मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटप

मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटप
मराठवाड्यात २१ टक्‍केच कर्जवाटप

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कर्जवाटपाचा टक्‍का काही सुधारण्याचे नाव घेत नाही. प्राप्त उद्दिष्टाच्या तुलनेत आजपर्यंत केवळ २०.९९ टक्‍केच कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्जवाटपाच्या वर्तमान स्थितीत शेतकऱ्यांना कर्जवाटपात हिंगोली जिल्हा सर्वात पिछाडीवर तर लातूर जिल्ह्याची स्थिती बरी म्हणता येईल अशी आहे.  यंदा खरिपासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना ११ हजार ९२७ कोटी ८४ लाख ८२ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. या उद्दिष्टाच्या तुलनेत १६ जुलैअखेरपर्यंत मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, व्यापारी बॅंक व ग्रामीण बॅंकांच्या शाखांनी ४ लाख ७४ हजार ३३७ शेतकऱ्यांना २५०३ कोटी ४८ लाख १५ हजार रुपयांचे अर्थात उद्दिष्टाच्या केवळ २०.९९ टक्‍केच कर्जवाटप ठरले आहे. कर्जमाफीचा घोळ सुटता सुटेनां त्यामुळे किती लोकांना कर्जमाफी झाले व कर्जमाफ झालेल्या किती शेतकऱ्यांना कर्ज मिळाले हे कळायला मार्ग नाही. ज्यांना कर्जमाफीच्या कक्षेत घेतले गेले त्यांची नव्याने कर्ज मिळण्यासाठीची प्रतीक्षा अजूनही कायमच आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांची स्थिती लक्षात घेऊन शासनाने यंदा व्यापारी बॅंकांना खरीप पीक कर्जवाटपाचे सर्वाधिक उद्दिष्ट दिले. परंतु, त्या बॅंका शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात कमालीच्या पिछाडीवर दिसत आहेत. हिंगोली, बीड व नांदेड जिल्ह्यात तर व्यापारी बॅंकांनी उद्दिष्टाच्या दहा टक्‍केही कर्जवाटप केले नसल्याची स्थिती आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंक व ग्रामीण बॅंकेची स्थिती बरी दिसत असली तरी समाधानकरक म्हणता येणारी नसल्याचेच चित्र आहे. 

व्यापारी बॅंकांचे केवळ ११.३९ टक्‍केच कर्जवाटप मराठवाड्यातील व्यापारी बॅंकांच्या शाखांना यंदा खरिपासाठी सर्वाधिक ८००४ कोटी ७० लाख ४१ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्टाच्या तुलनेत व्यापारी बॅंकांनी १६ जुलै अखेरपर्यंत केवळ ११.३९ टक्‍केच उद्दिष्टपूर्ती करत ८२ हजार ५०७ शेतकऱ्यांनाच ९१२ कोटी २ लाख १९ हजार रुपयांचे कर्जवाटप केले. तुलनेत ग्रामीण बॅंकांच्या शाखांनी १५७६ कोटी ९४ लाख ३२ हजार रूपये उद्दिष्टाच्या तुलनेत ३४.६७ टक्‍के उद्दिष्टपूर्ती करतांना ६८ हजार ७१६ शेतकऱ्यांना ५४६ कोटी ८० लाख रुपयांचे तर विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या विविध शाखांनी २३४६ कोटी २० लाख ९ हजार रुपये कर्जवाटप उद्दिष्टाच्या तुलनेत ४४.५३ टक्‍के उद्दिष्टपूर्ती करतांना ३ लाख २३ हजार ११४ शेतकऱ्यांना १०४४ कोटी ६५ लाख ९६ हजार रुपयांचे कर्जवाटप केले. 

जिल्हा उद्दिष्ट    प्रत्यक्ष कर्जवाटप   शेतकरी संख्या
औरंगाबाद  ११५९ कोटी ४८ लाख ३१० कोटी ६६ लाख ४२५२०
जालना  १२५९ कोटी १० लाख   ३५२ कोटी ७३ लाख  ५२८६२
परभणी १४७० कोटी ४४ लाख  १८१ कोटी ११ लाख  ४२१५० 
 हिंगोली   ९५९ कोटी  १०२ कोटी ८४ लाख    २२८३३ 
लातूर १८७४ कोटी २७ लाख  ७७९ कोटी ७३ लाख १७१४३६
उस्मानाबाद  १३७९ कोटी ७० लाख  ३०७ कोटी ४३ लाख  ६६८७१
बीड   २१४२ कोटी ३८ लाख    २४८ कोटी २ लाख   ३५६४७
नांदेड   १६८३ कोटी ४७ लाख    २२० कोटी ९५ लाख    ४००१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com