपटारा होण्यावर भर देणे ही कामे महत्त्वाची असतात. त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाते. सर्व व्यवहारांची नियमित नोंद होते. यामुळे शासकीय अधिकारी, ग्राहक यांनाही तपासणी करणे, गुणवत्तेची खात्री करणे सोयीचे ठरते. स्वस्त धान्य दुकानातून सुमारे १०० नियमित ग्राहकांना धान्याचे वितरण केले जाते. दुकानाच्या इतर वेळेत महिला त्यांचे व्यक्तिगत व्यवसाय करतात. 

- कुसुमताई चव्हाण, ९८५०२५२०७०  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com