ग्राहकांची मागणी अोळखून कडकनाथ, गिरिराज कोंबडीपालन

ग्राहकांची मागणी अोळखून  कडकनाथ, गिरिराज कोंबडीपालन
ग्राहकांची मागणी अोळखून कडकनाथ, गिरिराज कोंबडीपालन

लिंबायत(टाकळी), जि. नांदेड येथील असलम खान बाबुखान फारुकी यांनी कडकनाथ व गिरिरीज या कोंबड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन वडिलांच्या मदतीने त्यांचे संगोपन व विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. शंभर कोंबड्यांपासून सुरू केलेला व्यवसाय त्यांनी अल्पावधीत १२०० च्या संख्येपर्यंत नेला आहे. जोडीला दुग्धव्यवसाय करून उत्पन्नवाढीत अधिक भर टाकली आहे. विदर्भाने वेढलेल्या मराठवाड्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील व माहूर तालुक्‍यातील लिंबायत (टाकळी) गाव येते. येथील असलम खान बाबुखान फारुकी यांच्या कुटुंबाची सुमारे पाच एकर जमीन आहे. बटईने आणखी सहा एकर घेतली आहे. शेततळ्याच्या आधारे ती शेती बागायती केली आहे. मात्र, शेतीला जोड देताना या कुटुंबाने पोल्ट्री व्यवसायात अधिक लक्ष घातले. 

पोल्ट्री व्यवसायातील कोणती बाब हेरली?  पोल्ट्री व्यवसाय तर करायचा, पण त्यातही मागणी असलेल्या जातींची निवड करायची असे ठरले. गावरान कोंबड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी चार पैसे अधिकचे मोजायला लोक तयार आहेत. हीच बाब असलमखान यांनी हेरली. लाल तुर्रेबाज कोंबड्या सगळीकडे दिसून येतात. परंतु, काळ्याकुट्ट रूपरंगाच्या पण चवीला रुचकर, औषधी गुणधर्म असलेल्या कडकनाथ जातीच्या कोंबड्यांची मागणी लक्षात घेतली. गिरिरीज या देशी कोंबडीलाही मार्केट चांगले असल्याचे लक्षात आले.

अभ्यास काय केला?   असलमखान यांना या जातींविषयी माहिती गोळा करताना यू-ट्यूब माध्यमाचा चांगला उपयोग झाला. त्यावरील कडकनाथ जातीच्या संगोपनाचे अनेक व्हिडिओ पाहिले. याचबरोबर ॲग्रोवन, साम टीव्ही आदींमधूनही माहिती मिळवली. 

पिलांची खरेदी व संगोपन कसे केले?  कडकनाथ कोंबडी मूळ मध्य प्रदेशाची असल्याने तेथूनच पिले आणली, तर ती जातिवंत मिळतील, असा विचार केला. झाबुआ (मध्य प्रदेश) येथे हॅचरी असल्याची माहिती मिळाली. नागपूरपासूनच हे ठिकाण जवळच आहे. तेथे मोठ्या प्रमाणात आदिवासी राहतात. त्यानुसार प्रतिनग ११० रुपयांप्रमाणे ४०० पिले आणली. अर्धबंदिस्त पद्धतीने पक्ष्यांचे पालन केले जाते. दिवसा पक्षी मोकळ्या वातावरणात सोडले जातात. शेतपरिसरातच दोन खोल्यांचे बांधकाम केले आहे. संध्याकाळी तेथे पक्ष्यांना ठेवले जाते. खोलीच्या समोरील बाजूला असलेल्या १७ गुंठे शेतात कुंपण करून लोखंडी तारेची जाळी बसवली आहे.  जागोजागी पाण्याची व खाद्याची भांडी ठेवलेली आहेत.

कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये 

  • या जातीत बदलत्या हवामानास (उदा. उन्हाळ्यातील जास्त तापमान व हिवाळ्यातील अति थंडी) तोंड देण्याची क्षमता आहे.
  • साधे खुराडे, कमी खर्चाचे व्यवस्थापन 
  • तुलनेने रोगास कमी प्रमाणात बळी पडते
  • या कोंबडीतील औषधी गुणधर्मामुळे व मिळणाऱ्या दरांमुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे वळत आहेत. 
  •  व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  • नागपूर येथील शासकीय हॅचरीतून पिले आणली जातात. 
  • एक दिवसांची पिले आणल्यानंतर सातव्या दिवशी लासोटाची लस.
  • सुमारे ३५ ते ४० दिवसांपर्यंत ब्रुडिंग रूममध्ये संगोपन
  • तापमान नियंत्रणासाठी विजेचे बल्ब बसवले आहेत. लहान पिलांवर पिसांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे स्वतःचे तापमान नियंत्रित करू शकत नाहीत. त्यामुळे जागोजागी बल्ब लावून त्यांना कृत्रिम उब दिली जाते. या काळात स्टार्टर फीट पिलांना दिले जाते. मोठ्या कोंबड्यांना हिवाळ्यात थंडीचा त्रास होऊ नये म्हणूनही उबीसाठी बल्बचा उपयोग
  • अर्धबंदिस्त पद्धतीत तांदूळ, गहू, मक्‍याचा भरडा, त्याबरोबर लसूण घास, पालक, कोबीची पाने, हिरवा मका, चाऱ्याची कुट्टी, गवतही दिले जाते. हिरवा चारा कोंबड्या आवडीने खातात. 
  • कोंबड्यांची संख्या 

  • कडकनाथ ६००                              
  • गिरिराज   १५० 
  • नागपूर भागातील जात १००
  •  अन्य मिळून  एकूण १२००
  • विक्री व्यवस्थापन   कडकनाथ कोंबड्यांच्या विक्रीसाठी फारूकी यांना बाहेर जाण्याची गरज भासत नाही. पोल्ट्री फार्मवर येऊनच दर्दी ग्राहक कोंबड्या घेऊन जातात. ‘माऊथ पब्लिसिटी’द्वारे माहूर, किनवट तालुक्‍यातीलच नव्हे, तर विदर्भातील आजूबाजूच्या तालुक्‍यातील ग्राहकही खरेदीसाठी येतात.दर जास्त वाटला तरी ग्राहक खरेदी करतात, हे विशेष. 

  • सुमारे पाच ते सहा महिन्यांच्या नराचे वजन दीड किलो, तर मादीचे वजन एक ते सव्वा किलो भरते.
  • कडकनाथ १५०, तर गिरिराज २०० नगांपर्यंत. तर, यंदा २५० पक्ष्यांची विक्री
  • दर- किलोला ८०० रुपये
  • कडकनाथ महाराष्ट्रासाठी उपयुक्त  मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील आदिवासी लोक या कोंबडीचे पारंपरिक संगोपन करीत आले आहेत. आदिवासी लोक या कोंबडीस "कालिमासी'' असे म्हणतात. कोंबडी व तिचे मांस रंगाने काळे असल्यामुळे हे नाव दिले असावे. या जिल्ह्यातील हवामान महाराष्ट्रासारखेच असल्याने या कोंबड्या महाराष्ट्रासाठी व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त ठरतात. झाबुआ जिल्ह्यात ५०० ते एक हजार मिमी पाऊस पडतो. तोही अनियमित. या भागात किमान १० अंश, तर कमाल ४३ अंश से. तापमान असते. अशाच प्रकारचे हवामान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा चांगला जोडधंदा होऊ शकतो.

    शेळीपालन   फारुक कुटुंबाने एकात्मिक शेती पद्धतीवर भर दिला आहे. सुमारे एक वर्षापूर्वी त्यांनी सात स्थानिक शेळ्या खरेदी केल्या होत्या. आज २५ शेळ्या तयार झाल्या आहेत. सात महिने वयाचा बोकड साधारणतः पाच हजार रुपयांपर्यंत ते विकतात. एक बोकडापासून १४ ते १५ किलो मटण मिळते. त्याच्या व मांसाच्या किरकोळ विक्रीचा भाव किलोला ४०० रुपये आहे.

    दुग्धव्यवसाय लहान मोठ्या सुमारे १७ म्हशी, १२ गाई व दोन बैल आहेत. दररोज साधारणतः ४० लिटर दूध मिळते. जनावरे संगोपनाचा अन्य फायदा म्हणजे वर्षाकाठी जवळपास २० ट्रॉली शेणखत मिळते. त्याचा वापर आपल्या शेतासाठी होतो. त्यामुळे पिकांचे उत्पादनही चांगले मिळते. 

    शेतीचा विकास  जमीन चिबड असलेल्या भागामध्ये मागेल त्याला शेततळे या योजनेमधून कृषी विभागाकडून २० बाय २० बाय तीन मीटर आकारमानाचे शेततळे मागील नोव्हेंबरमध्ये घेतले आहे. यातील पाण्याचा उपयोग गहू, ज्वारी, हरभरा व चारा पिकांसाठी केला जातो. आता हे शेततळे १३ फूट खोल केले आहे. जेवढे पाणी उपसले तेवढे पाणी शेततळ्यामध्ये येत असल्याने शेती बागायत झाली आहे.

  •   बाबुखान फारूकी, ९७६४२००५८७ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com