साखर कारखान्यांकडे १९१३ कोटींची ‘एफआरपी’ थकीत

गाळप हंगाम
गाळप हंगाम

पुणे ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मागील पंधरवड्यात आटोपला आहे. साखर कारखान्यांनी गाळप केल्यानंतर उसाची एफआरपीप्रमाणे होणारी रक्कम शेतकऱ्यांना देणे अपेक्षित आहे. मात्र राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी ही रक्कम अजूनही दिलेली नसून, जवळपास एक हजार ९१३ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम थकीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  राज्यात एक नोव्हेंबर २०१७ पासून गाळत हंगामास सुरवात झाली होती. हंगामात जवळपास १८८ साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांनी सुमारे नऊ कोटी ५२ लाख ४७ हजार टन उसाचे गाळप केले. त्यातून दहा कोटी ७० लाख ८८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ११.२४ टक्के एवढा मिळाला. या सर्व साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपी प्रमाणे वीस हजार ९३८ कोटी ४९ लाख रुपये एवढी रक्कम झाली होती. त्यापैकी साखर कारखान्यांनी १९ हजार ४५९ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे. काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना दिली. मात्र, अजूनही उर्वरित रक्कम कारखान्यांकडे बाकी आहे. त्यामुळे ही रक्कम लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.     ऊस नियंत्रण आदेशानुसार ऊस पुरवठादारांना उसाचे गाळप केल्यापासून चौदा दिवसांच्या आत त्याची एफआरपी अदा करणे बंधनकारक आहे. परंतु अद्याप कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. गेल्या महिन्यापासून चालू गाळप हंगामात एफआरपी थकविल्याप्रकरणी कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे. राज्यातील पहिली कारवाई कळंब तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) हावरगाव येथील शंभूमहादेव शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्यावर केली आहे. उर्वरित साखर कारखान्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही, अशा कारखान्यांनी तत्काळ ही रक्कम उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी केले आहे. 

कारखान्यांकडील विभागनिहाय थकबाकी (कोटी रुपये) 

विभाग एकूण रक्कम थकबाकी 
कोल्हापूर ५७८४.४३ ५०६.१२
पुणे ८२५५.९८- ८४२.७७ 
नगर २८८०.३१ १८७.४० 
औरंगाबाद १६३०.४० २३७.४८ 
नांदेड २१९९.३६ १२३.६५  
अमरावती ११२.८ ५.९४ 
नागपूर ९२.९२ ९.८२
एकूण २०९३८.४९ १९१३.१९

--- ---

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com