चिकू बागेतून शेतीचे स्वप्न साकार

योग्य व्यवस्थापनामुळे चिकू कलमांची झालेली दर्जेदार वाढ.
योग्य व्यवस्थापनामुळे चिकू कलमांची झालेली दर्जेदार वाढ.

अकोला जिल्ह्यातील पारस (ता. बाळापूर) येथील ज्युनियर कॉलेजमध्ये गेली ३३ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे शिवदास सखाराम डिघोळे यांनी म्हैसपूर गावातील वडिलोपार्जित शेतीचे योग्य नियोजन करत चिकूची बाग तयार केली आहे. फळबागेत आंतरपिकाचे चांगले व्यवस्थापन ठेवत त्यांनी उत्पन्नवाढही साधली आहे. 

तीन भावांचे कुटुंब असलेल्या डिघोळे कुटुंबाची म्हैसपूर (जि. अकोला) गावात २८ एकर वडिलोपार्जित शेती अाहे. शिवदास सखाराम डिघोळे हे अकोला जिल्ह्यातील पारस (ता. बाळापूर) येथे ज्युनियर कॉलेजमध्ये गेली ३३ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबामध्ये शेतीची वाटणी झाल्यानंतर शिवदास यांच्याकडे आठ एकर शेती आली. या आठ एकर शेतीचे ते स्वतः नियोजन करतात. शेतीला पाणीपुरवठ्यासाठी दोन कूपनलिकांची सोय केली आहे. त्याचबरोबरीने शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी स्वखर्चाने शेततळेदेखील खोदले आहे. काटेकोर पाणी नियोजनासाठी आठ एकर शेतीमध्ये ठिबक सिंचन केले आहे. नोकरीमुळे दररोज शेतीकडे जाण्यास वेळ मिळत नसल्याने डिघोळे यांनी दैनंदिन शेती कामासाठी मजूर कुटुंब शेतावर ठेवले अाहे. या कुटुंबातील सदस्य शेतीमध्ये राबतात. त्यांच्याशी वेळच्या वेळी संवाद साधून डिघोळे हे पीक नियोजन देतात. सुटीच्या दिवशी शेतात जाऊन पुढील अाठवड्याच्या कामांचे नियोजन केले जाते.

चिकू फळबागेची उभारणी

अकोला जिल्हा हा बहुतांश जिरायती. डिघोळे यांची जमीन काहीशी खारपाण स्वरूपात मोडते. सिंचनाची सुविधा असलेल्या भागात फळपिकांमध्ये संत्रा लागवडीला सर्वाधिक पसंती दिली जाते. मात्र डिघोळे यांनी या प्रचलित विचारसरणीच्या बाहेर जात सन २०१४ मध्ये चार एकरात चिकूच्या कालीपत्ती या जातीची लागवड केली. यासाठी त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. डिघोळे यांनी चिकू कलमांची २० बाय २० फूट अंतरावर लागवड केली आहे. कलमांना लागवडीपासून जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय खतांच्या वापरावर डिघोळे यांनी भर दिला आहे. यामध्ये गोमूत्र, दशपर्णी अर्क आणि इतर सेंद्रिय घटकांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार जून महिन्यात रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. संपूर्ण शेतीला चारही बाजूने डिघोळे यांनी तारकुंपण केले असून त्याला लागूनच शेवरीची लागवड केली. शेवरीच्या झाडांची एकसमान वाढ झाल्याने चांगले कुंपण तयार झाले. यामुळे उष्ण वाऱ्यापासून चिकू कलमांचे संरक्षण होते. 

अांतरपीक फायदेशीर 

 चार एकर क्षेत्रावरील चिकूची कलमे उंचीने छोटी असल्याने डिघोळे हे हंगामानुसार आंतरपिकांची लागवड करतात. गेल्या वर्षी त्यांनी चिकूच्या दोन ओळीमधील मोकळ्या जागेत पपईची लागवड केली. यातून त्यांना ५० क्विंटल पपईचे उत्पादन मिळाले. पपईची विक्री अकोला बाजारपेठेत केली. याच बरोबरीने पहिली दोन वर्षे त्यांनी खरिपात सोयाबीन आणि रब्बीत हरभऱ्याचे आंतरपीक घेतले. आंतरपिकामुळे चिकू बागेच्या व्यवस्थापनाचा खर्च काही प्रमाणात निघाला. 

शाश्वत सिंचनासाठी शेततळे 

डिघोळे यांनी आठ एकर शेतीला वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी ३० मीटर बाय २० मीटर बाय तीन मीटर अाकाराचे शेततळे स्वखर्चाने खोदले आहे. या शेततळ्यात दोन कूपनलिकांचे पाणी सोडले जाते. काळी माती असल्याने शेततळ्यातून पाण्याचा झिरपा कमी आहे. शेततळ्यातील पाणी सौर पंपाने खेचून ठिबकच्या माध्यमातून चिकू फळबाग आणि इतर हंगामी पिकांना देण्याचे त्यांचे नियोजन  आहे.

सौरपंपाचा वापर   डिघोळे यांनी वीजटंचाईवर मात करण्यासाठी सौर ऊर्जाचलित तीन अश्वशक्तीचा पंप बसविला आहे. त्यामुळे पिकाला गरजेनुसार पुरेसे पाणी दिले जाते. डिघोळे यांनी दोन वर्षांपूर्वी जेव्हा सौर पंप बसविला त्यावेळी अनेकांनी त्यांना वेगवेगळे सल्ले दिले. परिसरातील कोणीही शेतकरी सौर पंपाचा वापर करण्यास तयार नव्हते. परंतू आता जेव्हा डिघोळे यांना सौर पंपाचे फायदे व्हायला लागले तेव्हा परिसरातील अाठ ते दहा जणांनी सौरपंप शेतात बसविले आहेत. म्हैसपूर शिवारातील जमीन काहीशी खारपाणपट्ट्यात मोडते. दिवसेंदिवस पाणी समस्या वाढत अाहे. यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर डिघोळे यांचा प्रयत्न असतो. संपूर्ण शेतीत ठिबक यंत्रणा कार्यान्वित केली अाहे.   

सौर ऊर्जाचलित कुंपण   म्हैसपूर परिसरातील शेतीमधील पिकांची डुकरे व इतर वन्यजीवांकडून नासधूस होते. कितीही उपाययोजना केल्या तरी वन्यजीवांचा त्रास पूर्णतः रोखणे अवघड जाते. यावर उपाय शोधण्यासाठी डिघोळे यांनी विविध ठिकाणी चौकशी केली. यावेळी त्यांना सौर ऊर्जाचलित कुंपणाबाबत माहिती मिळाली. ही यंत्रणा स्वयंचलित अाहे. ही यंत्रणा सायंकाळ ते सकाळपर्यंत कार्यरत राहते. चार एकर चिकू बागेच्या चारही बाजूने तार लावलेली असून त्यात रात्री सौर ऊर्जा प्रवाह सोडला जातो. शेताच्या कुठल्याही बाजूला प्राण्याने तारेला स्पर्श केला की त्याला जोरदार झटका बसतो. त्यामुळे जनावर दुसऱ्यांदा चुकूनही या भागात फिरकत नाही. या यंत्रणेमुळे भटक्या जनावरांचा त्रास वाचला. जनावराला झटका लागत असला तरी त्याचा मृत्यू होत नाही. ते झटक्याने दूर फेकले जाते. या यंत्रणेसाठी डिघोळे यांना पंधरा हजार रुपये खर्च आला आहे.

पेरू बागेचे नियोजन  डिघोळे यांना यंदा पहिल्यांदा चार एकरातील चिकू बागेतून फळांचे उत्पादन मिळाले. फळांची विक्री अकोला बाजारपेठेत केली. खर्च वजा जाता त्यांना बारा हजारांचे उत्पन्न मिळाले. उर्वरित चार एकर क्षेत्रावरही त्यांनी व्यवस्थापनाला सोपे जाण्यासाठी पेरू लागवडीचे नियोजन केले आहे. सध्या या चार एकर क्षेत्रामध्ये खरीप हंगामात सोयाबीन आणि रब्बीत हरभरा लागवडीचे नियोजन असते. सोयाबीनचे एकरी १० क्विंटल तर हरभऱ्याचे एकरी नऊ क्विंटल उत्पादन मिळते. 

शेतीची सूत्रे

  • चिकू फळबाग आणि सोयाबीन, हरभरा उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर.
  •  सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर, माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर.
  •  ठिबक सिंचनातून पाण्याचा काटेकोर वापर.
  •  फळबागेत आंतरपिकांच्या लागवडीचे नियोजन.
  •  सोयाबीन, हरभऱ्याचे घरचेचे योग्य गुणवत्तेचे बियाणे.
  •  गरजेनुसार कृषी तज्ज्ञ, प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा.
  • - शिवदास डिघोळे, ७५८८९६१००५
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com