जिद्द, आत्मविश्वासातून उद्योगात भरारी

नेहा म्हैसपूरकर यांनी उद्योगामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
नेहा म्हैसपूरकर यांनी उद्योगामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.

यशासाठी काय हवं असतं? जिद्द, झपाटलेपण आणि आत्मविश्‍वास. या गुणांच्या जोरावर नेहा सुधीर म्हैसपूरकर यांनी येणाऱ्या अडथळ्यांना दूर सारीत शेतमालप्रक्रिया, तसेच इलेक्‍ट्रीक उद्योगाच्या अपरिचित क्षेत्रात पाय घट्ट रोवले. केवळ वीस हजारांच्या भांडवलावर फळांच्या बॉक्ससाठी लागणाऱ्या चिकटपट्टीचा व्यवसाय सुरू करीत नेहा यांनी पुढे विविध उद्योगांत आपला ठसा उमटवला. येत्या काळात फळ प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. 

नेहा म्हैसपूरकर यांचा जन्म नाशिकमधील मध्यमवर्गीय कुटुंबातला. आई विजया ही गृहिणी आणि वडील सुधीर हे सेवा व्यवसायात कार्यरत. आई-वडिलांनी  नेहावर बालपणापासूनच स्वावलंबनाचे संस्कार केलेले. उद्योजकीय जडणघडणीत या संस्कारांचा उपयोग होत गेला. महिलांमध्ये प्रचंड क्षमता असते. ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येत केवळ पापड, लोणची अशाच प्रकारच्या पारंपरिक उद्योगात न अडकता  प्रक्रिया, उपकरणे, अवजारे या उद्योगक्षेत्रातील अफाट संधींचा लाभ घेऊन अजून मोठी झेप घेतली पाहिजे, असे नेहा यांचे म्हणणे आहे. शिक्षणाला जोड कार्यानुभवाची  उद्योजकीय प्रवास उलगडताना नेहा म्हणाल्या, की इयत्ता चौथीत असताना कार्यानुभव यावा म्हणून एका प्रिंटिंग दुकानात काम केले. व्हिजिटिंग कार्ड बनविण्याचे शिक्षण घेतले. तेव्हापासून नेहमीपेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, असं वाटत गेलं. इयत्ता दहावीच्या दरम्यान मी हॉटेलमधील खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या ॲल्युमिनियम बॉक्‍सची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी मला आठ हजार रुपयांची ‘ऑर्डर' मिळाली होती. हा अनुभव उत्साह वाढवणारा होता. पारंपरिक शिक्षण घेत असताना व्यवसायाचे वेगवेगळे अनुभव घेण्याचा मला छंदच जडला. इयत्ता बारावीला असताना एका पतसंस्थेसाठी रोज बचत रक्कम गोळा करण्याची नोकरीही केली. ‘बी.कॉम.'च्या प्रथम वर्षाला असताना  स्थानिक दूरचित्रवाहिनीसाठी बातमीदार म्हणूनही काम केले. या सर्व अनुभवातून उद्योगाच्या दिशेने माझा प्रवास झाला. 

कृषी क्षेत्रातून सुरवात     व्यवसायाच्या प्रवासाबद्दल नेहा म्हणाल्या की, बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असताना म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी मी चिकटपट्टीचा व्यवसाय करायचं ठरवलं. एखादा व्यवसाय करायचा, तर अगोदर त्याची सर्वबाजूंनी माहिती घ्यायची आणि मगच निर्णय घ्यायचा. यात एव्हाना पारंगतता आली होती. नाशिक जिल्हा हा द्राक्षे, डाळिंब आणि भाजीपाल्याचे आगर. फळांच्या बॉक्स पॅकिंगसाठी चिकटपट्टीची मोठ्या प्रमाणात गरज असते. याशिवाय इतर पॅकिंग उद्योगातही चिकटपट्टीला मागणी असते. याचे मी सर्व्हेक्षण केले. एका मोठ्या कंपनीकडून माल आणून तो स्थानिक कंपन्या, व्यावसायिकांना पुरविणे हा व्यवसाय  सुरू केला. अवघ्या वीस हजार रुपयांच्या भांडवलावर सुरवात झाली. त्यासाठी खूप मेहनत घेतली. स्वत:च्या छोट्या दुचाकीवर दूरदूर फिरावे लागत होते. नाशिक जिल्ह्यातील ओझर, पिंपळगाव बसवंत यासह सांगली, सातारा, पंढरपूरपर्यंतच्या फळे बॉक्स पॅकिंग करणाऱ्या व्यावसायिकांना चिकटपट्टी पुरवली. सन २००५ च्या दरम्यान या व्यवसायातून मला महिनाकाठी वीस-बावीस हजारांपर्यंतचे उत्पन्न मिळू लागले होते. सन २००८ ते ९ च्या दरम्यान मी ‘कॅपॅसिटर असेम्बिलिंग'च्या व्यवसायाकडे वळले. एका कंपनीच्या गरजेतून मला संधी मिळाली होती. वर्षभरात या उद्योगात मी ७० महिलांना रोजगार दिला. या काळात माझे वार्षिक उत्पन्न  एक लाखांवर पोहोचले होते.      सन २०१० नंतर नेहा यांनी अन्नप्रक्रिया उद्योगाकडे वळायचं ठरवलं. त्यांना एका फ्रोजन फूड कंपनीकडून भेंडीची ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे त्यांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल भागातून रोज दहा टन भेंडी आणून त्याची प्रतवारी, कटिंग करून योग्य वेळेत कंपनीला पुरवठा करण्यास सुरवात केली.  हा व्यवसाय दीड वर्षे केला. वर्ष २०१३ मध्ये नेहा यांनी बहुराष्ट्रीय कंपनीची व्हेंडरशिप घेतली.

डिस्ट्रिब्यूशन बॉक्‍स ठरला टर्निंग पॉइंट   उद्योगाची कोणतीही कौटुंबिक पार्श्‍वभूमी नसताना नेहा यांनी शून्यापासून शिखरापर्यंत झेप घेतली. त्यांची अंबड (जि. नाशिक) येथील ‘विजया कन्व्हर्टर' कंपनी विजेच्या ट्रान्स्फार्मरला लागणाऱ्या बॉक्‍सची निर्मिती करते.  साधारण एक तीस वर्षाची तरुणी स्वत:च्या एकटीच्या बळावर एक नव्हे, दोन कंपन्या काढते. त्या माध्यमातून दर्जेदार डिस्ट्रिब्यूशन बॉक्‍सची निर्मिती करते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांसाठीही पुरवठा करते. आज कंपनीची उलाढाल वर्षाकाठी ३० कोटींपर्यंत गेली आहे. बदलत्या व्यवसायाच्या टप्प्याबाबत नेहा सांगत होत्या... येत्या काळात ‘पुढे काय?' हा प्रश्‍न छळत होता. कारण दर दहा वर्षांनी व्यवसायाचे स्वरूप बदलते, बाजारपेठेची मागणी बदलते, त्यादृष्टीने आपण तयार असले पाहिजे, नाहीतर संपून जाऊ.  महावितरण कंपनीला ट्रान्सफार्मरसाठी विशिष्ट स्वरूपाचे डिस्ट्रिब्यूशन बॉक्‍स लागतात. हे माहिती झाले होते. या कंपनीची ‘ऑर्डर' मिळविणे हे मोठे दिव्य होते. याच दरम्यान कुटुंबासमवेत माहुरच्या देवीच्या दर्शनाला गेले होते. चहा घेण्यासाठी गाडी एका छोट्या हॉटेलजवळ थांबवली. योगायोगाने तिथे जवळच ‘महावितरण'चे कार्यालय आणि गोदाम होते. सहज म्हणून चक्कर मारली. तिथे डिस्ट्रिब्यूशन बॉक्‍स दिसले. त्याचे फोटो घेतले. त्यावरून त्याचा नमुना लक्षात आला. मग त्याविषयी लागणाऱ्या यंत्रांची माहिती घेतली. याच काळात मुंबईतील महावितरणच्या मुख्य कार्यालयात ऑर्डरसाठी पाठपुरावा सुरू होता. महावितरणने देशातील पाच कंपन्यांना डिस्ट्रिब्यूशन बॉक्‍ससाठी ऑर्डर दिली. त्यामध्ये माझ्या कंपनीचा समावेश होता.  महाराष्ट्राच्या बरोबरीने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतही डिस्ट्रिब्यूशन बॉक्‍स जातात. अत्याधुनिक डीपड्रॉन या स्वयंचलित यंत्राचा वापर करतात. यामुळे लोखंडी पत्र्याचे काही क्षणांत बॉक्‍समध्ये रूपांतर होते. बी.कॉम.पर्यंतचं शिक्षण, उद्योगाची कोणतीही पार्श्‍वभूमी नाही, तरीदेखील जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर नेहा यांनी घेतलेली झेप थक्क करणारी आहे. येत्या काळात देश आणि जगभरात अन्नप्रक्रिया पदार्थांची मागणी लक्षात घेता फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने त्यांनी पावले टाकायला सुरवात केली आहे.

- नेहा म्हैसपूरकर : ९८९०४१०९५९  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com