‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरी

‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरी
‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरी

दापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची ४६ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची तीनदिवसीय बैठक अर्थात ‘जाॅईंट अॅग्रेस्को’ दापोलीत पार पाडली. शास्त्रज्ञांकडून करण्यात आलेल्या १७९ शिफारशींपैकी या वेळी २३ वगळता सर्व शिफारशी ‘अॅग्रोस्को’ने मान्य केल्या. १४ नवीन वाण, ११ औजारे आणि १३१ तांत्रिक शिफारशी अशा एकूण १५६ शिफारशींना या वेळी मान्यता देण्यात आली.  शास्त्रज्ञांकडून सुरू असलेल्या संशोधनातून तयार झालेल्या विविध वाण, शिफारशी व औजारांना मान्यता देत ‘अॅग्रोस्को’चा शनिवारी (ता.२६) समारोप झाला. कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा; तसेच कृषी परिषदेचे संचालक रवींद्र जगताप या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे यशस्वी कुलगुरू म्हणून निवृत्त होत असल्याबद्दल डॉ. व्यंकटेश्वरलू यांचा टाळ्यांच्या प्रचंड गजरात या वेळी -हदय सत्कार करण्यात आला. शास्त्रज्ञांनी उभे राहून त्यांच्या संशोधन कार्याला मानवंदना दिली.  समारोपीय भाषणात ज्येष्ठ शास्त्रज्ञ कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू म्हणाले, की आत्महत्या तसेच विविध ताणतणावातून कृषी व्यवस्था जात असली तरी ते संघर्ष करीत आहेत. आपण विद्यापीठांवर बोलावल्यास हजारोच्या संख्येने शेतकरी जमा होतात. देशात कुठेही असे चित्र नाही. कारण, या राज्यातील शेतकऱ्यांची असीम निष्ठा व श्रद्धा शेतीवर आहे. त्यामुळेच कृषी शास्त्रज्ञ म्हणून आपल्यावर नाजूक जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा.  डॉ. व्यंकटेश्वरलू म्हणाले, "देशातील सर्वात चांगली अॅग्रेस्को महाराष्ट्रात होत असून, हा प्रयोग देशाला दिशादायक आहे. आपल्या संशोधनातील शिफारशींमधून शेतकऱ्यांना प्रगती साधता येते. विविध समस्यांमुळे आज ६० टक्क्यांहून जास्त शेतकऱ्यांना शेती सोडावीशी वाटत असली तरी कृषी विद्यापीठातील मेळाव्यांना हजारोच्या संख्येने ते गोळा होतात. शेतीवर त्यांची श्रद्धा असल्यामुळे हे होत असून, त्यामुळे आपला जॉब नाजूक बनला आहे. कृषी संशोधन व विस्तार चांगला झाल्यास शेतकऱ्यांची प्रगती होईल." कुलगुरू डॉ. विश्वनाथा म्हणाले, की अॅग्रोस्कोचे नियोजनबद्ध आयोजनाचे श्रेय डॉ. तपस भट्टाचार्य यांना द्यावेच लागेल. अर्थात, आपल्या सर्व शास्त्रज्ञांची भूमिका येथे संपत नसून आपण दिलेल्या वाण किंवा शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत किती पोहाेचतात हे महत्त्वाचे आहे. शास्त्रज्ञांकडून नव्याने आलेले वाण एक नवजात अर्भकाप्रमाणे असून, त्याचे संगोपनदेखील महत्त्वाचे असते.  ‘‘कृषी विद्यापीठांमध्ये ५० टक्के मनुष्यबळ कमी असतानाही विद्यापीठे चांगली काम करीत आहेत. पूर्ण जागा भरल्यानंतर उत्कृष्ट कामे होतील. शास्त्रज्ञांनी याही स्थितीत स्वतःला अद्ययावत ठेवावे. रोज एक शोधनिबंध वाचण्याची सवय लावून घ्या,’’ असे कुलगुरू डॉ. भट्टाचार्य यांनी नमूद केले.  कुलगुरू डॉ. भाले म्हणाले,  की डॉ. व्यंकटेश्वरलू यांच्यासारखे कष्टकरी, अभ्यासू कृषी शास्त्रज्ञ राज्याला मिळाले ही भाग्याची बाब आहे. कुलगुरूपद सांभाळतानाही त्यांनी संशोधन अजिबात सोडले नाही. त्यांचा सल्ला अकोला विद्यापीठाच्या विकासासाठी सतत घेतला जाईल. समारोपाच्या सुरुवातीलाच जागतिक अन्न संघटनेचे सल्लागार डॉ. जे. आर. फालेरो यांनी रेड पाम बिटलवरील एकात्मिक कीड नियोजनावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com